• post image sangita

    ‘स्वच्छतालेणे’ उभारणाऱ्या ओव्हाळेंचा सन्मान

    सौभाग्याचं लेणं असलेले मंगळसूत्र गहाण ठेवून त्या पैशांतून घरात शौचालय बांधणाऱ्या वाशीम जिल्ह्यातील संगीता ओव्हाळे यांचा गुरुवारी राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे पालवे यांनी त्यांच्या वरळी येथील कार्यालयात सत्कार केला.

    संगीता ओव्हाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाने प्रेरित होऊन घरात शौचालय बांधण्याचा निर्णय घेतला. पुरेसे पैसे नसतानाही त्या व त्यांचे पती यांनी काहीही करून शौचालय बांधण्याचा निर्धार पक्का केला. ओव्हाळे यांनी त्यासाठी स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवून त्यातून घरात शौचालय बांधले.

    स्वच्छतेप्रती संगीता ओव्हाळे यांची असलेली बांधिलकी लक्षात घेऊन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज त्यांच्या वरळी येथील कार्यालयात ओव्हाळे पती-पत्नींना बोलावले. संगीता ओव्हाळे यांनी गहाण ठेवलेले मंगळसूत्र परत मिळवून ते त्यांना देऊन त्यांचा सत्कार केला.

    पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की, ‘प्रसंगी स्वतःच्या सौभाग्याचे लेणं गहाण ठेवून पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानात सामील होणाऱ्या संगीताताई या राज्यातील स्वच्छतेच्या आदर्श आहेत. त्यांचा राज्याला अभिमान आहे.’ संगीताताईंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानात राज्यातील जनतेने सहभागी होण्याचे आवाहनही यावेळी मुंडे-पालवे यांनी केले.