• ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेने आपली गावे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करावा – पंकजा मुंडे

  बीड : आपले आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेने आपली गावे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

  खासदार प्रीतम मुंडे यांनी सांसद आदर्शग्राम योजनेसाठी निवडलेल्या परळी तालुक्यातील पोहनेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण व पोहनेर ते सिरसाळा आणि दिग्रस ते पोहनेर या रस्त्यांच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या सांसद आदर्श ग्राम योजनेमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांनी निवडलेल्या पोहनेर गावाने उत्तमोत्तम कार्य केले असून ग्रामस्थांच्या भरीव योगदानातून विविध विकास कामे होत असल्याचे सांगून पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पोहनेर गावच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर नक्कीच नोंद होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

  गेल्या दीड वर्षाच्या काळात पोहनेर गावामध्ये शासनाच्या वतीने तब्बल 9 कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण होत आली आहेत. पाणीपुरवठा आणि जलसंधारणाच्या कामासाठी जिल्ह्याला सर्वात जास्त प्रमाणात निधी आणता आला याचा मला अभिमान असून अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात निधी आणण्याची पहिलीच वेळ असल्याचे पालकमंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.

  पोहनेर गावातील शाळेसाठी 2 कोटी, रस्त्यांसाठी 4 कोटी आणि पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी 18 लाख 50 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगून श्रीमती मुंडे यांनी पुढील काळात पोहनेर गावाचा सर्वांगीन विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही दिली.

  शौचालय बांधकामासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन पोहनेर वासियांनी 100 टक्के शौचालय बांधून 2 ऑक्टोबरपर्यंत गाव हागणदरीमुक्त करावे, अशी सूचना करून पालकमंत्री मुंडे यांनी पोहनेर गावात ग्रामस्थांच्या सहभागातून विविध यशस्वी प्रकल्प राबविले जात असल्याबद्दल कौतूक केले. तसेच काटकसर करून कमी खर्चात उत्तम पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत बांधल्याबद्दल बांधकाम व्यावसायिकाचेही अभिनंदन केले.

  या समारंभात मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी मनोगत व्यक्त केले. पोहनेर गावातील विकासकामांची माहिती देऊन त्यांनी नाते जबाबदारीचे या उपक्रमाला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल सांगितले. आमचा गाव आमचा विकास या उपक्रमाबद्दल सांगून एक लक्ष शौचालय बांधण्याचा बीड जिल्हा परिषदेने संकल्प केला असल्याचे ननावरे यांनी स्पष्ट केले.

  यावेळी उद्घाटन करण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत बांधकामासाठी 20 लक्ष रुपये निधी उपलब्ध असताना कंत्राटदाराने काटकसर करून केवळ 17 लाख 50 हजार रूपयांमध्ये बांधकाम पूर्ण केले आहे. याशिवाय पोहनेर ते सिरसाळा या रस्त्याच्या कामासाठी 2 कोटी 46 लाख 55 हजार रूपये आणि दिग्रस ते पोहनेर रस्त्याच्या कामासाठी 47 लाखा 12 हजार रूपये खर्च येणार आहे. ही कामे नाबार्ड टप्पा 20 अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्ण करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास परिसरातील सरपंच, सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.