• 17264979_1278182348933990_2344068192134632096_n

  म्हैसाळ प्रकरणाचा तपास महिला पोलीस अधिकाऱ्यांकडे देणार- पंकजा मुंडे

  सांगली : म्हैसाळ येथील भारती हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात व भ्रूणहत्या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. ही घटना अतिशय दुःखद, खेददायी आणि संतापजनक आहे. यामध्ये दोषींवर कडक कारवाई केली जाईल. तसेच, या प्रकरणाचा तपास महिला व डॉक्टर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवला जाईल. त्याचबरोबर भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी पी. सी. पी. एन. डी. टी. कायद्याच्या माध्यमातून एक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. मात्र आई-वडिलांनीही मुलीचा जन्म घेण्याचा अधिकार हिरावून घेऊ नये, असे आवाहन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज येथे केले.

  म्हैसाळ येथील भारती हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात व भ्रूणहत्येबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख, कृषि व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, आमदार विलासराव जगताप, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र खेबुडकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय सांळुखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राम हंकारे आदि उपस्थित होते.

  श्रीमती मुंडे आणि पालकमंत्री श्री.देशमुख यांनी संयुक्तरीत्या सर्व घटनेचा बैठकीत सविस्तर आढावा घेतला. म्हैसाळ घटनेची संपूर्ण माहिती, आतापर्यंत केलेली कारवाई, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. म्हैसाळ प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या सांगली शहरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दीपाली काळे यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात येत आहे. त्यामुळे तपासाला आणखी चांगली गती व दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करून महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (गर्भलिंग निदान प्रतिबंध) (पी. सी. पी. एन. डी. टी.) कायद्याच्या माध्यमातून एक मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्याअंतर्गत जिल्हा शल्यचिकित्सक, तालुका आरोग्य अधिकारी, महसूल आणि पोलीस यंत्रणा यांचे पथक तयार करून प्रत्येक तालुक्यामध्ये अशा घटना रोखण्यासाठी पाऊल उचलले जाणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

  मुलगाच पाहिजे हा दुराग्रह चुकीचा असून भविष्यातील चिंता वाढवणारा आहे, असे सांगून महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, म्हैसाळसारख्या घटना रोखण्यासाठी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियान सुरू केले आहे. पण, हे अभियान तेव्हाच यशस्वी होऊ शकते, जेव्हा समाजामध्ये स्त्री-पुरूष असा भेद करणे थांबेल. यासाठी मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याची आणि यंत्रणेवर वचक असण्याची गरज आहे. त्यासाठी देशात आणि राज्यात केंद्रीयस्थित यंत्रणा असावी, असाही शासनाचा मानस आहे. याबाबत आपण केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री मनेका गांधी तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

  म्हैसाळची घटना खूप गंभीर आहे. एखादा जीव जन्माला येणे हा निसर्गाचा अधिकार आहे. तंत्रज्ञान, शिक्षण आणि पैसा वाढत चालला आहे. त्यातून मुलगाच वारसदार हवा, हा दुराग्रहही वाढत चालला आहे. त्यामुळे विकसित तंत्रज्ञान आणि वैद्यकीय ज्ञानाचा चुकीचा वापर करत असतील, त्यांना क्षमा नाही. गर्भात वाढणारा जीव मुलगा किंवा मुलगी असो, आई-वडिलांनी त्याचा स्वीकार करावा. त्यात मुलगा किंवा मुलगी असा भेद करू नये, त्यांना समान मानले पाहिजे. ही मानसिकता तयार होणे गरजेचे आहे. यासाठी राज्य शासन माझी कन्या भाग्यश्री, सुकन्या समृद्धी योजना, बेटी बचाओ, बेटी पढाओ सारख्या योजना राबवत आहे. त्यामधून स्त्री जन्माचे स्वागत झाले पाहिजे, असा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र, केवळ शासनाने प्रयत्न करून चालणार नाही. तर आई-वडिलांनीही मुलीचा जन्म घेण्याचा अधिकार हिरावून घेऊ नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.