• 17424756_1288659117886313_2447333624743693436_n

  बीड झेडपीवर भाजपचा झेंडा

  बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी भाजप, शिवसेना, शिवसंग्राम व राष्ट्रवादीचे माजी आमदार सुरेश धस समर्थक पाच सदस्यांची मोट बांधली. त्यामुळे अध्यक्षपदी भाजपच्या सविता गोल्हार तर उपाध्यक्षपदी शिवसंग्राम पक्षाच्या जयश्री मस्के विजयी झाल्या.
  बीड जिल्हा परिषदेच्या साठ गटात सर्वाधिक २५ सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले होते. तर भाजपचे एकोणीस व एक अपक्ष सदस्य भाजपसोबत होता. त्यामुळे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या जवळ जाईल अशी स्थिती होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी वाढली. सुरेश धस, जयदत्त क्षीरसागर, अक्षय मुंदडा विरुद्ध धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, प्रकाश सोळंके या मुख्य दोन गटातील भांडणे टोकाला गेली. माजीमंत्री सुरेश धस यांनी पक्षाविरोधात जाऊन पाच जिल्हा परिषद सदस्यांनी भाजपला मदत केली. निवडीआधी दोन तास सुरेश धस यांचे पाच सदस्य विशेष हेलिकॉप्टरने बीडला आणण्यात आले.
  त्यापूर्वी जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा पालवे, आमदार विनायक मेटे, माजी आमदार बदामराव पंडित एका हेलिकॉप्टरने बीडला आले. त्यावरून भाजप, सेना, शिवसंग्राम नेते एकत्र असल्याचे सिद्ध झाले. सुरेश धस यांच्या सोबत बीडमध्ये एक बैठक पार पडली. अध्यक्षपदासाठी आष्टीमधील धामणगाव गटातून निवडून आलेल्या सविता गोल्हार व उपाध्यक्षपदासाठी जयश्री मस्के यांच्या नावावर एकमत झाले.
  राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी व्हीप बजावून अध्यक्षपदासाठी मंगला सोळंके व उपाध्यक्ष पदासाठी शिवकन्या सिरसाट यांची नावे फायनल केली होती. भाजपचे एकोणीस व एक अपक्ष, शिवसंग्रामचे चार, शिवसेनेचे चार व काँग्रेसचा एक व सुरेश धस समर्थक पाच सदस्य मिळून चौतीस सदस्य झाले. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश धस समर्थक पाच सदस्यांनी पक्षविरोधी भूमिका स्पष्टपणे घेतली. जयदत्त क्षीरसागर समर्थक एक राष्ट्रवादी सदस्य गैरहजर राहिला. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले. काँग्रेसचे दोन आणि काकू-नाना आघाडीचे तीन सदस्य राष्ट्रवादी सोबत होते.
  दुपारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठीच्या निवडणूकीसाठी पिठासीन अधिकारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली बीड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षपदासाठी भाजप, शिवसेना, शिवसंग्रामकडून सविता गोल्हार आणि राष्ट्रवादीच्यावतीने मंगल सोळंके यांनी तर उपाध्यक्षपदासाठी शिवसंग्राम पक्षाच्या जयश्री राजेंद्र मस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवाजी सिरसाट यांनी पिठासीन अधिकारी यांच्याकडे नामनिर्देशन पत्रे सादर केली होती.
  अध्यक्षपदासाठी गोल्हार यांना ३४ मते पडली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सोळंके यांना २५ मते मिळाली. उपाध्यक्षपदासाठी मस्के यांना ३४ मते पडली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी शिवकन्या सिरसाट यांना २५ मते मिळाली. नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड घोषित केल्यानंतर भाजप, शिवसेना, शिवसंग्राम कार्यकर्त्यांनी आंनद उत्सव साजरा केला.
  पालकमंत्री पंकजा मुंडे, आमदार विनायक मेटे, बदमराव पंडित यांनी उघड्या जीपमधून मिरवणूक काढली. जिल्हा परिषद निवडणुकीत साठ पैकी वीस सदस्य भाजपचे निवडून आले होते. पंकजा मुंडे यांच्या परळी तालुक्यात तर भाजपला खाते उघडता आले नव्हते. तरीही सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडाळीचा फायदा पंकजा मुंडेंनी घेतला. बंधू धनंजय मुंडे यांचे सहकारी माजी मंत्री सुरेश धस यांना राष्ट्रवादीपासून दूर करीत त्यांनी जिल्हा परिषदेवर भाजप मित्रपक्षाची सत्ता आणली. त्यामुळे एका अर्थाने पंकजाची धनंजय मुंडे यांच्यावर मात करून सरशी केली आहे. राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद ताब्यात घेऊन पंकजा मुंडेंनी राजकीय नव्या समीकरनाची नांदी केली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
  जिल्हा परिषद अध्यक्षा सविता गोल्हार म्हणाल्या, ‘ग्रामविकास मंत्री पंकजा पालवे यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करू. सामान्य माणूस आणि शेतकऱ्याच हिताचे काम करू. ’ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते बजरंग सोनवणे यांनी जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेत कौल दिला. मात्र, आमच्यातील काही नेत्यांनीपक्षाशी गद्दारी करून भाजपच्या हातात सत्ता सोपवली. ज्या सदस्यांनी पक्षविरोधी कारवाई केली त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे सांगितले.
  निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्या समवेत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, तहसीलदार आशिषकुमार बिरादार, उपकोषागार अधिकारी लहू गळगुंडे आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांपैकी आठ पंचायत समित्यांचे सभापतीही यावेळी उपस्थित होते.

  सुरेश धस यांना मिळणार बक्षीसी
  जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीत राष्ट्रवादीचे पाच सदस्य माजी मंत्री सुरेश धस यांनी भाजपच्या तंबूत नेऊन सोडले. धस यांनी धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांना या कृतीने धक्का दिला आहे. मात्र, याची बक्षिसी सुरेश धस यांना मिळणार अशी चर्चा आज बीडमध्ये दिवसभर होती. त्यांना आगामी काळात विधान परिषदेवर जाण्याची संधी मिळू शकते. त्यासोबतच पंकजा मुंडे यांना धस सारखा अनुभवी आणि चतुर राजकारणी सहकारी जिल्ह्यात सोबत आला असल्याने पंकजाच्या राजकारणाला धसांची साथ लाभली असेच म्हणावे लागेल.