• 72f2fc5d-2192-40d5-98b1-8ed03ed4c0e3

    चार वर्षांपासून प्रलंबित अर्जावर निकाल : महिलेला अनुकंपातत्वावर नोकरी देण्याबाबत मंत्री पंकजा मुंडे यांचे निर्देश

    मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयात कार्यरत असलेल्या पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर शिपाई पदाची नोकरी मिळण्यासाठी प्रज्ञा शिंदे यांनी अर्ज करुन ४ वर्षे झाली. पण या काळात त्यावर निर्णय न झाल्याने तीव्र नाराजी व्यक्त करुन तातडीने निर्णय घेण्यात यावा, असे निर्देश आज महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. याप्रकरणी आवश्यकता वाटल्यास आपण सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांशी बोलू, असे त्यांनी सांगितले.

    पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी महिलांच्या विविध समस्या ऐकूण त्यांचे तातडीने निराकरण केले. महिला लोकशाही दिनात आलेल्या सर्व तक्रारींवर १५ दिवसात कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

    बैठकीला महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे सदस्य सचिव अ. ना. त्रिपाठी, मुंबईच्या विशेष पोलीस महानिरीक्षक (प्रशासन) अर्चना त्यागी, महिला आणि बालविकास विभागाचे उपसचिव ब. बा. चव्हाण, महिला आयोगातील प्रकल्प अधिकारी सकिना एम. शरीफ, एल. एस. मानकर यांच्यासह संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि तक्रारदार महिला उपस्थित होत्या.

    याप्रसंगी महिलांच्या विविध अर्जांवर मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सुनावण्या घेण्यात आल्या. त्या म्हणाल्या की, महिलांच्या प्रश्नांसंदर्भात प्रशासनासह सर्वांनीच संवेदनशीलता दाखविणे गरजेचे आहे. छोट्या-मोठ्या समस्यांसाठी महिलांना मंत्रालयात यावे लागते, हे योग्य नसून महिलांच्या प्रश्नांना त्या-त्या पातळीवरच न्याय मिळणे आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.