• mnaimage48524munde_dakshata-meet

  घरकुलांबरोबर मिळणार ‘निर्मल शोषखड्डे’ – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

  मुंबई : ग्रामीण भागातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामविकास आणि मनरेगा विभागाच्या सहभागातून ‘निर्मल शोषखड्डे’ ही योजना राबविण्यात येत आहे. घरातील सांडपाणी या शोषखड्ड्यांमध्ये जिरविल्यामुळे सांडपाण्याचे व्यवस्थापन होण्याबरोबरच गावे डासमुक्त होत आहेत. शासनामार्फत ग्रामीण भागात विविध योजनांमधून बांधण्यात येणाऱ्या घरकुलांमध्ये आता असे निर्मल शोषखड्डे बांधण्यात येतील, यासाठी घरकुलाच्या डिझाईनमध्ये बदल करणे व त्यासाठी आर्थिक तरतूद उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ग्रामविकास व मनरेगा विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

  ग्रामविकासच्या केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यासाठी येथील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ग्रामविकास विभागाचे राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार लक्ष्मण पवार, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, जलसंधारण विभागाचे सचिव पुरुषोत्तम भापकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव विवेक नाईक, केंद्र शासनाचे प्रतिनिधी डॉ.प्रशांत पटवर्धन, हर्षवर्धन पिंपरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  नांदेड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी निर्मल शोषखड्ड्यांची योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. ‘मनरेगा’ अंतर्गत ग्रामीण भागात असे शोषखड्डे बांधण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. आता ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम जाती आवास योजना, पारधी विकास योजना यामधून बांधण्यात येणाऱ्या घरकुलांमध्येही असे निर्मल शोषखड्डे बांधण्यात यावेत. यासाठी ग्रामविकास आणि रोजगार हमी विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.

  घरकुलाच्या बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या पात्र लाभार्थ्यांना एकत्र करुन त्यांना एकाच ठिकाणी जागा दिल्यास कॉलनी स्वरुपातील घरकुलांची निर्मिती करणे शक्य होईल. शिवाय यामुळे विविध आर्थिक-सामाजिक गटातील लोक एकत्र राहिल्याने एक प्रकारे सलोख्याच्या वातावरण निर्मितीसही मदत होऊ शकेल. ग्रामविकास विभागाने प्रायोगिक स्वरुपात काही ठिकाणी अशी योजना राबवावी, असे निर्देश यावेळी त्यांनी ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

  रेल्वे प्रकल्पांचे मातीकाम मनरेगातून
  राज्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या एकत्रित सहयोगातून विविध रेल्वे मार्ग निर्मितीचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांमध्ये माती कामाचा हिस्सा मोठा आहे. हे माती काम मनरेगातून केल्यास लोकांना रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच रेल्वे मार्गाच्या निर्मिती कामाला गती मिळू शकेल. शिवाय त्यामुळे या प्रकल्पांना मनरेगाचा मोठा निधीही उपलब्ध होऊ शकेल. रोजगार हमी विभागाने यादृष्टीने नियोजन करावे, असेही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.आमदार आदर्श ग्राम योजना व सांसद आदर्श ग्राम योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. बचतगटांना शून्यटक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देणारी सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना ही तळागाळापर्यंत पोहोचविण्यात यावी. यासाठी संबंधित ग्रामीण जीवनोन्नती अभियान विभागाने या योजनेचा प्रभावी प्रचार आणि प्रसिद्धी करुन लोकांना माहिती द्यावी, अशी सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

  पाणंद रस्ते निर्मितीला गती द्यावी – राज्यमंत्री दादाजी भुसे
  ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यावेळी म्हणाले, पाणंद रस्ते बांधणीचा कार्यक्रम ग्रामविकास विभागाने प्राधान्याने हाती घेणे गरजेचे आहे. यासाठी संबंधितांचा वेळोवेळी आढावा घेऊन ग्रामीण भागात पाणंद रस्त्यांच्या बांधकामांना गती देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. जागा उपलब्ध नसल्यास काही शेतकरी आपल्या शेतात घरकुल बांधण्याचा प्रस्ताव देतात. पण जिल्हा आणि तालुका पातळीवर याबाबत स्पष्टता नसल्याने यात अडचणी निर्माण होत आहेत. याबाबतीत ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा यंत्रणेला स्पष्ट सूचना देण्यात याव्यात. ग्रामीण भागातील अनेक निराधार लोक पात्र असूनही संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित आहेत. अशा लाभार्थ्यांपर्यंत ग्रामसेवक, तलाठी अशा स्थानिक कर्मचाऱ्यांनी स्वत:हून पोहोचून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे अनिवार्य करणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित विभागांनी सूचना द्याव्यात, असे राज्यमंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.