• thequint_2016-01_738667ba-5d09-4b99-ab33-1736b1641b10_dsc00088

    निरुपयोगी प्लास्टिक रस्त्यांच्या कामांना वापरणार-पंकजा मुंडे

    मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत प्लास्टिक बंधनकारक

    निरुपयोगी झालेले प्लास्टिक आता रस्त्यांच्या कामांमध्ये वापरण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनें’तर्गत बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांमध्ये निरुपयोगी प्लास्टिक वापरणे बंधनकारक करण्यात आल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली.

    मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत जी कामे ५ लक्ष लोकसंख्येच्या शहरापासून ५० कि.मी. त्रिज्येच्या आत असतील अशा रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामात निरुपयोगी प्लास्टीकचा वापर बंधनकारक करण्यात येणार असून त्यापेक्षा जास्त अंतरासाठी काम केल्यासही त्याचे स्वागतच करण्यात येईल असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे ‘मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत निरुपयोगी प्लास्टीकचा वापर’ या संबंधित आयोजित बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.

    पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या की, प्लास्टीक घनकचरा व घनकचऱ्याची सुरक्षितपणे विल्हेवाट करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामात निरुपयोगी प्लास्टीकचा वापर केल्याने रस्त्याच्या टिकाऊपणामध्ये होणारी वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. शिवाय रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा निरुपयोगी प्लास्टीकचा वापर केल्यास ८ ते १० टक्के बचत होऊ शकणार आहे. यामुळे केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयानेही पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या कामातही उष्णमिश्रीत डांबरीकरणात निरुपयोगी प्लास्टीकचा वापर करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती मुंडे यांनी यावेळी दिली.