• 3f6e8933-60d8-46ce-9227-a5646c6c8180

  जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध- पंकजा मुंडे

  अहमदनगर : सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून राज्यात काम करीत असलेले शासन जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही ग्रामविकास, महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

  पाथर्डी तालुक्यातील पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी श्रीमती मुंडे बोलत होत्या. याप्रसंगी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार मोनिका राजळे, जि.प.चे बांधकाम समितीचे सभापती बाबासाहेब दिघे, समाजकल्याण सभापती मिराताई चकोर, जि.प. सदस्या योगिताताई राजळे, उज्ज्वलाताई शिरसाट, माजी आमदार राजीव राजळे, दगडू पाटील-बडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद जगताप आदी उपस्थित होते.

  श्रीमती मुंडे म्हणाल्या, आम्हाला एक वर्षात काय केले असा प्रश्न विचारला जात आहे. एक वर्षात जलयुक्त शिवारसारखी योजना राबविली. 1400 कोटी रुपयात 70 हजार गावामध्ये ही योजना करण्याचा निर्णय घेतला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अन्न सुरक्षा योजना सुरु करुन यामध्ये जनतेसाठी 2 रुपये किलो गहू व 3 रुपये किलो तांदुळ यासारखे अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. या पुढील वर्षात जनतेच्या कल्याणासाठी लोकाभिमुख निर्णय घेवून जनतेच्या विकासासाठी हे शासन नवा इतिहास घडविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले.

  जलयुक्त शिवार ही योजना कै. गोपीनाथ मुंडे यांची संकल्पना होती. ऊस तोड मजूर, गरीब, कष्टकरी, शेतकरी यांच्या मुलांचे जीवन बदलण्यासाठी लवकरच शिक्षण योजना राबविली जाणार असून या योजनेमधून या मुलांचे भविष्य रेखाटण्याचे काम आम्ही करणार आहोत. तसेच ऊसतोड मजुरांना घरकुल योजनेच्या माध्यमातून हक्काचे घर देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही श्रीमती मुंडे म्हणाल्या.

  ऊसतोड कामगारांच्या पगारात वाढ झाली पाहिजे, यासाठी मी शासनस्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करेन. ग्रामीण भागातील शेतकरी आपली शेती सोडून शहराकडे धाव घेत आहेत. त्यांना गावातच राहून स्वाभिमानाने जीवन जगण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरु करण्याचा निर्णय घेतला. या योजनेतून शहरातील सर्व प्रमुख रस्ते थेट ग्रामीण भागापर्यंत जोडून रोजगाराची संधी गावातच उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा निर्धार आहे, असेही त्यांनी सांगितले.

  प्रारंभी पाथर्डी येथील पार्थ विद्या प्रसारक मंडळ बाबजी आव्हाड विद्यालय येथे कै. लोकनेते गोपीनाथ मुंडे इनडोअर स्टेडियमचे उद्घाटन श्रीमती मुंडे यांच्या हस्ते झाले.

  प्रा. शिंदे म्हणाले, जलयुक्त शिवारसारखी योजना राबवून पाथर्डी तालुक्यातील 50 गावांना लाभ मिळाला. ऊसतोड कामगारांचा संप रास्त आहे, पण त्यांनी तो लोकशाही मार्गाने करावा. त्यांच्या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी आपण पंकजाताईसोबत आहोत.

  तरुण बेरोजगारांसाठी लवकरच पोलीस भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. राज्यात पोलिसांची 60 हजार पदे रिक्त असून पुढील वर्षी आणखी 20 हजार पदांची यामध्ये भर पडणार आहे. पोलीस भरती ही महत्वाची बाब आहे. शासन ही त्यासाठी अनकुल आहे. येत्या डिसेंबरअखेर दुसऱ्या टप्प्यातील भरती करण्याबाबत लवकरच निर्णय होईल. यामध्ये 20 हजार पोलीस भरती होणार आहे. यापूर्वी पोलीस भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. पाथर्डी तालुक्यात अत्यंत सुबक अशी पंचायत समितीची इमारत उभी राहिली आहे. या इमारतीतून पाथर्डी भागातील जनतेची कामे सुलभ व सुकर होण्यास मदत होईल.

  प्रारंभी खासदार श्री. गांधी व पाथर्डी पंचायत समितीचे सदस्य देवीदास खेडकर यांनी मनोगत व्यक्त केले.

  आमदार श्रीमती राजळे म्हणाल्या, ऊसतोड कामगारांच्या मुलांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी शासनाने सर्वतोपरी मदत करावी. पाथर्डी येथे दोन कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या या इमारतीमधील ग्रामपंचायत खाते हे ग्रामविकास खात्याशी संलग्न आहे. त्यामुळे पाथर्डी तालुक्यातील जनतेला आपणाकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्या आपण जरुर पूर्ण कराल असा मला विश्वास आहे.

  प्रास्तविक पंचायत समितीचे सभापती संभाजीराव पालवे यांनी केले. कार्यक्रमाला पाथर्डी पंचायत समितीच्या उपसभापती बेबीताई केळगंद्रे, पंचायत समितीच्या सदस्या उषाताई अकोलकर, सदस्य काशिनाथ लवांडे, सदस्या कलावती गवळी, सदस्या सुमनताई खेडकर, सदस्य विष्णूपंत पवार, पाथर्डीचे उपविभागीय अधिकारी ज्योती कावरे, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके आदी उपस्थित होते.