• 16640541_1248263651925860_8240831079326116881_n

  बीडच्या विकासासाठी नाही तर मुंडेंना रोखण्यासाठी बारामतीने बीडला आमदार दिले – ना. पंकजाताई मुंडे

  जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता आणण्याचे केले आवाहन

  आष्टी / शिरूर / पाटोदा दि. 11 ——बीड जिल्हयाच्या विकासाशी बारामतीला काहीही देणेघेणे नाही, त्यांनी बीडला आमदार दिले ते लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांना रोखण्यासाठी, विकासासाठी नाही अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंञी ना. पंकजाताई मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला.

  जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीतील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कडा (आष्टी), घाटशीळ पारगाव व चुंबळी फाटा येथे ना. पंकजाताई मुंडे यांच्या आज रेकाॅर्डब्रेक सभा झाल्या. सभेला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही असे चित्र निर्माण झाले आहे.

  ना. पंकजाताई मुंडे यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला. बारामतीच्या पुढाऱ्यांना निवडणूक आली तरच बीड जिल्हा आठवतो, त्यांना इथल्या विकासाशी कसलेही देणेघेणे नाही असे सांगून त्या म्हणाल्या की, बीड जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्याला दुष्काळ मुक्त करण्यासाठी व बळीराजाला सुखी करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान सारखी यशस्वी योजना राबविली. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण व जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करुन शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं. राज्यभरात 35 हजार किमीचे रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून उभे करण्याचं उद्दिष्ट आहे.

  लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेतला भाजपच्या स्थापनेपासून पक्षात राहून त्यांनी राजकारणात गरूडझेप घेतली. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री होण्याचा मान या बीड जिल्ह्याच्या लोकांच्या पाठिंब्यावर त्यांनी मिळवला असे त्या म्हणाल्या.

  70 हजार कोटीत एक तरी बंधारा बांधला का?
  ———————————
  राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता असताना सिंचनाच्या नावाखाली 70 हजार कोटी हडप केले, हया कामात एक तरी बंधारा जिल्हयात बांधला का? असा सवाल ना. पंकजाताई मुंडेंनी भाषणात केला. दुष्काळी व मागासलेला जिल्हा म्हणून लागलेला कलंक पुसण्यासाठी सत्तेच्या माध्यमातून आपण जिल्हाभर करोडो रुपये खर्च करून जलसंधारण, कृषी, आरोग्य, शिक्षण यासह रेल्वे व दळण वळणाचे मोठे प्रकल्प पूर्ण करण्याचे काम हाती घेतले आहे. राज्याच्या ग्राम विकास मंत्रालयाचे सूत्र हाती घेतले तेव्हा राज्यभरात चार लाख कुटुंबियां कडे घरकुल बांधण्यासाठी स्वतः ची जागा नव्हती, तातडीने पंडित दीनदयाळ घरकुल अर्थ सहाय्य योजना आणून त्या कुटुंबियांना स्वतः ची जागा घेण्यासाठी अनुदान मंजूर केले असल्याचे सांगून जिल्हाभरात शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी फिल्टर प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहेत. ग्राम विकास विभागातुन राबविण्यात येणाऱ्या योजनांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करत असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही विकासाचे राजकारण करत असल्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले. या सभेस आ.भीमराव धोंडे, माजी आमदार साहेबराव दरेकर, बाळासाहेब अजबे, विजय गोल्हार तसेच भाजपचे उमेदवार उपस्थित होते.