वैद्यनाथ पॅटर्न’ने केली 10 गावे जलस्वयंपूर्ण
– आमदार पंकजा मुंडे- पालवे यांचा पुढाकार
– 3300 कोटी लिटर पाण्याची साठवण
– सव्वा कोटी रुपयांचा खर्च
– वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने दिला निधी
बीड जिल्ह्यातील परळी व अंबाजोगाई तालुक्यांत जलसंवर्धनाचा पथदर्शी वैद्यनाथ पॅटर्न राबविण्यासाठी आमदार पंकजा मुंडे- पालवे यांनी पुढाकार घेतला. वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, वैद्यनाथ सर्वांगीण विकास संस्था यांतून निधी उभा करत भर दुष्काळात केलेल्या पहिल्याच प्रयत्नात तब्बल दहा गावे जलसाक्षर झाली. “शिरपूर पॅटर्न’च्या धर्तीवर गावांची गरज व भौगोलिक परिस्थितीनुसार राबविलेल्या या पॅटर्नमुळे गावशिवारातील विहिरींची पाणीपातळी वाढली. प्रकल्पामुळे संपूर्ण गावे बदलली असा दावा नसला तरी पीकपद्धती बदलून अर्थकारणाला गती आणि गावे जलस्वयंपूर्ण झाली, हेच या पॅटर्नचे ठळक यश पुढे आले आहे.
आमदार पंकजा मुंडे- पालवे यांच्या पुढाकारातून बीड जिल्ह्यात परळी व अंबाजोगाई तालुक्यांतील 10 गावे पथदर्शी वैद्यनाथ पॅटर्न प्रकल्प राबविण्यासाठी निवडण्यात आली. संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळी झळा तीव्र होत असतानाच खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरवात झाली.
कामाची सुरवात
प्रथम दोन्ही तालुक्यांचा भौगोलिक अभ्यास झाला. माजी आमदार पाशा पटेल यांच्या नेतृत्वाखाली पथक नेमण्यात आले. धुळे जिल्ह्यात जलसंवर्धनात देशभर नावारूपाला आलेल्या शिरपूर येथे (शिरपूर पॅटर्न) पथकाने भेटही दिली. लोकसहभाग वाढावा यासाठी सरपंच, उपसरपंच, सेवा सोसायटीचे चेअरमन, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी यांचा सहभाग घेत जिल्हापातळीवर जलसंकल्प परिषदेच्या रूपाने कार्यशाळा घेण्यात आली. ज्येष्ठ भूजलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांच्यासह अन्य तज्ज्ञांनी जलसाक्षरतेचे धडे दिले. लोकसहभाग वाढू लागला. गावात जुन्या बंधाऱ्यांच्या दुरुस्तीपासून थेट नव्याने नाला खोलीकरणाची कामे सुरू झाली. नवा वैद्यनाथ पॅटर्न त्यातून जन्माला आला, त्यातून पहिल्याच टप्प्यात तब्बल दहा गावे जलसंपन्न झाली.
अशी झाली कामे
परळी व अंबाजोगाई तालुक्यांतील गावांमध्ये नाल्यांचे रुंदीकरण, खोलीकरण व गरज असलेल्या गावात नव्याने बंधारा बांधण्याचे काम हाती घेतले. कौठळी, दौनापूर, धर्मापुरी, पट्टीवडगाव, घाटनांदूर, रेवली, सिरसाळा, वाका, नाथ्रा, उजनी या गावांत एका पाठोपाठ कामे पूर्ण केली. या गावांमधील नाल्यांत गाळ साचला होता. झाडाझुडपांनी नाल्याला वेढले होते. त्याची साफसफाई करून खोलीकरण करण्यात आले. उत्तम साइड असलेल्या गावात नव्याने प्रकल्प पूर्ण करण्यात आला. पावसाचे तीन महिने उलटले तरी त्याची समाधानकारक नोंद नसलेल्या बहुतांश गावांमधील प्रकल्प पाण्याने तुडुंब भरले आहेत. सुमारे दहा गावांत नदी- नाल्यांवर 22 बंधारे साकारले. निवृत्त शाखा अभियंता मारोतीराव वनवे, निवृत्त अभियंता श्री. मिसाळ यांनी तांत्रिकदृष्ट्या काम पूर्ण होण्याकडे लक्ष घातले. आधुनिक यंत्रांच्या साह्याने पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण व्हावीत असे नियोजन होते. यासंदर्भात समन्वयाची जबाबदारी पाहणारे लक्ष्मीकांत कराड यांनी कामे वेळेत व दीर्घकालीन व्हावीत यावर भर दिला.
पीकपद्धती बदलली
“वैद्यनाथ पॅटर्न’च्या यशस्वी कामांमुळे बहुतांश गावांमध्ये पीकपद्धतीत आमूलाग्र बदल घडला आहे. खरिपात सोयाबीन आणि कपाशी एवढीच पिके घेणारी गावे भाजीपाला पिकाकडे वळली आहेत. परळी व अंबाजोगाई बाजारपेठ जवळच असल्याने बाजारपेठेचीही अडचण दूर झाल्याचे शेतकरी सांगतात.
* हजार एकर क्षेत्राला सिंचनाचा लाभ
दहा गावांत साकारलेल्या वैद्यनाथ प्रकल्पामुळे सुमारे एक हजार एकर शेती सिंचनाखाली येईल असा अंदाजही पहिल्या टप्प्यात बांधण्यात आला आहे. ऊसक्षेत्रही 300 एकरांपर्यंत वाढण्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.
वैद्यनाथ प्रकल्पाचे असे झाले फायदे –
1. गावातच पाण्याची बॅंक निर्माण झाल्याने गावे जलस्वयंपूर्ण होण्यास मदत झाली.
2. जुन्या तलावांचे खोलीकरण व रुंदीकरण केल्यामुळे पाझर क्षमता वाढली, त्यामुळे भूजलपातळी उंचावण्यास मदत झाली.
3. शेतकरी नगदी पिकांकडे वळू लागले. खरिपासोबतच रब्बी पिकांचे यशस्वी उत्पादन घेणे शक्य होणार असून, उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर होणार आहे.
4. जलसंधारण कामांमुळे पहिल्याच पावसात बंधारे तुडुंब भरले. गावातील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी भरल्या व योजना ——– सुरू होण्यास मदत झाली.
5. प्रकल्पाकडे सुरवातीला दुर्लक्ष करणारा शेतकरी आता स्वतःहून पुढाकार घेऊ लागला आहे.
6. गावशिवारातील पाणी पातळी वाढल्यामुळे शेतकऱ्यांत उत्साह वाढला.
7. उसाचे क्षेत्र वाढून 300 एकरांपर्यंत येण्याचा अंदाज
8. हजार एकरांच्या जवळपास दुबार पिकांसाठी लाभ
9. दहा गावांतील पाणीटंचाई दूर झाली.
10. बंधाऱ्यात मत्स्यबीज सोडून शेतकरी मत्स्यपालनही करू लागले.
“”वैद्यनाथ पॅटर्न राबविलेल्या गावांमध्ये सकारात्मक परिणाम समोर येऊ लागले आहेत. दुष्काळमुक्त गावे निर्माण करण्यासाठी केलेला पहिला प्रयत्न यशस्वी होत असल्याचा आनंद मोठा आहे. यापुढेही गावागावांत याच पद्धतीने प्रकल्प राबविण्याचा मानस आहे.”
– पंकजा मुंडे- पालवे, आमदार, परळी, जि. बीड
“”परळी व अंबाजोगाई तालुक्यांतील दहा गावांत “वैद्यनाथ पॅटर्न’चे काम पूर्ण झाले आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या या गावांत पहिल्याच पावसात बंधारे पाण्याने भरले. तज्ज्ञांच्या मते सुमारे 3300 कोटी लिटर पाणी या माध्यमातून साठविले व जिरवले जाणार आहे. गावातील विहिरींना मुबलक पाणी आले आहे. शेतकरी नव्या पिकांच्या शोधात आहेत.”
– लक्ष्मीकांत कराड, समन्वयक, वैद्यनाथ पॅटर्न, परळी, जि. बीड
अशी आहेत जलस्वयंपूर्ण गावे
पट्टीवडगाव पूर्वी गावातील विहिरींना अत्यंत कमी पाणी होते. वैद्यनाथ पॅटर्नचे काम पूर्ण झाले अन् पहिल्याच पावसात विहिरींना पाणी वाढले. याच पाण्याच्या भरवशावर ऊस लागवड झाली आहे. खरिपात सोयाबीन व रब्बीत गहू घेणे शक्य होणार आहे.
– हरिश्चंद्र वाकडे- 9422079526
पट्टीवडगाव, ता. अंबाजोगाई, जि. बीड
* उजनी
प्रकल्पापूर्वी गावातील विहिरींना दहा फूटही पाणी येत नव्हते. बहुतांश बोअरवेल बंद पडले होते. दोन बंधाऱ्यांच्या प्रस्तावित बाजू सोडून अर्धा किलोमीटर अंतरापर्यंत खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. प्रकल्पानंतर गावशिवारातील विहिरी तुडुंब भरून वाहू लागल्या आहेत. बंद पडलेले बोअरवेलही सुरू झाले आहेत. गावच्या पाणीपुरवठा योजनेला 95 टक्के फायदा झाला आहे. खरीप व रब्बी दोन्ही पिके घेता येणे शक्य आहे. उन्हाळ्यातही पाणीटंचाई भासणार नाही.
– साहेबराव माने- 9767991489
उजनी, ता. अंबाजोगाई, जि. बीड
* वाका
वाका गावात जुन्या नाल्याचे खोलीकरण केल्यामुळे पाणीसाठवण क्षमता वाढली. गावातील विहिरींनाही पाणी वाढले आहे. सद्यःस्थितीत पाऊस नसल्याने कपाशीला याच प्रकल्पातून पाणी देण्यात येत आहे. दुष्काळी स्थितीत गाव पाण्याबाबतीत स्वयंपूर्ण झाले आहे. विहिरीवरून पाणी वाहू लागले आहे. बंधारेही पूर्णपणे भरले आहेत. वर्षभर भाजीपाला पिके घेणे शक्य होणार आहे.
– विजय कराड- 9422243765
– मुकिंदा भास्कर- 9637179400
वाका, ता. परळी, जि. बीड
धर्मापुरी
गावात नदीवरील सिमेंट बंधाऱ्यांचे रुंदीकरण व खोलीकरण केले. पूर्वी बंधारे गाळामुळे भरले होते, त्यामुळे साहजिकच पाणी टिकत नव्हते. गावातील याच बंधाऱ्यांना नव्याने आकार देण्यात आला, त्यामुळे आजघडीला दीड किलोमीटर अंतरापर्यंत खोलीकरण व रुंदीकरण केलेले बंधारे तुडुंब भरले आहेत. तीस फूट विहिरीही पाण्याने भरल्या आहेत. खरीप, रब्बीसह भाजीपाला शेतीसाठी फायदा होणार आहे.
निळकंठ खुशालराव फड- 9423774716
धर्मापुरी, ता. परळी, जि. बीड
* दौनापूर
गावालगत असलेल्या बंधाऱ्यात पूर्वी अवघे दीड फूट पाणी राहात होते. वैद्यनाथ प्रकल्पात गावाचा समावेश झाला अन् बंधाऱ्यातला गाळ उपसला. बंधाऱ्याचे रुंदीकरण- खोलीकरण झाले. 180 मीटर लांब व एक ते दीड फूट खोलीत वाढ केल्याने पाणीसाठवण व झिरपण क्षमतेत वाढ झाली. दुष्काळमुक्त गावाकडे व प्रगतिशील शेतीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
– प्रकाश प्रल्हाद मिटकरी- 9765144891
दौनापूर, ता. परळी, जि. बीड
नाथ्रा
गावात तीन ठिकाणी नाला खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. 28 फूट खोल व 27 फूट रुंदीच्या या कामांमुळे गावालगतच्या विहिरींच्या पाणीपातळीत सुमारे 70 टक्के वाढ झाली. शेतीसाठी पाण्याचा लाभ झालाच, शिवाय गाव पाण्याच्या बाबतीत नक्कीच स्वयंपूर्ण झाले याचा आनंद वाटतो. ऊस लागवड वाढणार असून, शेतीच्या उत्पादनातही निश्चितपणे वाढ होईल.
– फुलचंद मुंडे- 9421346352
नाथ्रा, ता. परळी, जि. बीड
घाटनांदूर
गावात दोन सिमेंट बंधाऱ्यांत जलसंवर्धनाचा प्रयोग करण्यात आला. कठीण खडक फोडून काम पूर्ण करण्यात आले. त्यामुळे विहिरींच्या पाणीपातळीत वाढ झाली. पावसाने दडी मारली तरी पहिल्या पावसाचे प्रकल्पात साठलेले पाणी फळशेतीसह सोयाबीन व अन्य पिकांना देता आले. पाऊस नसल्याचा दरवर्षी पिकांवर होणारा परिणाम यंदा होणार नाही. बंधाऱ्यात मत्स्यबीजही सोडण्यात आले आहे. याचा दुहेरी लाभ मिळणार आहे.
– धनंजय जाधव- 9421342242
घाटनांदूर, ता. अंबाजोगाई, जि. बीड
रेवली
गावातील सिमेंट बंधाऱ्याला गळती होती. बंधाऱ्यात पाणी साठविले जात नव्हते. सिमेंट बंधाऱ्याच्या वरील भागात खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. गावातील शेती शिवाराला चांगलाच फायदा मिळाला आहे.
– सुरेश बाबूराव बनसोडे
रेवली, ता. परळी, जि. बीड
सिरसाळा
गावात प्रकल्पापूर्वी पाण्याची समस्या होती. एका बंधाऱ्याचे खोलीकरण, रुंदीकरण झाले. गावात ऊस, सोयाबीन व कापूस या पिकांना तुटीच्या काळात पाणी देण्यासाठी आधार झाला. एका कामानंतर एवढा बदल, तर कामांची संख्या वाढवली तर गावाचे संपूर्ण चित्र बदलायला वेळ लागणार नाही. प्रकल्पांतर्गत असलेल्या विहिरीला अवर्षणस्थितीतही काठोकाठ पाणी आहे. विहिरींच्या याच पाण्यावर सद्यःस्थितीतही कपाशी व ऊस तरला आहे.
तारकमल शिवलाल ललवाणी- 9421350794
सिरसाळा, ता. परळी, जि. बीड
संपर्क : लक्ष्मीकांत कराड- 9422328429
समन्वयक, वैद्यनाथ पॅटर्न, परळी, जि. बीड
वैद्यनाथ पॅटर्न कामाचा सविस्तर तपशील
गावाचे नाव एकूण कामे एकूण लांबी (मीटरमध्ये)
कौठळी 03 1100
दौनापूर 01 180
धर्मापुरी 02 400
पट्टीवडगाव 02 375
घाटनांदूर 02 400
रेवली 03 200
सिरसाळा 01 400
वाका 03 600
नाथ्रा 02 300
उजनी 02 400
गावालगत साकारलेल्या प्रकल्पात सव्वा किलोमीटर लांब, 50 ते 60 फूट रुंद, तर तब्बल 40 फुटांपर्यंत खोलीचे काम करण्यात आले. आता पाणी साठवणक्षमतेत वाढ झाली आहे. प्रकल्पाच्या अवतीभवती असलेल्या विहिरी पूर्ण भरल्या आहेत. पावसाच्या खंडाच्या काळात पिकांना पाणी देणे शक्य झाले. पीक उत्पादकता वाढवणे शक्य होणार आहे. प्रकल्पापूर्वी तासभर चालणारा मोटरपंप आता दिवसभर चालविणे शक्य झाले आहे.
नामदेवराव आघाव, 9623443702
कोठळी, ता. परळी, जि. बीड
1 Comment
Best of Luck Pankaja Tai