• ef0e57032515a2def2edf064e5ab4ad5_L

  पंकजा मुंडे आणि डॉ.अनिल अवचट यांच्या हस्ते कला प्रदर्शनाचे उद्घाटन

  भारतीय परंपरेपासून ते अत्याधुनिक चारचाकी गाडयांपर्यंत रेखाटलेल्या पेटिंग्जमधून रंगांचा खळखळता प्रवाह अभिव्यक्त झाला. ग्रामीण जीवनशैली, राजस्थानी संस्कृती, केरळचे निसर्गसौंदर्य, अजिंठा लेण्यांमधील शिल्पकलांचे पेंटिंग आणि छायाचित्रांचे एकाच कलादालनात आयोजित प्रदर्शनात सादरीकरण होत असताना सूर्यास्त, पंढरीची वारी यांसारख्या छायाचित्रांनी देखील रसिकांना भूरळ घातली.

  निमित्त होते, एक कलाविष्कार या घोले रस्त्यावरील राजा रवी वर्मा आर्ट गॅलरीमध्ये आयोजित केलेल्या कला प्रदर्शनाचे. प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रामविकास, महिला व बालकल्याण राज्यमंत्री पंकजा मुंडे आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.अनिल अवचट यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार विजय काळे, रवि अनासपुरे, अभिनेते व दिग्दर्शक मिलिंद दास्ताने, नगरसेविका निलिमा खाडे, बाळासाहेब किरवे आदी उपस्थित होते. या प्रदर्शनात विनय जोशी, दिनेश किरवे, मोमिता निकम, भाग्यश्री गोडबोले, कैवल्य रंगारी व निशाद मानकर या कलाकारांच्या 150 कलाकृतींचा समावेश आहे.

  पंकजा मुंडे म्हणाल्या की, कॅमे-यामधील आधुनिक अविष्कारांमुळे चित्रांसमोरील आव्हान वाढले आहे. रसिकांसमोर आपल्या कलाकृतीची भूरळ कशी पडली पाहिजे, याचे आव्हान चित्र काढणा-या कलाकारांसमोर आहे. त्यामुळे त्यांच्या मेहनतीला आणि सातत्याला आपण प्रोत्साहन द्यायला हवे. कोणत्याही व्यक्तीमध्ये कला असली, तरी त्याला जगण्याची एक वेगळी दृष्टी मिळते. त्यामुळे तरुणांनी अशा वेगवेगळ्या कलांमधून आपले करिअर निवडायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

  डॉ. अनिल अवचट म्हणाले की, भारतातील शिल्पकला ही प्रगत कला आहे. मात्र, चित्रकला तेवढी पुढे गेलेली नाही. कॅमे-याच्या माध्यमातून छायाचित्र तंतोतंत टिपले जाते. तसाच प्रयत्न चित्रकलेच्या माध्यमातून प्रकाश आणि सावलीच्या खेळांचे कॅनव्हासवर दर्शन घडवित, हे कलाकार करीत आहेत. छायाचित्रण कलेमुळे चित्रकलेला रस्ता बदलावा लागला असला, तरी अशा तरुण कलाकारांकडे पाहिले की दोन्ही कलांमधील फरक जवळपास संपलेला असल्याचे जाणवते, असेही त्यांनी सांगितले.

  हे प्रदर्शन रविवार,(22 जानेवारी) पर्यंत सकाळी 11 ते रात्री 8 यावेळेत हे प्रदर्शन विनामूल्य खुले असणार आहे. अभिमन्यू निकम यांनी सूत्रसंचालन केले. भाग्यश्री गोडबोले यांनी प्रास्ताविक केले. बाळासाहेब किरवे यांनी आभार मानले.