• रामराज्य आणण्यासाठी शिरपूरच्या धर्तीवर वैद्यनाथ पॅटर्न निर्माण करू : आ.पंकजा पालवे

    परळी (parali) – दुष्काळी परिस्थितीत उद्‌भवणाऱ्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर पाणी साठवण बंधाऱ्याची कामे आदर्श पध्दतीने करून तालुक्यात जलसंधारणाच्या कायाचा वैद्यनाथ पॅटर्न निर्माण करून अशी ग्वाही आ.पंकजाताई मुंडे-पालवे यांनी आज बोलताना दिली.

    वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना व वैद्यनाथ सर्वांगिण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर जलसंधारणाच्या कामाचा शुभारंभ आ.पालवे यांच्या हस्ते आज वैद्यनाथ कारखान्याजवळ कौठळी शिवारात श्रीफळ फोडून व मशिनरीची पूजा करून करण्यात आला, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते आर.टी.देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून परळी पं.स.सभापती लक्ष्मीबाई फड, वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव, जि.प.सदस्य वृक्षराज निर्मळ, आशाताई किरवले, पं.स.सदस्य सतीश मुंडे, प्रा.बिभीषण फड, भास्कर रोडे, सुग्रीव मुंडे, वैद्यनाथ कारखान्याचे संचालक माधवराव मुंडे, वैद्यनाथ बॅंकेचे संचालक रमेश कराड, डॉ.शालिनी कराड, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष सुरेश माने, भाजपचे सरचिटणीस सुधाकर पौळ, युवा मोर्चाचे सरचिटणीस मुन्ना काळे, वैद्यनाथचे कार्यकारी संचालक अशोक पालवे उपस्थित होते.

    दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यात सध्या पाण्याची फार मोठी समस्या निर्माण झाली आहे. भाजपा नेते खा.गोपीनाथराव मुंडे यांच्या संकल्पानुसार जिल्ह्यात सर्वत्रे शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर बंधारे बांधण्यात येणार आहेत. या बंधाऱ्यामुळे पाण्याची साठवण क्षमता वाढणार असून भविष्यात पाणीटंचाई निर्माण होणार नाही, अशा पध्दतीने ही कामे हाती घेण्यात आली आहेत. कौठळी शिवारात एक किमी लांबीचा नाला 50 फूट रुंद व 25 फूट खोल करण्यात येणार असून त्यावर सुमारे 25 लाख रुपये खर्च करून तीन बंधारे बांधण्यात येणार असल्याचे आ.पालवे म्हणाल्या. या बंधाऱ्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरणार असून परिसरातील विहीरीला व बोअरला चांगले पाणी लागेल. पाण्याची नैसर्गिक पातळी तर वाढेलच त्याचबरोबरच गाळ ट ाकल्यामुळे जमिनीचा कसही सुधारेल असेही त्यांनी सांगितले. खा. मुंडे यांनी उपमुख्यमंत्री असताना जिल्ह्यात कोट्यवधी रुपये खर्च करून सिंचन क्षमता वाढवल्यामुळे शेतकरी आज सुखात आहे. जेथे ओटी भरायलाही ऊस नव्हता त्या ठिकाणी आज शेतकऱ्यांनी ऊसाचे उत्पादन करून आपले जीवनमान उंचावले असल्याचे त्या म्हणाल्या. वैद्यनाथ कारखान्यात खा.मुंडे यांनी ऊसाचे अथवा पाण्याचे कधीही राजकारण केले नाही. प्रत्येक कामात राजकारण आणण्याचा उद्योग सध्या सुरू असून जनताच याला कंटाळली आहे. जलसंधारणाच्या कामाचा रामनवमीच्या दिवशी शुभारंभ करण्याचा हाच हेतू होता की, प्रभू रामचंद्रांनी एक वचनी राहून जसे राज्य केले त्याप्रमाणे जनतेला दिलेले वचन पुर्ण करण्याचा आम्ही निर्धार केला आहे. परळीत रामराज्य आणण्याचा आपला संकल्प असल्याचे आ.पालवे म्हणाल्या. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष आर.टी.देशमुख यांनी आपल्या भाषणात शिरपूर पॅटर्न राबवून खा.मुंडे, आ.पंकजाताई यांनी या परिसरात दुसरी क्रांती केल्याचे सांगितले. जनतेच्या कामासाठी आ.पंकजाताई करीत असलेल्या कष्टाचे त्यांनी तोंडभरून कौतुक केले.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यनाथ कारखान्याचे व्हाईस चेअरमन नामदेवराव आघाव यांनी तर संचलन व आभार ज्ञानोबा सुरवसे यांनी मानले. कार्यक्रमास पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.