• TNIMAGE80509beed done

  उच्च व दर्जेदार शिक्षणामुळे देशाचे भविष्य उज्ज्वल होईल – पालकमंत्री पंकजा मुंडे

  बीड : आजच्या युगामध्ये गुणवत्तेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुलांना लहान वयापासूनच चांगल्या मार्गदर्शनाबरोबरच उच्च व दर्जेदार शिक्षण दिल्यास त्यांचा उत्तम बौद्धीक विकास होऊन ही मुले भविष्यात देशाचे उज्ज्वल भविष्य घडविण्यामध्ये योगदान देतील, असा विश्वास पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.

  परळी येथील विद्यानगर येथे आयएएस स्टडी सर्कलचे उद्घाटन पालकमंत्री यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमास व्यासपीठावर मानव विकास मिशनचे आयुक्त भास्कर मुंडे, अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गिते, बीडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, नरेशचंद्र काठोळे, आयएएस सर्कलच्या संचालिका उषा किरण गिते, फुलचंद कराड आणि सूर्यकांत मुंडे यांची उपस्थिती होती.

  पालकमंत्री म्हणाल्या, शहरी भागाप्रमाणेही ग्रामीण भागातही चांगली बुध्दीमत्ता असलेले विद्यार्थी असतात पण त्यांना योग्य संधी व सोयी सुविधा न मिळाल्याने उच्च शिक्षण घेण्यामध्ये अडथळे येतात. विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन केवळ काही मर्यादित क्षेत्रामध्येच करीयर करण्यापेक्षा आपल्या भागातील समस्या व अडचणी लक्षात घेऊन प्रशासकीय सेवेमध्ये आल्यास त्यांना समाजाची सेवा करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.

  सध्या पावसाच्या अनियमिततेमुळे शेतीच्या उत्पन्नाचे प्रमाण कमी झाले आहे. शेतीवर अवलंबुन असणाऱ्या कुटूंबाची संख्या त्या प्रमाणात अधिक आहे. त्यामुळे शेतीव्यतिरिक्त रोजगाराच्या इतर संधी शोधणे आवश्यक असल्याने ग्रामीण भागातील मुलांनी आयएएस, आयपीएस आणि एमपीएससी सारख्या स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेमध्ये येण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले. जिल्ह्यात शिक्षणाच्या सुविधांसह इतर विकास कामे प्राथम्यक्रमाने करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

  कार्यक्रमाचे प्रास्ताविकात नरेशचंद्र काठोळे यांनी केले. यावेळी अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गिते, बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, आयएएस स्टडी सर्कलच्या संचालिका उषा किरण गिते, सूर्यकांत मुंडे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अमरावतीचे जिल्हाधिकारी किरण गिते यांनी लिहीलेल्या ‘सेव्हन स्टेप्स टू बीकम आयएएस’ या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. मकरंद जोगदंड आणि उषा मुंडे यांनी केले तर आभार दत्तात्रय काळे यांनी मानले.