• slider_new_03

  कुपोषणमुक्तीसाठी जच्चा बच्चा कार्यक्रम राबविणार- पंकजा मुंडे

  राज्यातील कुपोषण व बालमुत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यातील सात आदिवासी जिल्ह्यामध्ये बालके व मातांसाठी जच्चा -बच्चा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

  आज जव्हार मोखाडा या भागातील कुपोषणग्रस्त भागास मुंडे यांनी भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या , या दौऱ्या दरम्यान त्यांनी नुकतेच मोखाडा तालुक्यातील कळमवाडी येथील बालमृत्यु झालेल्या सागर वाघ व ईश्वर सवरा यांच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. या भेटी दरम्यान मंत्री मुंडे यांनी या दोन्ही कुटुंबियांच्या अडीअडचणी, व्यथा जाणून घेतल्या. बालमृत्यु झालेल्या दोन्ही बालकांच्या इतर भावंडाविषयी, त्यांच्या आरोग्याविषयी त्यांच्या कुटुंबियांकडे विचारणा केली. त्यांच्या आहाराकडे, औषधोपचाराकडे पर्यायाने आरोग्याकडे विशेष लक्ष पुरविण्याविषयी त्यांना सांगितले.

  यावेळी बोलतांना मुंडे म्हणाल्या, कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.महिला व बालकल्याण ,आदिवासी व आरोग्य या विभागांमध्ये समन्वय साधुन हे प्रमाण कमी करण्यासाठी ठेास उपाययोजना करण्यात येतील कुपोषणाची समस्या दुर करण्यासाठी त्याची कारणे शोधुन ती समुळ नष्ट करण्यासाठी आवश्यक ते प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. येथील अज्ञान अस्वच्छता ,उदासीन दृष्टीकोन हे घटक कारणीभुतअसल्याचे जाणवले आहे. या दृष्टीने सामाजिक प्रबोधन हेाणे गरजेचे आहे. भविष्यामध्ये सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून या लोकांमध्ये जागृती करण्यात येईल.

  जच्चा बच्चा कार्यक्रमाच्या माध्यमातुन शासन व प्रशासन एकत्रित येऊन या प्रश्नाची सोडवणुकीस प्राधान्य देणार असून दोन महिन्यातुन एकदा या सात आदिवासी जिल्ह्यांचा निवासी दौरा करुन समस्या सोडविण्यास चालना देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  या भागातील एकंदरीत जीवनशैली, भौगोलिक स्थिती इत्यादी घटकही कुपोषणासारख्या स्थितीस कारणीभूत आहेत. त्यामुळे इथल्या नागरिकांचे प्रबोधन होऊन त्यांना अज्ञानातून बाहेर काढणे हि खरे तर आजची गरज असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. कुपोषणासारखे अत्यंत दुर्दैवी परिस्थिती भविष्यात उद्भवू नये यासाठी शासनाकडून युध्द पातळीवर प्रयत्न होत असल्याचे त्या म्हणाल्या. यासाठी मातांना आहार पुरविणारी डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याकडेही शासन विशेष लक्ष पुरविणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

  या भागातील लोकांचे प्रबोधन केल्यामुळे ब-यापैकी प्रश्न सुटण्यास मदत होईल. जाणीवपूर्वक त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. बालमृत्यु सारख्या दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी शासन प्रभावी उपाययोजना आखणार असून या नवनिर्मित पालघर जिल्ह्यातील रिक्तपदे भरणे, अंगणवाड्या, ग्रामीण रुग्णालय, अंगणवाडी सेवीका यांच्या समस्या सोडविणे यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

  या दौऱ्या दरम्यान श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी मोखाडा विश्रामगृह येथे श्रीमती मुंडे यांना जव्हार-मोखाडा भागातील कुपोषणा विषयक निवेदन दिले.

  दौऱ्यात खा. ॲड. चिंतामण वनगा, आ. मनिषा चौधरी व पास्कल धनारे, जि. प. अध्यक्षा सुरेखा थेतले, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक शारदा राऊत तसेच शासकीय वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.