• mnaimage32839munde-australia

    ऑस्ट्रेलियाचे कौन्सुल जनरल टोनी हुबेर यांनी घेतली ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची सदिच्छा भेट

    मुंबई : ऑस्ट्रेलियाचे कौन्सुल जनरल टोनी हुबेर यांनी ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली.

    महिलांचे सक्षमीकरण, त्यांची सुरक्षितता, बाल हक्क संरक्षण, राज्यात सुरू असलेली ग्रामविकासाची चळवळ अशा विविध मुद्यांवर याप्रसंगी चर्चा झाली. मुलांच्या सुरक्षिततेसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘रक्षा’ या मोबाईल अॅपचे तसेच बाल हक्क आयोगाच्या ‘चिराग’ अॅपचे कौन्सुल जनरल टोनी हुबेर यांनी यावेळी कौतुक केले.

    यावेळी कौन्सुल जनरल टोनी हुबेर यांनी श्रीमती मुंडे यांना ऑस्ट्रेलिया भेटीसाठी निमंत्रण दिले. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये अधिवेशन सुरु असताना भेट द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. महिलांना समान हक्क मिळावेत, यासाठी जागतिक विचार मंच असावा, अशी चर्चाही यावेळी झाली. याप्रसंगी ऑस्ट्रेलियाचे व्हॉईस कौन्सुल जनरल टीम हॉल उपस्थित होते.