• MNAIMAGE29561pankaja munde

  ग्रामीण भागातील नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

  मुंबई : ग्रामविकास विभागाच्या विविध योजना गतिमान करून त्याचा ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

  श्रीमती मुंडे यांच्या मंत्रालयीन दालनात आढावा घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यासह ग्रामविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, स्मार्ट ग्राम योजना, आमचा गाव – आमचा विकास, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना आदी विविध योजनांचा आढावा घेऊन विभागाचे कामकाज गतिमान करण्याचे निर्देश दिले.

  प्रत्येक गावात आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करा : पंकजा मुंडे

  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मंत्रालयातून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांशीही संवाद साधला.

  राज्यातील प्रत्येक गावांत ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. आमचा गाव-आमचा विकास या अभियानांतर्गत गावागावांमध्ये घेण्यात आलेल्या कार्यशाळांविषयीची माहिती त्यांनी यावेळी घेतली. या अभियानांतर्गत राज्यातील सर्व गावांचे विकास आराखडे तयार करण्यात येत आहेत. याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीचीही त्यांनी माहिती घेतली. ग्रामविकास विभागाच्या विविध योजना गतिमान करून त्याचा ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ मिळवून द्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.