• pune

    पुणे : एल्गार-against-आघाडी-सरकार

    आगामी निवडणुका जिंकण्यासाठी आपसातील मतभेद, हेवेदावे विसरून एकत्र या. मतांचे विभाजन करणाऱ्या पक्षाच्या मागे जाऊ नका. राज्यातील सरकारच्या विरोधात युवकांच्या मनात मशाल पेटली असून ती विधानसभेवर भगवा फडकवल्याशिवाय शांत होणार नाही, अशी घोषणा करत भारतीय जनता पक्षाच्या आमदार पंकजा पालवे-मुंडे यांनी शुक्रवारी आघाडी सरकारच्या विरोधात एल्गार केला. भाजयुमोतर्फे आघाडी सरकारच्या विरोधात क्रांतिदिनानिमित्त एल्गार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील मेळाव्यात भाजयुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अनुराग ठाकूर, आमदार पंकजा पालवे यांची प्रमुख उपस्थिती होती. शहराध्यक्ष अनिल शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, प्रदेश चिटणीस प्रा. मेधा कुलकर्णी, युवा मोर्चाचे प्रदेश चिटणीस सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष गणेश घोष, नगरसेविका निलीमा खाडे यांचीही या वेळी उपस्थिती होती. भाजपसाठी देशात चांगले वातावरण आहे. निवडणुका जिंकायच्या असतील, तर आपापसातील मतभेद, पक्षांतर्गत वादविवाद आता दूर ठेवले पाहिजेत. मला सन्मान मिळाला नाही, मला खुर्ची दिली नाही, हे विचार आता सोडून द्या आणि निवडणुकीतील यशासाठीच झटून काम करा, असे आवाहन या वेळी बोलताना आमदार मुंडे यांनी केले. मतांचे विभाजन करणाऱ्या पक्षाच्या मागे गेल्यामुळेच आपला पराभव झाला. गेल्या लोकसभेत पुण्याची आपली हक्काची जागा आपल्याला गमवावी लागली, असेही त्या म्हणाल्या. जनतेचा हक्काचा पैसा राज्यातील सरकारने घोटाळ्यांमध्ये बुडवला आहे. गुन्हेगारीसह अनेक प्रश्न, समस्या वाढत आहेत. त्यामुळे आता युवकांनी सरकारला जाब विचारला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले. देशात सुरू असलेल्या कोणत्याही घोटाळ्याचा जाब जनतेला द्यावा लागू नये, यासाठी काँग्रेसतर्फे देशात सातत्याने वाद निर्माण केले जात आहेत. देशातील महिला, जवान, शेतकरी यांचा केंद्रातील सरकारने अपमान केला आहे. या परिस्थितीत देशात भाजपचे रामराज्य आणण्याची जबाबदारी युवकांनी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन खासदार ठाकूर यांनी केले. फक्त घोषणा करून निवडणुका जिंकता येणार नाहीत, तर प्रत्येक मतदान केंद्रनिहाय युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे संघटन करावे लागेल, असेही ते म्हणाले. मेळाव्याच्या प्रारंभी शहर भाजयुमोतर्फे दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.