• sangali

    सांगली : एल्गार-against-आघाडी-सरकार

    भ्रष्ट आणि घोटाळेबाज कॉंग्रेस आघाडी सरकारची सत्ता उलथवून टाकून केंद्रात आणि राज्यात सत्तापरिवर्तन व्हावे. युवकांमध्ये याबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने भाजपा युवा आघाडी मोर्चातर्फे एल्गार पुकारण्यात आला असल्याची माहिती भाजपा राज्य युवा मोर्चाच्या अध्यक्षा पंकजा मुंडे-पालवे यांनी आज सांगलीत पत्रकार परिषदेत दिली. कॉंग्रेस आघाडी सरकारचा भ्रष्ट कारभार, घोटाळे, वाढती महागाई, रुपयाचे अवमूल्यन यामुळे देशातील जनतेत सरकारविरोधात असंतोष पसरला आहे. आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यात सत्ता परिवर्तन व्हावे याबाबत युवक आणि नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने राज्यभर भाजपा युवा आघाडी मोर्चातर्फे एल्गार मेळावे आयोजित करण्यात येत असून त्याची सुरवात ९ ऑगस्टपासून तूळजापूर येथून करण्यात आली आहे. तूळजापूरनंतर पुणे आणि त्यांनतर आज सांगलीत हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. युवकांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी या मेळाव्यामधून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये १८ ते २५ वयोगटातील युवकांची भाजप पक्षाला पसंती मिळावी आणि भाजपची ताकद वाढावी, हा यामागील प्रमुख उद्देश आहे. उठ युवा जागा हो, सत्ता परिवर्तनाचा धागा हो, हे या एल्गार मेळाव्याचे ब्रीदवाक्य आहे. युवकांना रोजगार मिळावा, उद्योगनिर्मिती वाढावी, दुष्काळी भागातील विदयार्थ्यांचे परीक्षा आणि शिक्षण शुल्क माफ व्हावे हा या मेळाव्याचा मुख्य अजेंडा आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या ही पुरोगामी महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. जादूटोणा विरोधी विधेयकास आमचा पाठिंबा आहे. महाराष्ट्रात स्त्रियांवरील अत्याचार वाढत आहेत. कडक शिक्षेची गुन्हेगारांना भीती नसल्याने बलात्काराचे गुन्हे वाढत आहेत. कडक कायदे करण्याची सरकारची इच्छाशक्ती नाही, या प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक कोर्टांची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे असेही यावेळी मुंडे म्हणाल्या.