• 13925220_1061608803924680_8162661584987330261_n

  परस्पर सहकार्याने काम केल्यास जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल- पंकजा मुंडे

  स्वातंत्र्य दिनाचा समारंभ उत्साहात संपन्न

  बीड : जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने परस्पर सहकार्याने काम केल्यास जिल्ह्याचा अधिक वेगाने विकास‍ निश्चितच शक्य असल्याची ग्वाही देत पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील तमाम जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

  भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डी.व्ही.निला यांची प्रमुख उपस्थिती होती.

  जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द असल्याचा पुनरोच्चार करताना श्रीमती मुंडे म्हणाल्या, टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियानात 100 टक्के जलयुक्त शिवारची कामे पूर्ण केली आहेत आणि यावर्षी 256 गावे निवडण्यात आली आहेत. निवड करण्यात आलेल्या गावात 5 हजार 976 कामे प्रस्तावित असून या कामांसाठी 55 कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. या कामांमुळे सातत्याने टंचाईचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यातील जनतेला निश्चित दिलासा मिळणार आहे.

  टंचाई परिस्थितीत स्व. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यात महाआरोग्य शिबीर राबवून आरोग्यसेवेचा नवीन पॅटर्न निर्माण केला आहे. या शिबीरामध्ये अंदाजे 2 लाख रुग्णांनी लाभ घेतला आहे तसेच विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून रुग्ण बरे झाले असल्याचे सांगून त्यांनी बीड जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांना आय.एस.ओ. नामांकन प्राप्त असून 117 अंगणवाडी केंद्र हे डिजीटल करण्यात आलेली असल्याचे सांगितले.

  इंदिरा आवास योजनेचे स्वरुप बदलून पंतप्रधान आवास योजना असे करण्यात आले आहे. इंदिरा आवास योजनेअंतर्गत प्रती घरकुलासाठी आता प्रति घरकुलांना 1 लाख 20 हजार रुपये याव्यतिरिक्त शौचालयासाठी आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत वेळी निधी देण्यात येणार असून श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन मिशन अंतर्गत गावे विकसित करण्यासाठी जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा क्लस्टर निवडण्यात आले आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामासाठी यंदाच्या पुरवणी अर्थसंकल्पात 503 कोटी 92 लाख रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा रेल्वेमार्ग अधिक गतीने पूर्णत्वाकडे जाणार आहे. या कामांमुळे जिल्ह्याचा विकास होण्यास मोठा हातभार लागणार असल्याचा विश्वासही श्रीमती मुंडे यांनी व्यक्त केला.

  14 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना थेट मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. आयोगाच्या निर्देशानुसार आमचं गाव आमचा विकास उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून ग्रामविकासाला निश्चितच चालना मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

  श्रीमती मुंडे यांच्या हस्ते ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेतील लाभार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा-राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. महिला व बाल विकास विभागाच्यावतीने कन्या माझी भाग्यश्री आणि आरोग्य विभागाच्यावतीने अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथांचा शुभारंभही श्रीमती मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.

  सूत्रसंचालन ॲड. संगीता धसे व नितिन जाधव यांनी केले.