• MNAIMAGE6321munde

  अंगणवाडी कर्मचारी आणि पर्यवेक्षिकांच्या मागण्यासंबंधी सकारात्मक विचार करणार- पंकजा मुंडे

  मुंबई : राज्यातील अंगणवाडी कर्मचारी आणि पर्यवेक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी संबंधित विभाग आणि संघटनेच्या प्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात येईल. विधी व न्याय विभागाचा सल्ला घेवून अभ्यास करून संघटनेच्या मागण्यावर सकारात्मक विचार करुन निर्णय घेण्यात येणार असल्याचे महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

  मंत्रालयातील त्‍यांच्या दालनात आयोजित महाराष्ट्र अंगणवाडी सहाय्यक प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका संघ आणि महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांच्या विविध मागण्यासंदर्भात आयोजित बैठकीत श्रीमती मुंडे बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव संजीवकुमार, उपसचिव श्री.चव्हाण, संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

  श्रीमती मुंडे म्हणाल्या, राज्य शासन अंगणवाडी कर्मचारी आणि पर्यवेक्षक यांच्या समस्यांबाबत सकारात्मक आहे. ही योजना केंद्र शासनाची आहे. राज्य शासनामार्फत राबविण्यात येत आहे. अंगणवाडीसेविका, मदतनीस मानधनी पदे असल्यामुळे त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वार्षिक वेतनवाढ तसेच इतर लाभ नसले तरी त्यांच्या मानधन व इतर बाबींसाठी वित्त विभाग, नियोजन विभाग व विधी व न्याय विभागाचा सल्ला घेवून अभ्यास करुन निर्णय घेण्यात येणार आहे.

  अंगणवाडीसाठी पुरविण्यात येणारी औषधे आणि इतर साहित्य अंगणवाडीपर्यंत पोहचविण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांना एक महिना सुट्टी देण्याचा विचार सुरु असून ज्येष्ठ अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन नवीनपेक्षा जास्त असण्याच्यादृष्टीनेही विचार केला जाईल. अंगणवाडीसेविका व मदतनिसांचे मानधन मागील महिन्यापर्यंत वितरीत करण्यात आले आहे. सेविका व मदतनिसांचे मानधन वेळेवर प्राप्त व्हावे यासाठी ऑनलाईन मानधन वितरीत करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

  एकात्मिक बालविकास सेवा योजना व केंद्र पुरस्कृत योजनेतील अंगणवाडीसेविका आणि मदतनिसांना देण्यात येणाऱ्या शासनाच्या नियमित मानधनात १ एप्रिल २०१४ पासून अंगणवाडीसेविकांना ९५० रुपये, अंगणवाडी मदतनिसांना ५०० रुपये व मिनी अंगणवाडी सेविकांना ५५० रुपये अशी मानधन वाढ करण्यात आलेली आहे. यासाठी ११३ कोटी ३९ लाख रुपयांची पुरवणी मागणी हिवाळी अधिवेशनात मंजूर झालेली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन नियमित वितरीत करण्यात येणार असून यासाठी निधी उपलब्ध असल्याचेही श्रीमती मुंडे यांनी सांगितले.

  राज्यातील सुमारे २ लाख ६ हजार १२५ सेविका, मदतनिस व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या बँक‍ खात्यात मानधन जमा होत आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सरकार नेहमीच सकारात्मक विचार करीत असून २ वर्षांची भाऊबीज भेट आणि साड्यांचे पैसेही वितरीत करण्यात आले आहेत. तसेच यापुढेही अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सरकार सकारात्मकच विचार करील, असे त्यांनी सांगितले.

   

   

 • 12509004_943098052442423_4444537774333180500_n

  सामुहिक शेतीचा वापर करुन पाणी बचत करणार- पंकजा मुंडे

  औरंगाबाद : इस्त्राईल देशातील सामुहिक शेती पद्धतीचा तसेच पाणी बचतीच्या उपाययोजनाचा वापर करुन मराठवाड्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्रामविकास, जलसंधारण, रोजगार हमी योजना आणि महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.जलयुक्त शिवार अभियान व नदी पुनर्जीवन योजनेचे सादरीकरण व चर्चासत्र कार्यक्रमात श्रीमती मुंडे बोलत होत्या. कार्यक्रमाला कॉन्सुलेट जनरल ऑॅफ इस्त्राईलचे डेव्हिड अकाव्ह, आमदार अतुल सावे, जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी, अर्थतज्ज्ञ एच.एम. देसरडा, अनय जोगळेकर, डॉ. विजया रहाटकर, उपायुक्त सुर्यकांत हजारे आदी उपस्थित होते.

  श्रीमती मुंडे म्हणाल्या, राज्यात जलयुक्त शिवार अभियान यशस्वी झाल्यामुळे या अभियानाचे देशात तसेच विदेशात कौतुक होत आहे. राजस्थान राज्यातही जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येणार आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील उद्योजक, जनतेच्या सहभागामुळेच हे अभियान जिल्ह्यात तसेच मराठवाड्यात पहिल्या टप्प्यात यशस्वी झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातही हे अभियान यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

  डेव्हिड अकाव्ह यांनी इस्त्राईल देशाने पाणी टंचाईवर यशस्वीपणे मात करुन देशातील पाणी टंचाई दूर केली आहे. काही वर्षापूर्वी इस्त्राईल देशातही पाणी टंचाई होती. त्यावेळी आमच्या सरकारने योग्य नियोजन करुन ठिंबक सिंचनाद्वारे पाणी बचत केली. तंत्रज्ञानाचा तसेच विविध योजनाची अंमलबजावणी करुन पाणी साठ्यात वाढ केली. त्यामुळे आपल्या देशात पाणी उपलब्ध झाले आहे. जलयुक्त शिवार अभियान योजना व अंमलबजावणीचे कौतुक केले.

  प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार अभियान व नदी पुनर्जीवन योजनेचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. कार्यक्रमात शेतीविषयक इस्त्राईल विशेष अंकाचे प्रकाशन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

   

 • मागेल त्याला शेततळे योजना राबविणार : पंकजा मुंडे यांची माहिती; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

  मुंबई – राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ ही योजना अनुदान पद्धतीने राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामविकास आणि जलसंधारणमंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी (ता. ९) दिली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

  मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, की शेती उत्पादनामध्ये शाश्वतता आणण्यासाठी तसेच दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळी उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आहे. राज्यातील पावसावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट आणि जलसंवर्धनाच्या माध्यमातून सिंचन सुविधा उपलब्ध करणे तसेच संरक्षित आणि शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ योजना हाती घेण्यात येत आहे.

  टंचाईग्रस्त भागातील ज्या गावात मागील ५ वर्षांत किमान एक वर्ष ५० पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाली आहे, अशा गावांमध्ये ही योजना प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात ५१ हजार ५०० शेततळी घेण्यात येणार असून त्यापेक्षा जास्त मागणी प्राप्त झाल्यास त्यानुसार उद्दिष्टात वाढ करण्यात येणार आहे. दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती (बीपीएल) आणि ज्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये ज्येष्ठता यादीत सूट देऊन प्राधान्याने त्यांची निवड केली जाईल. तसेच शेततळ्याची मागणी करणाऱ्या अर्जदारांची प्रथम प्राधान्य याप्रमाणे लाभार्थी निवड करण्यात येणार आहे. योजनेअंतर्गत सात प्रकारच्या आकारमानाची शेततळी निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये सर्वांत मोठ्या आकारमानाचे शेततळे ३० बाय ३० बाय ३ मीटरचे असून त्यासाठी ५० हजार इतके कमाल अनुदान दिले जाणार आहे, तर सर्वांत कमी १५ बाय १५ बाय ३ मीटर आकारमानाचे असणार आहे. इतर शेततळ्यासाठी आकारमानानुसार अनुदान दिले जाईल. ५० हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च झााल्यास उर्वरित रक्कम लाभार्थी शेतकऱ्याने स्वत: खर्च करायची आहे. या शेततळ्याची शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.

  चालू वर्षासाठी ५० कोटी रुपये
  जिल्हा पातळीवर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा आणि समन्वय समिती या योजनेवर देखरख करणार आहे. योजनेची अंमलबजावणी, नियंत्रण आणि समन्वयासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक समिती नियुक्त केली जाणार आहे. तालुका पातळीवरील तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समिती शेततळ्याला मान्यता देईल. चालू वर्षात या योजनेसाठी ५० कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पुढील वर्षात २०७ कोटी ५० लाख निधी मदत व पुनर्वसन विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. रोजगार हमी योजना विभाग नोडल विभाग म्हणून ही योजना कार्यान्वित करणार असल्याची माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

  ठळक वैशिष्ट्ये
  – शेततळी बांधकामासाठी यंत्राच्या वापराला परवानगी
  – पहिल्या टप्प्यात ५१ हजार ५०० शेततळी घेण्यात येणार
  – काम पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात थेट जमा
  – ‘मागेल त्याला शेततळे’ योजना कृषी आयुक्तालयामार्फत राबविणार
  – ३० बाय ३० बाय ३ मीटरच्या शेततळ्यासाठी ५० हजार रुपये अनुदान
  – शेतकऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार

 • 12651349_938080462944182_569645803199525252_n

  संतांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम राजकारण्यांनी करावे- पंकजा मुंडे

  संत वामनभाऊ, भगवानबाबा या थोर संतांनी जात-पात, धर्म-पंथ असा भेदभाव न करता सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम केले. अशा संतांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम राजकारण्यांनी करावे. गडावरून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम व्हावे. विठ्ठल महाराज ‘परवानगी’ देतील तोपर्यंत गडावर येणार, असे सांगून गोपीनाथ मुंडे यांच्या गादीवर मीही बसले, पण ती गादी काटेरी आहे. अनेक अडथळे पार करीत काम सुरू असल्याची भावना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.

  पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथगड येथे संत वामनभाऊ यांचा ४० व्या पुण्यतिथी सोहळा सोमवारी झाला. या वेळी मंत्री पंकजा मुंडे, गृह राज्यमंत्री प्रा. राम िशदे, आमदार जयदत्त क्षीरसागर, भीमराव धोंडे, आर. टी. देशमुख व मोनिका राजळे, माजी आमदार साहेबराव दरेकर, जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, सुशीला मोराळे आदी उपस्थित होते. श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी गडावरून राजकीय भाषणबाजीला बंदी केल्याच्या निर्णयावरून वादंग उठले आहे. या पाश्र्वभूमीवर गहिनीनाथगडावर मंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहणार असल्याने मोठय़ा संख्येने भाविक भक्तांची गर्दी होती. मंत्री मुंडे म्हणाल्या की, बीड जिल्ह्यास संत भगवानबाबा, वामनभाऊ यांच्यासारख्या थोर संतांची परंपरा आहे. जात-पात, धर्म असा भेदभाव न करता सर्व समाजाला एकत्र आणण्याचे काम या संतांनी केले. संतांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम राजकारण्यांनी करायचे आहे. गडावरून वंचित आणि शोषित घटकांना न्याय देण्याबरोबरच समाजाला योग्य दिशा देण्याचे काम होणे आवश्यक आहे. गडाच्या विकासाला सर्वतोपरी मदत देऊ, अशी ग्वाही देऊन महंत विठ्ठल महाराज परवानगी देतील तोपर्यंत गडावर येणार असे त्या म्हणाल्या.

  कार्यक्रमाच्या ठिकाणी काही नेत्यांनी मोठय़ा प्रमाणात केलेल्या बॅनरबाजीचा ओझरता उल्लेख करीत मंत्री मुंडे म्हणाल्या की, मला बॅनरबाजी करण्याची गरज नाही. जनतेच्या मनात माझे बॅनर आहे. माझे काम चांगले असेपर्यंत त्यांच्या मनात राहील, ते कोणीही काढून घेऊ शकणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. आमदार क्षीरसागर यांनी गहिनीनाथ गडावरील विकासकामांबाबत माहिती देऊन गहिनीनाथगडाने जाती-धर्मापलीकडे जाऊन माणसे जोडण्याचे काम केल्याचे सांगितले.

 • 12321226_936640569754838_3217802659512119254_n

  जपानच्या सहकार्याने बीड जिल्ह्यात सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारणार- पंकजा मुंडे

  उच्चायुक्त योशियाकी दरम्यान यशस्वी चर्चा; जपानचे शिष्टमंडळ पुढील महिन्यात बीडला जाणार

  मुंबई : जपानच्या सहकार्याने बीड जिल्ह्यात सोयाबीनवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्यात येणार असून पुढील महिन्यात जपानचे एक शिष्टमंडळ पाहणी करण्यासाठी बीडचा दौरा करणार असल्याची माहिती ग्रामविकास व जलसंधारण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

  जपानचे भारतातील उच्चायुक्त योशियाकी इटो यांनी येथील दुतावासात श्रीमती मुंडे व त्यांचे पती अमित पालवे यांना शुक्रवारी स्नेहभोजनास आमंत्रित केले होते, त्यावेळी झालेल्या चर्चेत श्रीमती मुंडे यांनी केलेली ही मागणी जपानने मान्य केली.

  श्रीमती मुंडे म्हणाल्या, राज्यातील शेती पुरक उद्योगधंदे वाढविण्यावर या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. शेती-जोड व्यवसाय करुन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी जपान महाराष्ट्रात मोठी आर्थिक गुंतवणूक करत आहे. त्यामध्ये प्रामुख्याने स्ट्रॉबेरी या फळावर प्रक्रिया करुन नवीन वाण विकसीत करण्यात येत आहे. त्यामुळे फळाचे उत्पन्न व त्याची गोडी वाढण्यासाठी मदत होणार आहे.

  मराठवाड्यामध्ये सततची दुष्काळी परिस्थिती आहे, अशा कठीण प्रसंगातून शेतकरी जात असताना सोयाबीन प्रक्रिया उद्योग सुरु करण्याबाबत श्रीमती मुंडे यांनी मागणी केली असता असे प्रकल्प उभारण्यासाठी जपान संपूर्ण सहकार्य करील त्यासाठी एक शिष्टमंडळ 26 फेब्रुवारीला बीड जिल्ह्यात पाहणी करण्यासाठी पाठवू, असे त्यांनी सांगितल्याचे श्रीमती मुंडे म्हणाल्या. दरम्यान, श्रीमती मुंडे यांनी स्नेहभोजनाचे निमंत्रण स्विकारल्याबद्दल जपानचे उच्चायुक्त भारावून गेले. पाणीपुरी आणि पुरण पोळी आपल्याला विशेषत्वाने आवडत असल्याचे त्यांनी सांगितले.

  यावेळी सुमीटोमो कार्पोरेशन इंडिया प्रा.लि. कंपनीचे जनरल मॅनेजर वाकाबायाशी, जी.आर.अे. कंपनीचे मॅनेजर योसुके काटो हे मोठे उद्योजक तसेच राष्ट्रीय ग्रामीण आणि कृषी बँकेचे मुख्य व्यवस्थापक डॉ. यु. एस. शहा आदी उपस्थित होते.

   

 • 12541034_930272827058279_3261216171875943291_n

  महालक्ष्मी सरस ही एक चळवळच

  मुंबई : बचत गटांचे ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शन हे केवळ ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या वस्तूंचे व खाद्य पदार्थांचे विक्री-प्रदर्शन नसून ही एक महिला सक्षमीकरणाची चळवळ आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर करणारी ही एक शांततापूर्ण क्रांतीच असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी रविवारी काढले.

  राज्याच्या ग्राम विकास विभागाततर्फे आयोजित केलेल्या १३व्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते वांद्रे येथील म्हाडा ग्राउंडवर झाले. त्याप्रसंगी राज्यभरातून आलेल्या महिलांना संबोधित करताना राज्यपाल बोलत होते.

  ग्राम विकास व महिला बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री दीपक केसरकर, खा. पूनम महाजन, आ. आशिष शेलार व ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव व्ही. गिरीराज या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते. आज तंत्रज्ञान, इंटरनेट व ई-कॉमर्सच्या माध्यमातून सर्व जग जवळ आले आहे. महिला बचत गटदेखील या तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपली उत्पादने घरबसल्या विकू शकतात, असे सांगत महिलांनी आता स्वयंम् उद्योजक होऊन राष्ट्र-निर्माण कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.

  राज्यातील प्रत्येक मॉलमध्ये महिला बचत गटांची उत्पादने ठेवण्यासाठी जागा राखून ठेवण्याचा शासनाचा निर्णय झाला असून, बचत गटांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज देण्याचा निर्णयदेखील सरकारच्या विचाराधीन असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. राज्यातील सर्व मोठ्या शहरांमध्ये महिला बचत गटांची उत्पादने विकण्यासाठी विक्री केंद्रे स्थापन केली जाणार असल्याचे दीपक केसरकर यांनी या वेळी सांगितले. राज्यपालांच्या हस्ते विविध महिला बचत गटांना विभागीय राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार देण्यात आले. राज्यपालांनी या प्रदर्शनातील काही स्टॉल्सना भेट दिली.

 • 12391449_916499141768981_6699983269382253385_n

  शेतकरी आत्महत्त्या रोखण्यासाठी शासन कटिबद्ध

  सातपूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शेतीसाठी पुरेसे पाणी मिळावे म्हणून राज्य सरकारच्या वतीने जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

  विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी सातपूर येथील प्रभाग क्रमांक १७ मध्ये आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मराठवाड्याच्या तुलनेत नाशिकला पाणी मुबलक आहे. येथील रस्ते आणि विकासाची कामे चांगली असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले. यावेळी कामगारमंत्री प्रकाश मेहता यांनी जंगलीदास महाराज यांच्या नामकरण सोहळ्यावरून अध्यात्माचे महत्त्व विशद केले. तर महापौर अशोक मुर्तडक यांनी कुंभमेळ्यात महापालिकेचा खूप निधी खर्च झाला आहे, त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती खालावली असून, निधीअभावी विकासकामे रखडली आहेत. राज्य शासनाने मंजूर केलेले पैसे मिळण्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि कामगार मंत्री प्रकाश मेहता यांनी प्रयत्न करावेत, अशी आग्रही मागणी यावेळी केली. यावेळी नगरसेवक दिनकर पाटील यांनी पालिकेच्या माध्यमातून प्रभागात राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसेच स्मार्ट प्रभागासाठी मी कटिबद्ध असेल, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

  यावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, उपमहापौर गुरुमित बग्गा, सभागृहनेते सलीम शेख, प्रभाग सभापती उषा शेळके, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कामगार उपआयुक्त आर. एस. जाधव, तसेच भाजपा शहर अध्यक्ष लक्ष्मण सावजी, सुनील बागुल आदिंसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. नगरसेवक लता पाटील व अमोल पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. (वार्ताहर)

 • munde-670x447

  ग्रामीण महिलांची पाण्याची समस्या दूर करण्याचे स्वप्न – पंकजा मुंडे

  जो समाजभिमुख काम करतो तो नक्कीच राजकारणात मोठा होतो. ग्रामीण भागातील महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरवून घराजवळ त्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे आपले स्वप्न आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
  येथील शिवाजीनगर व ध्रुवनगर परिसरात विविध विकास कामांच्या आणि गोपीनाथ मुंडे जलकुंभ लोकार्पण सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या. आपणास नाशिककरांकडून खूप प्रेम मिळत आहे. आमचे आणि नाशिकचे नाते जिव्हाळ्याचे आणि जवळचे झाले आहे, असेही त्यांनी नमूद केले. प्रास्ताविक नगरसेवक दिनकर पाटील यांनी केले. हा उद्घाटन सोहळा राजकारणासाठी नसून सर्वाना एकत्र आणण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाप्रसंगी मार्शल आर्टमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या आकांक्षा आव्हाड या बालिकेला मुंडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. अमोल पाटील, उमेश जाधव यांचाही सत्कार मुंडे आणि मेहता यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन श्याम पाडेकर यांनी केले –

 • 1476313_912957332123162_6244798985217653947_n

  ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार- पंकजा मुंडे

  नागपूर : मुलींचे शिक्षण, आरोग्य व उज्वल भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, यासह बालिका भ्रुणहत्या रोखणे, बालविवाह रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार रुजविण्यासाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना राज्यात प्रभावीपणे राबविणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली.

  पोषण आहार : 1ली ते 5वीसाठी 12 हजार 500 तर 6वी ते 12वी साठी 21 हजार

  श्रीमती मुंडे पुढे म्हणाल्या की, ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना राज्यभर राबविली जाणार आहे. या योजनेमध्ये ज्या मातेने एकुलत्या एक मुलीवर अंतिम कुटुंब नियोजन केलेले आहे, अशा लाभार्थ्यांना मुलीचा जन्मदिन साजरा करण्यासाठी 5 हजार रुपये, मुलगी 5 वर्ष वयाची होईपर्यंत दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी 5 वर्षांसाठी 10 हजार रुपये, इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत पोषण आहार व इतर संकीर्ण खर्चासाठी 5 वर्षांसाठी एकूण 12 हजार 500 रुपये तसेच मुलीच्या 6 वी ते 12 वी पर्यंतच्या शिक्षणादरम्यान पोषण आहार व इतर खर्चासाठी 7 वर्षांसाठी एकूण 21 हजार रुपये इतका लाभ मिळणार आहे.

  ज्या मातेला एक मुलगी असून दुसऱ्या मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे अशा परिस्थितीत जन्मदिन साजरा करण्याकरीता 2 हजार 500 रुपये, दोन्ही मुली 5 वर्ष वयाच्या होईपर्यंत दर्जेदार पोषण आहार देण्यासाठी 5 वर्षांसाठी 10 हजार रुपये, दोन्ही मुलींना इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यंत पोषण आहार व इतर खर्चाकरीता 5 वर्षासाठी 15 हजार रुपये, दोन्ही मुलींना इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंत पोषण आहार व इतर खर्चाकरीता 7 वर्षासाठी 22 हजार रुपये लाभ देण्यात येणार आहे. मात्र 1 मुलगी व 1 मुलगा असलेल्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

  मुलींसाठी विमा योजना : 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर मिळणार एक लाख रुपये

  दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या मुलींसाठी विमा योजना राबविण्यात येणार असून यामध्ये मुलींच्या जन्मानंतर एक वर्षाच्या आत 21 हजार 200 रुपयाचा विमा एल.आय.सी. मध्ये शासनामार्फत काढण्यात येणार आहे. यासाठी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1 लाख रुपयाचा विम्याची रक्कम अदा करण्यात येणार आहे. तसेच मुलीच्या पालकांचाही विमा काढण्यात येणार असून यामध्ये मुलींच्या पालकांचा अपघात किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास पुढील प्रमाणे विम्याची रक्कम मिळणार आहे. नैसर्गिक मृत्यू झाल्यास 30 हजार रुपये, अपघाती मृत्यू झाल्यास 75 हजार रुपये, दोन डोळे किंवा दोन अवयव निकामी झाल्यास 75 हजार रुपये, एक डोळा अथवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास 37 हजार 500 रुपये विम्याचा लाभ मिळणार आहे.

  गावांचा गौरव : 5 लाख रुपये पारितोषिक

  पहिल्या मुलीनंतर मातेने कुटुंब नियोजन केले असल्यास आजी आजोबांनाही म्हणजे मुलीच्या मातेच्या सासू सासऱ्यांना 5 हजार रुपयांपर्यंत सोन्याचे नाणे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, तसेच ज्या गावामध्ये मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर 1 हजारपेक्षा जास्त असेल अशा प्रत्येक जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीला 5 लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे, असेही महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

  या योजनेकरिता पहिल्या वर्षी रुपये 153.23 कोटी एवढा खर्च अपेक्षित असून 18 वर्षापर्यंत रुपये 3 हजार 111 कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. तसेच जे लाभार्थी इतर विभागाच्या योजनेमधून लाभ घेत असतील अशांना या योजनेचा लाभ लागू राहणार नाही.

 • परळीत ‘गोपीनाथ गडा’चे लोकार्पण

  लोकनेते व माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ परळी येथे उभारण्यात आलेल्या ‘गोपीनाथ गडा’चे लोकार्पण शनिवारी करण्यात आले.

  बीड- लोकनेते व माजी केंद्रीय मंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मरणार्थ परळी येथे उभारण्यात आलेल्या ‘गोपीनाथ गडा’चे लोकार्पण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. परळीतील १८ एकर परिसरात हे भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. या स्मारकाला गोपीनाथ गड असे नाव देण्यात आले आहे.

  यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या व राज्याच्या महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मंत्री, घटक पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.

  गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती चिरंतन रहाव्यात यासाठी परळीत त्यांच्या नावाने स्मारक उभारण्यात आले आहे. यामध्ये ७२ फूट उंचीचे ‘लोटस टेम्पल’ नावाने मुंडे यांचे समाधीस्थळ उभारण्यात आले आहे. समाधीस्थळाची रचना कमळाप्रमाणे असून, त्याला १११ फूट अष्टकोनी घेर आहेत. तसेच पंचधातूपासून तयार करण्यात आलेला गोपीनाथ मुंडे यांचा भव्य २२ फूट उंचीचा पुतळा असून, पुतळ्याचा चौथरा १० फूट उंचीचा आहे. स्मारकाच्या कामासाठी पश्‍चिम बंगालमधून कारागीर मागवण्यात आले होते.

  गोपीनाथ गडाचे ५० फूट उंच आणि ९० फूट रुंदी असलेले प्रवेशद्वार हेसुद्धा भव्य आणि आकर्षक आहे. प्रवेशद्वार ते साहेबांचे समाधीस्थळ यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजुने सुंदर बगीचा तयार करण्यात आला आहे. गडाच्या परिसरात विविध जातींची हजारो झाडे यापूर्वीच लावण्यात आली आहेत.

Page 9 of 31« First...7891011...2030...Last »