• जलयुक्तच्या कामांमुळे पाणीपातळी वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांची उन्नती होण्यास मदत- पंकजा मुंडे

  बीड : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून गावाशिवारातील पाणीपातळी निश्चितच वाढणार आहे आणि पर्यायाने परिसरातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

  शिरुर तालुक्यातील पाडळी येथे जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नाला खोलीकरण व त्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील जलसंचयाच्या पूजनप्रसंगी श्रीमती मुंडे बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, पाडळीचे सरपंच संतोष कंठाळे, सर्जेराव तांदळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

  श्रीमती मुंडे म्हणाल्या, टंचाई निवारणासाठी तसेच शाश्वत सिंचन उपलब्ध होण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरु केला आहे. या अभियानाअंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आणि दर्जेदार कामे झाली आहेत. नुकत्याच झालेल्या पावसामुळे जलयुक्तच्या कामांमध्ये चांगला जलसंचय निर्माण झाला आहे. या जलसंचयामुळे परिसरातील पाणी पातळी वाढण्याबरोबर विहीरी, बोअर यांनाही नवजीवन प्राप्त झाले आहे. जलयुक्तच्या या कामांच्या यशस्वीतेमुळे शेतकऱ्यांची उन्नती होण्यासही निश्चितच मदत होईल. शिरुर तालु्क्यात जलयुक्त शिवारच्या कामांबरोबर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून रस्त्यांची कामे मोठया प्रमाणात हाती घेण्यात येणार असून या कामांमुळे शिरुर तालुक्यातील गावांचा विकास होण्यास मदत होईल. तसेच तालुक्यातील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल.

  या बंधाऱ्यामुळे पाडळी गावपरिसरातील सात विहीरी आणि आसपासच्या शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. श्रीमती मुंडे यांनी पाडळी गावातील दलित वस्तीमधील समाज मंदीराला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

  पालकमंत्री पंकजा मुंडे यांची शांतीवन संस्थेस भेट
  श्रीमती मुंडे यांनी शिरुर तालुक्यातील आर्वी येथील भवानी विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठानच्या शांतीवन संस्थेस भेट देऊन पाहणी केली. त्या म्हणाल्या, आत्महत्याग्रस्त, वंचित आणि निराधार शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शासन विविध योजना राबवित आहे. परंतु शांतीवन संस्थेने सामाजिक भावनेमधून अशा विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण, वसतीगृह उपलब्ध करुन देऊन त्यांचे दु:ख कमी करण्याचा केलेला प्रयत्न हा निश्चितच अभिनंदनीय आहे. संस्थेने या मुलांचे बालपण न हरवू देता त्यांना चांगले शिक्षण देऊन एक संस्कारित पिढी घडविण्यासाठी हातभार लावावा.

  श्रीमती मुंडे यांनी शांतीवन संस्थेस स्व. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानकडून या वर्षीपासून दरवर्षी 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनी 1 लाख 51 हजार रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले. संतोष मानूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्री. राम, श्री.ननावरे, शांतीवन संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश जोशी, आर्वीच्या सरपंच श्रीमती जयश्री जोगदंड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

  यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निराधार विद्यार्थ्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात गौरव करण्यात आला. प्रारंभी शांतीवन संस्थेतील विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने श्रीमती मुंडे यांचे स्वागत केले. शांतीवनचे दीपक नागरगोजे यांनी संस्थेच्या कामाविषयी माहिती देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.