• post-image-gram-sadak

  राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना नव्याने राबविणार – पंकजा मुंडे

  केंद्राच्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना नव्याने कार्यान्वित करुन संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र शहरांना जोडण्याचा महत्वकांक्षी संकल्प आज राज्याच्या ग्रामविकास, जलसंधारण व महिला व बालकल्याण मंत्री पंकजा पालवे-मुंडे यांनी येथे सोडला आहे.

  पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत औरंगाबाद विभागात झालेल्या कामांचा आढावा येथील सुभेदारी विश्रामगृहात संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

  ग्रामीण भागात दळणवळण सक्षम करण्यासाठी ग्रामीण रस्त्यांची अत्यंत आवश्यकता आहे. मध्यप्रदेशात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अत्यंत प्रभावी ठरली आहे. त्याचेच अनुकरण महाराष्ट्रात करण्यात येईल अशी माहिती सांगत या बैठकीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. त्या म्हणाल्या की, आणखी एक जलसंधारणासारख्या लोकोपयोगी कार्यक्रम प्रभावीपणे हाती घेण्यात येईल यासाठी कोणत्याही परिस्थितीत राज्यात जून-जुलैमध्ये पडणाऱ्या पावसाचे पाणी जागेवरच अडविले जाईल. छोटे नाले, ओढे, गाव तलाव, लघुतलाव, छोटे बंधारे अशा सर्वच ठिकाणी हा पाणी अडविण्याचा कार्यक्रम केला तरच त्यापुढील वर्षी शेती व पिण्यासाठी पाणी मिळू शकेल. दरवर्षी राज्याला पाणीटंचाई व दुष्काळाला सामोरे जावे लागते. या नव्या जलसंधारण कार्यक्रमामुळे त्यावर उपाय होऊ शकेल.

  औरंगाबाद विभागातील आठ जिल्हयात पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत 76 तालुक्यात 1 ते 12 टप्पे हाती घेऊन 1450 रस्त्यांची कामे पुर्ण करण्यात आली. त्यातून 4886.98 कि.मी. रस्ते बांधकाम पूर्ण करण्यात आले. 192 कामे प्रगतीपथावर आहेत. मार्च 2014 अखेर यामुळे रस्त्याच्या कामावर 1108.36 कोटी रुपये खर्च करण्यात आले, असे अधीक्षक अभियंता एस.एस. जोशी यांनी यावेळी सांगितले.

  जिल्हा परिषदेमार्फत लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या योजना राबविल्या जातात. त्यांचा आढावाही मंत्री पंकजा मुंडे यांनी जाणून घेतला. या योजनेतून ग्रामीण भागात रस्ते, गटारे, समाजभवन व अन्य मूलभुत सूविधा घेण्यात येतात. यावर्षी या योजनेतून 6 कोटी रुपये वितरित करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी यांनी यावेळी सांगितले. या योजनेवर बोलतांना मंत्री मुंडे म्हणाल्या आता यापुढे या योजनेवर निधी वितरीत करण्यावर स्थगिती आहे. राज्यात अद्यापही काही जिल्ह्यात सदरचा निधी वितरित झालेला नाही. आता नवीन लोकप्रतिनिधी निवडून आल्याने उर्वरित मार्च महिन्यापर्यंतच्या कालावधीसाठी निधी वितरणाचा निर्णय घेतला जाईल. औरंगाबाद जिल्ह्यातील पंचायत समितीच्या इमारती बांधकामालाही लागणारा निधी उपलब्ध करुन दिला जाईल.

  विभागस्तरावर औरंगाबाद येथे महिला बचतगटाच्या विक्री व प्रदर्शनाचे 13 ते 19 नोंव्हेबरपर्यंत आयोजन करण्यात येत असल्याची माहिती महसुल विभागाचे उपायुक्त व्ही. व्ही. गुजर यांनी यावेळी सांगितली. महिला बचतगटांना अर्थसहाय्य देतांना दारिद्रयरेषेखालील महिला बचतगटांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करुन द्यावे असे मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी आदेशित केले. वस्तु उत्पादनाच्या वेष्टणाची तांत्रिक माहिती महिला बचतगटाना करुन द्यावी असेही त्यांनी सूचित केले.

  बैठकीत जिल्हाधिकारी विक्रम कुमार, महानगर पालिका आयुक्त प्रकाश महाजन, कार्यकारी अभियंता एस. पी. किवळेकर, सहाय्यक अधीक्षक अभियंता सुनील गुडसूडकर, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (म.बा.) संजय कदम यांनी चर्चेत भाग घेतला.