• 56505053abeb0

  दीन दयाळ ग्रामीण कौशल्य विकास योजनेतून ५८ हजार तरुणांना मिळणार प्रशिक्षण, नोकरी-ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे

  महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या दीन दयाळ ग्रामीण कौशल्य विकास योजनेतून राज्यात येत्या दोन वर्षात साधारण ५८ हजार तरुणांना कौशल्य विकास विषयक प्रशिक्षण आणि नोकरी देण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज येथे दिली. बेरोजगारी निर्मुलनाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाकांक्षी योजना असून राज्यात ही योजना प्रभावीपणे राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
  मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची (चडठङच) दुसरी राज्यस्तरीय सभा झाली. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दिपक केसरकर, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुमन रावत, वरिष्ठ अधिकारी लिना बनसोड, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
  मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, राज्यात एमएसआरएलएमअंतर्गत कार्यरत बचत गटातील महिलांच्या कुटुंबातील बेरोजगार तरुणांना या योजनेतून कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच त्यानंतर संबंधीत प्रशिक्षण संस्थेकडूनच त्यांना नोकरी उपलब्ध करुन दिली जाईल. यासाठी राज्यातील दर्जेदार अशा प्रशिक्षण संस्था नेमण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. या प्रशिक्षण संस्थांबरोबर लवकरच सामंजस्य करार करुन राज्याच्या विविध भागात तातडीने ही प्रशिक्षणे सुरू केली जातील.
  या योजनेतून सुरक्षा रक्षक, ऑफिस बॉय, पँट्री बॉय, सेवा पुरवठा, हॉस्पीटॅलिटी, रिटेल ट्रेडींग, इव्हेंट मॅनेजमेंट, फिटर, वेल्डींग, इलेक्ट्रिशियन, शोरूम हॉस्टेसेस आदी विविध प्रकारची कौशल्यविकास विषयक प्रशिक्षणे दिली जातील. राज्यात यी योजना प्रभावीपणे राबवू, असे त्यांनी सांगितले.

  आत्महत्याग्रस्त भागात बचत गटांची चळवळ गतिमान करा
  त्या म्हणाल्या की, राज्यातील दुष्काळग्रस्त आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त भागामध्ये एमएसआरएलएमच्या माध्यमातून बचत गटांची चळवळ गतिमान करणे गरजेचे आहे. या भागातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामविकास विभागाने पुढाकार घेऊन मोहीम पातळीवर कार्यवाही करावी, असे त्या म्हणाल्या.

  बचत गटांसाठी व्याज अनुदान योजना
  मंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, राज्यात बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिला चांगले काम करीत आहेत. बँकांकडून कर्ज घेऊन उद्योग उभारणाऱ्या आणि त्या कर्जाची वेळेवर परतफेड करणाऱ्या बचत गटांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. यासाठी बचत गटांसाठी व्याज अनुदान योजना लागू करता येईल का, याचा अभ्यास करुन सविस्तर अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी याप्रसंगी ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.