• 3eeddfa2-8282-4b05-84a2-d8c336b2b7e0

  दि चिल्ड्र्न्स एड सोसायटीला शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य- मुख्यमंत्री

  मुंबई : बालकामगार, अनाथ, आपदग्रस्त आणि वंचित मुलासाठी दि चिल्ड्रन्स एड सोसायटीने व्यापक कार्य करावे. यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

  मुंबईतील दि चिल्ड्रन्स एड सोसायटीच्या नियामक परिषदेची बैठक मुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि महिला, बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री राज्य अतिथीगृहात ते बोलत होते. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता, मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद, महिला आणि बालविकास विभागाचे प्रधान सचिव संजयकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, सचिव प्रवीण दराडे, नितीन करीर, असीम गुप्ता, सोसायटीचे कोषाध्यक्ष शरद दवे, नियामक परिषदेचे सदस्य विश्वनाथ चौधरी, अरुणा आचार्या, डॉ. सुहासिनी भंडारे, मिलींद तुळस्कर, सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बापूराव भवाने आदी उपस्थित होते.

  मुख्यमंत्री म्हणाले, सोसायटीने त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जमिनीचा मास्टर प्लॅन तयार करावा. त्याचे सुयोग्य नियोजन करून, निधीची उपलब्धता करून बालकांच्या विकासासाठी विविध उपाययोजना राबविण्यात याव्यात. विशेष करून वंचित बालकांच्या हिताच्या दृष्टीने योजनांची आखणी करण्यात यावी. यासाठी शासनामार्फत दि चिल्ड्रन्स एड सोसायटीला संपूर्ण सहकार्य करण्यात येईल. वंचित बालकांच्या विकासासाठी मुंबईत चांगले आणि आदर्शवत असे बालगृह, बालसुधारगृह उभारण्याकामी सोसायटीने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

  वंचित बालकांना न्यायासाठी व्यापक प्रयत्न- पंकजा मुंडे
  श्रीमती मुंडे म्हणाल्या, रस्त्यावर राहणारी मुले, बालकामगार, अनाथ मुले यांचा प्रश्न खूप गंभीर आहे. या वंचित मुलांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाच्या महिला आणि बालविकास विभागामार्फत करण्यात येत आहे. यासाठीच राज्यातील बालगृहांच्या कामकाजात पारदर्शकता येण्याच्या दृष्टीने त्यांचे वर्गीकरण तसेच थर्ड पार्टी ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि चिल्ड्रन्स एड सोसायटीसारख्या संस्थांनीही बालविकासाच्या कार्यक्रमाला गतिमान करुन वंचित बालकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा, असेही त्या म्हणाल्या.