• 8eaa94b6-1139-4d1f-904b-e5a27cb61294 (1)

    दुष्काळ मुक्तीसाठी जलयुक्त शिवार अभियानाला ग्रामसेवकांमार्फत एक दिवसाचे वेतन

    साधारण दोन कोटी रुपयांचा निधी जमा होणार : मुख्यमंत्री आण‍ि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना दिले पत्र

    मुंबई : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे सदस्य असलेल्या राज्यातील सुमारे २२ हजार ग्रामसेवकांनी दुष्काळ निर्मुलनासाठी जलयुक्त शिवार अभियानाला आपले एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला आहे. यातून सुमारे २ कोटी रुपयांचा निधी जमा होणार आहे.

    यासाठी ग्रामसेवकांच्या वेतनातून एक दिवसाचे वेतन कपात करुन घेण्यात यावे, असे पत्र आज संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना देण्यात आले. तसेच याप्रसंगी पुणे, लातूर, नगर आणि सातारा येथील ग्रामसेवक पतसंस्थांच्या वतीने जलयुक्त शिवार अभियानासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला चार लाख रुपयांचे धनादेश देण्यात आले.

    याप्रसंगी संघटनेचे राज्य अध्यक्ष एकनाथराव ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे यांच्यासह राज्यातील विविध भागातील पदाधिकारी सर्वश्री अनिल कुंभार, अमोल घोळवे, उद्धव फडतरे, हनुमंत मुरुडकर, दत्तात्रय भुजबळ, बाळासाहेब आंबरे, शाहनूर शेख, श्रीमती रश्मी शिंदे आदी उपस्थित होते.