• TNIMAGE49835beed-munde

  सामान्य माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील- पंकजा मुंडे

  अंबाजोगाई तालुक्यात विविध विकासकामांचा शुभारंभ

  बीड : सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून शासन विविध विकासाच्या योजना राबवित आहे. या योजनांच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत विकास पोहोचवून त्यांच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी शासन आणि प्रशासन प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

  श्रीमती मुंडे यांच्या हस्ते अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा बु., राडी, मुडेगाव आणि बर्दापूर या गावातील विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन आणि शुभारंभ करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. खासदार डॉ. प्रितम मुंडे, रमेश आडसकर, चाकूरचे माजी आमदार गोविंद केंद्रे यांची यावेळी विशेष उपस्थिती होती.

  श्रीमती मुंडे म्हणाल्या, यावर्षी परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील जलयुक्तच्या कामांमध्ये तसेच गावशिवारामध्ये मुबलक पाणी संचय निर्माण झाला आहे. त्यामुळे यावर्षीची पीक परिस्थिती चांगली आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला चांगला भाव मिळण्यासाठी चांगली बाजारपेठ उपलब्ध असणे गरजे आहे. त्यासाठी गावांना मुख्य मार्गाशी जोडणारे रस्तेही असणे तितकेच महत्वाचे असल्याने जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत परळी मतदारसंघात विशेष बाब म्हणून जास्त लांबीच्या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. या रस्त्यामुळे दळणवळण सुलभ व जलदगतीने होणार असल्याने शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा आर्थिक स्तर उंचावून पर्यायाने परळी मतदारसंघाच्या विकासाला निश्चितच चालना मिळणार आहे. तसेच सन 2018 पर्यंत रस्त्याचे एकही काम प्रलंबित राहणार नाही. रस्त्यांबरोबरच रेल्वेमार्गाच्या कामासाठी 2800 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असल्याने लवकरच जिल्ह्यातून रेल्वे धावेल आणि त्या माध्यमातूनही जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

  जिल्ह्यातील रस्त्यांसह शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आदी मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्यावरही भर देण्यात येत असून या सर्व योजनांच्या माध्यमातून ग्राम विकासाचा मार्ग सुकर होणार आहे. या सर्व योजनांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्यामुळे या विकास योजना पूर्णत्वास नेण्यासाठी कोणती अडचण येणार नाही, अशी ग्वाही श्रीमती मुंडे यांनी दिली.

  शेतकऱ्यांना योग्य दाबाने आणि नियमित विद्युत पुरवठा करण्यासाठी नवीन विद्युत उपकेंद्रे, ट्रान्सफार्मर आदी उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच इंदिरा आवास योजना, संजय गांधी निराधार योजना आदी विशेष सहाय्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना देऊन त्यांचेही जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. विकास कामे करताना पदाधिकारी आणि अधिकारी यांनी समन्वयाने काम करावे. तसेच ही विकासाची कामे दर्जेदार झाल्यास याचा दीर्घकाळपर्यंत होणार असल्याने या कामांबाबत ग्रामस्थ, अधिकारी आणि पदाधिकारी यांनी दक्ष रहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

  यावेळी डॉ. मुंडे, श्री. केंद्रे यांनीही मनोगत व्यक्त केले. बर्दापूर येथील आत्महत्या केलेले शेतकरी वैजनाथ हाके यांच्या कुटुंबियांना मान्यवरांच्या हस्ते एक लाख रुपयाच्या मदतीच्या धनादेशाचे वितरणही करण्यात आले. यावेळी नेमाजी देशमुख, बिभीषण फड, जि.प. सदस्य गयाताई कराड, दत्ता पाटील, नरसिंग कदम, शिवाजी मोरे, प्रदीप गंगणे, श्रीमती शारदाताई गंगणे यांच्यासह अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार शरद झाडके, जलसंधारण विभागाचे उप अभियंता एच.आर.मुंडे यांच्यासह जोडवाडी, उजनी, पट्टीवडगाव परिसरातील पदाधिकारी, नागरिक यांची उपस्थिती होती.

  विकास कामांचा शुभारंभ

  श्रीमती मुंडे यांच्या विकासपर्व दौऱ्यात धानोरा बु. येथील वाघाळा-राडी-धानोरा या 56 कि.मी. रस्त्याचे 30 लाख रुपये खर्चून करण्यात येणाऱ्या डांबरीकरण व नूतनीकरण कामाचे भूमिपूजन, प्रवासी निवाऱ्याचे लोकार्पण करण्यात आले. तर मुडेगाव येथील 6 लाख खर्चून बांधण्यात येणाऱ्या अंगणवाडी बांधकाम, मंदिरासमोर 3 लाख खर्चून पेव्हर ब्लॉक बसविणे आणि दलितवस्तीमध्ये 6 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या सभागृह बांधकाम आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

  बर्दापूर येथील गावांतर्गत रस्ते बांधकामाचे भूमिपूजन आणि प्रवासी निवाऱ्याचे लोकार्पणही करण्यात आले. तसेच राडी येथील कब्रस्तान संरक्षक भिंत बांधकामचे भूमिपूजन, रस्ता बांधकाम आणि प्रवासी निवाऱ्याचे लोकार्पण करण्यात आले.