• 14088592_1070749013010659_595999880397125816_n

  आमचा गावा आमचा विकास कार्यक्रम राज्यात प्रभावीपणे राबविणार – पंकजा मुंडे

  पंढरपूर : गावांचा विकास व्हावा, गावे स्वयंपूर्ण बनावित यासाठी 14 व्या वित्त आयोगातून ‘आमचा गावा आमचा विकास’ हा कार्यक्रम राज्यात प्रभावीपणे राबविला जाईल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

  माळशिरस पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला, त्या प्रसंगी आयोजित समारंभात त्या बोलत होत्या. समारंभास सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, आमदार रामहरी रुपनवर, आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधिक्षक विरेश प्रभू उपस्थित होते.

  ग्रामविकासमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, 14 व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायातीसाठी आहे. यातून गावातील विकास कामे केली जाणार आहेत. या निधीमुळे गावांचा विकास होण्यास मदत होणार आहे. गाव, खेडी स्वयंपूर्ण झाली तर राज्याचा विकास जलदगतीने होईल, असेही ग्रामविकास मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या.

  सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे सांगून ग्रामविकास मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, विकास कामे जलदगतीने करण्यावर शासनाने भर दिला आहे. तसेच महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याबरोबरच मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु करण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा स्वनिधी वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यासाठी काही कामे बीओटी तत्त्वावर करुन घेतली जाणार आहेत.

  निरा-देवधर धरणाच्या कालव्यांची कामे अपूर्ण असल्याने माळशिरस तालुक्यातील काही भाग अविकसित राहिला आहे. कालव्यांच्या अपूर्ण कामासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

  पालकमंत्री श्री.देशमुख म्हणाले, निरा-देवधर धरणातील पाणी या भागासाठी मिळावे यासाठी नजिकच्या काळात जलसंपदा मंत्री यांच्यासमवेत बैठक घेतली जाईल. माळशिरस तालुका व जिल्ह्यात ग्रामविकासाच्या कामांना अधिक निधी मिळावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी बोलतांना केली. यावेळी आमदार प्रशांत परिचारक, आमदार रामहरी रुपनवर, सभापती श्रीमती बेंदगुडे यांनी मनोगत व्यक्त केले.

  समारंभास पंचायत समितीच्या सभापती रुपाली बेंदगुडे, उपसभापती शुभांगी देशमुख, अतीरिक्त पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले,अतीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपटराव बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई यांच्या अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.