• बीड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास हेच ध्येय- पंकजा मुंडे

  बीड : जिल्ह्याच्या विकासाचे पाहिलेले कै. गोपीनाथराव मुंडे यांचे स्वप्न पूर्ण करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे, अशा शब्दात पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

  अंबाजोगाई येथील अपर पोलीस अधीक्षक कार्यालय आणि अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या प्रशासकीय इमारतीच्या उदघाटनप्रसंगी श्रीमती मुंडे बोलत होत्या. यावेळी आमदार आर.टी. देशमुख, आमदार संगीता ठोंबरे, नगराध्यक्षा रचना मोदी, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, अप्पर जिल्हाधिकारी राम गगरानी, अपर पोलीस अधीक्षक हरी बालाजी, सहाय्यक पोलीस अधीक्षक विशाल आनंद, फुलचंद कराड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. पाटील आदींची उपस्थिती होती.

  श्रीमती मुंडे म्हणाल्या की, राज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कै. गोपीनाथराव मुंडे यांनी केलेल्या कामगिरीची आठवण अजूनही महाराष्ट्राला आहे. विशेषत: मुंबईसह राज्यातील गुन्हेगारांविरुद्ध केलेली कडक कारवाई आणि घातलेला पायबंद विसरता येणार नाही. त्यांच्या दुरदृष्टीच्या उपाययोजना नेहमी स्मरणात राहतील. पोलीस दलाचे मनोबल उंचावण्याचे काम आजही शासन करीत असल्याचे स्पष्ट केले.
  सर्वसामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी शासन-प्रशासनाने एकमेकांच्या हातात हात घालून काम करायला हवे. पोलीस दलानेही असेच काम करावे. शासन पोलीस दलाला सक्षम करण्यावर तसेच मुलभूत सेवा सुविधांच्या विकासावर विशेष लक्ष देत असल्याचेही त्या म्हणाल्या.

  बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गाच्या विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरु असून जवळपास 4600 कोटी रुपयांचा निधी येत्या 2019 पर्यंत मिळणार आहे. या रस्ते विकासाच्या कामामुळे दळणवळणाची साधने समृद्ध होणार आहेत. जिल्ह्यातील रेल्वेमार्गाच्या कामालाही गती मिळाली असून लवकरच काम पूर्ण होणार आहे. यामुळे बीड जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे. पोलीस दलाच्या या नवीन इमारतीमधून पीडितांना न्याय मिळेल आणि पोलीस दलाचा सकारात्मक धाक कायम राहिल, अशी अपेक्षा व्यक्त करुन त्यांनी जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये महिलांसाठी स्वच्छतागृह आणि विशेष कक्ष स्थापन केल्याबद्दल पोलीस दलाचे विशेष कौतुक केले.

  श्रीमती मुंडे यांच्या हस्ते पोलीस दलाच्या महिला सुरक्षा जनजागृती कार्यक्रम तसेच महिलांविषयक कायद्यांची माहिती देणाऱ्या `स्वयंसिध्दा` या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांनी पोलीस दलाच्या मुलभूत सेवासुविधांच्या कामांची माहिती देत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या प्रश्नांविषयी लक्ष वेधले. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी प्रास्ताविकात जिल्ह्यातील पोलीस दलाच्या नवीन प्रशासकीय इमारती, आय.एस.ओ. मानांकनाची कार्यवाही तसेच सीसीटीव्ही यंत्रणेच्या कामाची माहिती दिली.