• mnaimage93772pankaja-munde

    चिक्की घोटाळा प्रकरणी पंकजा मुंडे यांना क्लीनचीट

    मुंबई- भाजपा सरकारमधील पहिला घोटाळा म्हणून गाजलेल्या महिला आणि बाल विकास विभागातील चिक्की घोटाळा प्रकरणी पंकजा मुंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने क्लीनचीट देत फाईल बंद केली आहे. तसा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गृह विभागाकडे पाठविला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस न्यायालयात दाद मागणार असल्याचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.

    महिला आणि बाल विकास विभागातर्फे राज्यातील अंगणवाडय़ांतील मुलांसाठी पोषण आहार म्हणून खरेदी केलेल्या चिक्की घोटाळय़ात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप विधिमंडळात आणि विधिमंडळा बाहेर झाले होते. चिक्की खरेदी करताना ई टेंडरींगचा वापर केला नाही, एकाच दिवसांत २४ कंत्राटे दिली, वितरित करण्यात आलेली चिक्की सदोष आहे, ज्या कंत्राटदाराला चिक्की निर्मितीचे आणि वितरणाचे कंत्राट दिले आहे, त्यांच्याकडे ती यंत्राणाच नाही, असे आरोप करण्यात आले होते.

    या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले होते. लाचलुपचपत विभागाने चौकशी करून आपला अहवाल गृह विभागाला पाठविला असून त्यात कोणताही ठपका ठेवलेला नाही. काही संशयास्पद नसल्याने ही फाईल बंद करीत असल्याचेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गृह विभागाला कळविले आहे.