• MNAIMAGE74694Pankaja munde

  अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने करावे- पंकजा मुंडे

  मंत्रालयात पालकमंत्री, खासदारांच्या उपस्थितीत बैठक

  मुंबई : अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने होण्याच्या दृष्टीने उर्वरित भूसंपादन लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. रेल्वे मार्गाचे काम गतिमान होण्याच्या दृष्टीने अडीअडचणी दूर करुन बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या रेल्वेमार्गाचे काम कोणत्याही परिस्थितीत आधी निश्चित केल्याप्रमाणे मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होण्याच्या दृष्टीने गतिमान कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

  श्रीमती मुंडे व बीडच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात यासंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी रेल्वे विभागाचे मुख्य अभियंता बी. के. टिरके, उपमुख्य अभियंता ए. के. तिवारी, रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी विद्याधर धांडोरे, रेल्वेचे कार्यकारी अभियंता सचिन मुंगसे, बीडचे अप्पर जिल्हाधिकारी अनिल पवार, उपजिल्हाधिकारी कल्याण बोडखे, चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी गणेश निऱ्हाळी, बीडचे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉ. विजय वीर आदी उपस्थित होते.

  भूसंपादनाचे काम जलदगतीने करा
  पालकमंत्री श्रीमती मुंडे व खासदार डॉ. मुंडे यांनी कामाच्या सद्यस्थितीसंदर्भात सविस्तर आढावा घेतला. कामात येणाऱ्या अडीअडचणी समजून घेतल्या. पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाचा प्रकल्प म्हणून अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम प्राधान्यक्रमावर घेतले आहे. केंद्र व राज्य शासनाने या प्रकल्पासाठी प्रथमच भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे. हे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने उर्वरीत भूसंपादनाचे काम जलदगतीने होणे गरजेचे आहे. यासाठी रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करुन उर्वरित जमीन तातडीने संपादीत करुन ती रेल्वेला उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

  काही गावामध्ये भूसंपादनाच्या मोबदल्याविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित प्रत्येक तालुक्यात नोडल ऑफिसरची नेमणूक करुन या अडचणी तत्काळ दूर कराव्यात. जिल्हास्तरावरही या कामी समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करुन भूसंपादन, त्याच्या सुनावण्या, शेतकऱ्यांना मोबदला आदी प्रश्न मार्गी लावावेत, असेही त्यांनी सांगितले.

  वाळू उपलब्धतेसाठी कार्यवाही करा
  रेल्वेच्या कामासाठी वाळूची अडचण येत असल्याचा प्रश्न याप्रसंगी उपस्थित झाला. रेल्वेचे काम हे लोकहिताचे आहे. त्यामुळे या बाबतीत पर्यावरणविषयक बाबींची पूर्तता करुन रेल्वेला तातडीने वाळू उपलब्ध होईल यादृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. काही ठिकाणी विजेचे टॉवर / खांब यांचा अडथळा होत असल्याचा प्रश्नही याप्रसंगी उपलब्ध झाला. यावर ऊर्जा विभागाच्या संबंधीत कार्यकारी अभियंत्यांशी दूरध्वनीवरुन बोलणे करुन हा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
  बीडच्या रेल्वेसाठी प्रथमच भरीव निधी- डॉ.मुंडे
  खासदार डॉ. मुंडे म्हणाल्या की, केंद्र शासनाने या प्रकल्पासाठी खूप मोठा निधी प्रथमच उपलब्ध करुन दिला आहे. मंजूर निधीपैकी बहुतांश निधी जिल्हा प्रशासन आणि रेल्वे विभागाला वर्ग करण्यात आला आहे. राज्य शासनानेही त्यांच्या हिश्यातील बहुतांश निधी उपलब्ध करुन दिला आहे. यापुढील काळातही या प्रकल्पासाठी कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही केंद्र शासनाने दिली आहे. आपणही यासाठी केंद्र शासनाकडे भक्कम पाठपुरावा करु. त्यामुळे या कामाला रेल्वे विभाग, बीड आणि अहमदनगर जिल्हा प्रशासनाने प्राधान्याचे स्थान देऊन अधिकाधिक गतीमान करावे व बीड जिल्ह्यातील नागरिकांचे रेल्वेचे स्वप्न लवकरात लवकर साकार होईल, यादृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.