• 15134540_1144368668982026_667798221582891975_n

  मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत एक हजार 37 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी

  मुंबई :  ग्रामीण भागातील रस्ते अधिक दर्जेदार करण्यासाठी राज्यातील 28 जिल्हयांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत एक हजार 37 कोटी 53 लक्ष रूपये रक्कमेच्या रस्त्यांच्या कामाना मंजुरी दिल्याची माहिती राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. ग्रामीण भाग मुख्य रस्त्याला जोडण्याच्या सरकारच्या धोरणाला यामुळे बळकटी मिळणार आहे.

  राज्याच्या ग्रामीण भागातील अनेक वाड्या – वस्त्या अजूनही पक्क्या रस्त्याने जोडल्या गेलेल्या नाहीत, अशा खेड्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही महत्वाकांक्षी योजना प्राधान्याने हाती घेतली असल्याचे  पंकजा मुंडे यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत सन 2015 – 16 मध्ये दोन हजार किमी आणि 2016 – 17 मध्ये 5200 किमी  लांबीच्या रस्त्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. दोन्ही वर्षाचे मिळून सुमारे दोन हजार किमीच्या रस्त्यांचे 28 जिल्हयातील प्रस्ताव ग्रामविकास विभागाने मंजूर केले असून त्यासाठी एक हजार 37 कोटी 53 लक्ष चार हजार रूपयांच्या निधीला मान्यता दिली असल्याचे त्यांनी सांगितले. उर्वरित जिल्हयातील प्राप्त झालेल्या रस्त्यांच्या प्रस्तावाची छाननी सुरू असून सुमारे पाच हजार किमी लांबीच्या रस्त्यांना मंजुरी देण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यातील ग्रामीण रस्त्यांचे रूप या निधीतून आगामी काळात बदलणार आहे.

  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या धर्तीवर ही योजना तयार करण्यात आली असून रस्ते निवडी संदर्भात संबंधित पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक होऊन त्या त्या जिल्ह्याचे प्रस्ताव शासन मान्यतेसाठी प्राप्त झाले आहेत. सन 2015 – 16 वर्षाकरिता घोषित झालेल्या दरसूचीनुसार अंदाजपञक तयार करण्यात आले असून ई – निविदेद्वारे कार्यारंभ आदेश दिले जाणार असल्याची माहितीही पंकजा मुंडे यांनी दिली.

 • 15192580_1147161192036107_7683350187174409524_n

  केंद्र, राज्याप्रमाणे बार्शीतही सत्तेचे समीकरण साधा : मुंडे

  बार्शी – केंद्रात राज्यात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. सरकार सर्वसामान्यांसाठी अतिशय कल्याणकारी योजना राबवत आहे. एकाच विचारांची टीम असल्यास विकासाला आणखी गती मिळणार आहे. त्यामुळे विकासाचा घास आपल्या ताटामध्ये वाढण्यासाठी बार्शीला या विकासाच्या पंगतीत बसवा, असे प्रतिपादन महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
  बार्शी नगरपालिका निवडणुकीत भाजप, रासप रिपाइं उमेदवारांच्या प्रचारार्थ उपळाई रोड येथे आयोजित जाहीर सभेत त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, भाजप नेते राजेंद्र मिरगणे, जिल्हा सरचिटणीस धनंजय जाधव, रासपचे संतोष ठोंगे, रिपाइंचे वीरेंद्र कांबळे, तालुकाध्यक्ष बिभीषण पाटील, शहराध्यक्ष अश्विन गाढवे, भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अॅड. वासुदेव ढगे, जॉन चोप्रा उमेदवार व्यासपीठावर उपस्थित होते.
  मुंडे म्हणाल्या, केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या अडीच वर्षात सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले आहेत. या सरकारकडून मोठ्या प्रमाणात विकासनिधी बार्शी नगरपालिकेला मिळण्यासाठी भाजपला सत्ता द्या. केंद्र शासनाच्या धोरणांमुळेच ग्रामीण भागाचा विकास होत आहे. यापूर्वीच्या सरकारने जातीपातीचे राजकारण करत सर्वसामान्यांची दिशाभूल केली. भ्रष्टाचारातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असा कार्यक्रम राबवला. त्यामुळे बहुजन समाज देशोधडीला लागला. भविष्यात भाजप सरकारचे धोरण देशाला आर्थिक महासत्ता बनवण्याचे आहे. पाचशे हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय केवळ काळा पैसा जमवणाऱ्यांना चपराक आहे, असे त्या म्हणाल्या.
  मिरगणे म्हणाले, भाजपचे उमेदवार स्वच्छ आणि प्रामाणिक आहेत. केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्याकडून माढा-वैराग-उस्मानाबाद या महामार्गासाठी १६ कोटी रुपयांचा निधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रस्ते इतर कामांसाठी कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे.
  पंकजा नावातच आहे राजकारण
  मामा (स्व.) प्रमोद महाजन, वडील (स्व.) गोपीनाथराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी होत असताना राजकारण जवळून ेपाहिले.माझ्या जन्मापूर्वी आई-वडिलांनी मुलगी झाली तर पंकजा, मुलगा झाला तर पंकज असे नाव ठेवण्याचे नियोजन केले होते. त्याप्रमाणेच माझे नाव पंकजा ठेवले. तेच भाजपचे निवडणुकीचे पंकज अर्थात कमळ हे चिन्ह असल्याचे सांगत पंकजा यांनी आपल्या नावातील गुपीत उलघडले.
 • 15078955_1145094515576108_5520559497621395929_n

  विकासासाठी परिवर्तन आवश्यक – पंकजा मुंडे

  मनमाड, दि. १९ – गल्ली पासून दिल्ली पर्यंत विकास घडवून आणण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत परिवर्तन झाले पाहिजे असे प्रतिपादन राज्याच्या ग्रामविकास व महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे  यांनी दिली. मनमाड पालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ  आय यु डी पी येथील मैदानावर आयोजित जाहीर सभेमध्ये त्या बोलत होत्या.
   व्यासपीठावर  भाजपचे   प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल,जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव, माजी आमदार संजय पवार,दिनेश देवरे, बापूसॊहेब पाटील, अद्वय हिरे,  जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, पंकज खताळ, जय फुलवानी, नारायण पवार, थेट नगराध्यक्ष पदाचे  उमेदवार कुसुम दराडे  आदी उपस्थित होते.भाजप वर जातिवादाचा आरोप केला जात असला तरी मनमाड  येथे सर्व जाती धर्माचे उमेदवार भाजपकडून निवडणूक लढवत  असल्याचे नितीन पांडे यांनी प्रस्ताविकातून सांगितले.
 • mnaimage48524munde_dakshata-meet

  घरकुलांबरोबर मिळणार ‘निर्मल शोषखड्डे’ – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

  मुंबई : ग्रामीण भागातील सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रामविकास आणि मनरेगा विभागाच्या सहभागातून ‘निर्मल शोषखड्डे’ ही योजना राबविण्यात येत आहे. घरातील सांडपाणी या शोषखड्ड्यांमध्ये जिरविल्यामुळे सांडपाण्याचे व्यवस्थापन होण्याबरोबरच गावे डासमुक्त होत आहेत. शासनामार्फत ग्रामीण भागात विविध योजनांमधून बांधण्यात येणाऱ्या घरकुलांमध्ये आता असे निर्मल शोषखड्डे बांधण्यात येतील, यासाठी घरकुलाच्या डिझाईनमध्ये बदल करणे व त्यासाठी आर्थिक तरतूद उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ग्रामविकास व मनरेगा विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या.

  ग्रामविकासच्या केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा घेण्यासाठी येथील सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीची बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी ग्रामविकास विभागाचे राज्यमंत्री दादाजी भुसे, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार लक्ष्मण पवार, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता, जलसंधारण विभागाचे सचिव पुरुषोत्तम भापकर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव विवेक नाईक, केंद्र शासनाचे प्रतिनिधी डॉ.प्रशांत पटवर्धन, हर्षवर्धन पिंपरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  नांदेड जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी निर्मल शोषखड्ड्यांची योजना चांगल्या पद्धतीने राबविण्यात आली आहे. ‘मनरेगा’ अंतर्गत ग्रामीण भागात असे शोषखड्डे बांधण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. आता ग्रामीण भागात प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, आदिम जाती आवास योजना, पारधी विकास योजना यामधून बांधण्यात येणाऱ्या घरकुलांमध्येही असे निर्मल शोषखड्डे बांधण्यात यावेत. यासाठी ग्रामविकास आणि रोजगार हमी विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या.

  घरकुलाच्या बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या पात्र लाभार्थ्यांना एकत्र करुन त्यांना एकाच ठिकाणी जागा दिल्यास कॉलनी स्वरुपातील घरकुलांची निर्मिती करणे शक्य होईल. शिवाय यामुळे विविध आर्थिक-सामाजिक गटातील लोक एकत्र राहिल्याने एक प्रकारे सलोख्याच्या वातावरण निर्मितीसही मदत होऊ शकेल. ग्रामविकास विभागाने प्रायोगिक स्वरुपात काही ठिकाणी अशी योजना राबवावी, असे निर्देश यावेळी त्यांनी ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

  रेल्वे प्रकल्पांचे मातीकाम मनरेगातून
  राज्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या एकत्रित सहयोगातून विविध रेल्वे मार्ग निर्मितीचे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या प्रकल्पांमध्ये माती कामाचा हिस्सा मोठा आहे. हे माती काम मनरेगातून केल्यास लोकांना रोजगार उपलब्ध होण्याबरोबरच रेल्वे मार्गाच्या निर्मिती कामाला गती मिळू शकेल. शिवाय त्यामुळे या प्रकल्पांना मनरेगाचा मोठा निधीही उपलब्ध होऊ शकेल. रोजगार हमी विभागाने यादृष्टीने नियोजन करावे, असेही मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितले.आमदार आदर्श ग्राम योजना व सांसद आदर्श ग्राम योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात. बचतगटांना शून्यटक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देणारी सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना ही तळागाळापर्यंत पोहोचविण्यात यावी. यासाठी संबंधित ग्रामीण जीवनोन्नती अभियान विभागाने या योजनेचा प्रभावी प्रचार आणि प्रसिद्धी करुन लोकांना माहिती द्यावी, अशी सूचना मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

  पाणंद रस्ते निर्मितीला गती द्यावी – राज्यमंत्री दादाजी भुसे
  ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यावेळी म्हणाले, पाणंद रस्ते बांधणीचा कार्यक्रम ग्रामविकास विभागाने प्राधान्याने हाती घेणे गरजेचे आहे. यासाठी संबंधितांचा वेळोवेळी आढावा घेऊन ग्रामीण भागात पाणंद रस्त्यांच्या बांधकामांना गती देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. जागा उपलब्ध नसल्यास काही शेतकरी आपल्या शेतात घरकुल बांधण्याचा प्रस्ताव देतात. पण जिल्हा आणि तालुका पातळीवर याबाबत स्पष्टता नसल्याने यात अडचणी निर्माण होत आहेत. याबाबतीत ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा यंत्रणेला स्पष्ट सूचना देण्यात याव्यात. ग्रामीण भागातील अनेक निराधार लोक पात्र असूनही संजय गांधी निराधार योजनेपासून वंचित आहेत. अशा लाभार्थ्यांपर्यंत ग्रामसेवक, तलाठी अशा स्थानिक कर्मचाऱ्यांनी स्वत:हून पोहोचून त्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे अनिवार्य करणे गरजेचे आहे. यासाठी संबंधित विभागांनी सूचना द्याव्यात, असे राज्यमंत्री श्री.भुसे यांनी सांगितले.

   

 • mnaimage32839munde-australia

  ऑस्ट्रेलियाचे कौन्सुल जनरल टोनी हुबेर यांनी घेतली ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची सदिच्छा भेट

  मुंबई : ऑस्ट्रेलियाचे कौन्सुल जनरल टोनी हुबेर यांनी ग्रामविकास आणि महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली.

  महिलांचे सक्षमीकरण, त्यांची सुरक्षितता, बाल हक्क संरक्षण, राज्यात सुरू असलेली ग्रामविकासाची चळवळ अशा विविध मुद्यांवर याप्रसंगी चर्चा झाली. मुलांच्या सुरक्षिततेसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘रक्षा’ या मोबाईल अॅपचे तसेच बाल हक्क आयोगाच्या ‘चिराग’ अॅपचे कौन्सुल जनरल टोनी हुबेर यांनी यावेळी कौतुक केले.

  यावेळी कौन्सुल जनरल टोनी हुबेर यांनी श्रीमती मुंडे यांना ऑस्ट्रेलिया भेटीसाठी निमंत्रण दिले. फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये अधिवेशन सुरु असताना भेट द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. महिलांना समान हक्क मिळावेत, यासाठी जागतिक विचार मंच असावा, अशी चर्चाही यावेळी झाली. याप्रसंगी ऑस्ट्रेलियाचे व्हॉईस कौन्सुल जनरल टीम हॉल उपस्थित होते.

   

 • slider_new_00002

  मी मंत्री नंतर, आधी भगवान बाबांची भक्त : पंकजा मुंडे

  बीड: भगवानगडाचं आणि माझं नात बाप-लेकीचं आहे. जमीन विका आणि शिका असे भगवान बाबा म्हणायचे. गोपीनाथ मुंडे साहेब हे केवळ भगवान बाबांच्या दर्शनासाठी इथे जमत नव्हते तर आपल्या समाजाला एक दिशा मिळावी, त्यांच्या विकासाचा नवा संकल्प करता यावा यासाठी सभा घेतली जायची. आज मी इथे संकल्प करत आहे. हुंडा आणि स्त्री भ्रूण हत्येचा राक्षस संपवून टाका. तुमच्या हातातला कोयत फक्त ऊसतोडणीसाठी वापरा, दुसऱ्या कामांसाठी नको, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

  मी मंत्री नंतर, आधी भगवान बाबांची भक्त आहे. मला अहंकार नाही, पण स्वाभिमान आहे. वडिलांच्या अस्थी गडावर आणल्या तेव्हाच भगवानगडाची लेक झाले. गोपीनाथ साहेबांनी भगवानगडावरुन शेवटचं भाषण करताना वारसा सोपवला. तो मी पुढे जपणार आहे. मी अंहकाराचा, कारस्थानाचा बुरूज तुमच्यासाठी उतरले. मला तुमच्या मुलांच्या हाती कोयता नाही पुस्तक द्यायचंय. पंकजा मुंडे यांनी त्यांच्या भाषणातून थेट नाव न घेता धनंजय मुंडे आणि भगवान गडाच्या महंतावर टिका केली आहे.

  मला माझी शक्ती दाखवयाची नाहीये. तुम्ही माझ्या शब्दाला जे जाणलं तुम्ही मोठे झाले. मला भगवान बाबांचं दर्शन तुमच्यात झालंय. माझा राजीनामा हेलिकॉप्टरमध्ये कायम तयार असतो, भ्रष्टाचाराचे आरोप, राजीनामा मागण्यांवर पंकजा मुंडेंची टीका केली. वर्षानुवर्ष सत्ता भोगणा-यांनी मराठा तरूणाचं नुकसान केलं. एक मुलगी गडाबाबत अपशब्द काढणार नाही. तुम्ही सर्वांनी भगवान बाबांच्या विचारांना जपा, गोपीनाथ मुंडे साहेबांच्या विचारांना जपा हीच माझी इच्छा आहे.

  – मी तुमची देवता नाही, माता आहे : पंकजा मुंडे

  – माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न सुरु आहे : पंकजा मुंडे

  – माझा राजीनामा हेलिकॉप्टरमध्ये कायम तयार असतो, भ्रष्टाचाराचे आरोप, राजीनामा मागण्यांवर पंकजा मुंडेंची टीका

  – हुंडा आणि स्त्री भ्रूण हत्येचा राक्षस संपवून टाका : पंकजा मुंडे

  – तुमच्या हातातला कोयत फक्त ऊसतोडणीसाठी वापरा, दुसऱ्या कामांसाठी नको : पंकजा मुंडे

  ज्या भगवान गडावरून गेल्या काही दिवसांपासून वाद पेटला होता त्या भगवान गडावर जाऊन महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवारी संत भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. मार, पंकजा मुंडे यांनी यावेळी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्रींची भेट टाळली. त्यामुळे या दोघांमधील हा वाद आता संपेल असे चित्र दिसत नाही. दरम्यान पंकजा मुंडे या भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आत गेल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी पोलिसांवर किरकोळ दगडफेक केली. यात दोन पोलीस जखमी झाल्याचे सांगण्यात येते. या वेळी सर्वसामान्यांसाठी काही वेळासाठी दर्शन बंद करण्यात आले होते.

  ठरल्याप्रमाणे पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने भगवानगडाच्या पायथ्याशी आल्या. यावेळी खासदार प्रीतम मुंडे याही उपस्थित होत्या.  पायथ्यापासून एका रथात पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, कृषी मंत्री सदाभाऊ खोत, अमित पालवे हे भगवानगडाकडे गेले. या वेळी समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. पंकजा मुंडे यांना सातत्याने कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करावे लागत होते. मात्र पंकजा मुंडे या दर्शनासाठी आत जाताच कार्यकर्त्यांनी बाहेर किरकोळ दगडफेक केली. यात दोन पोलीस जखमी झाले.

  दरम्यान, भगवानगडावरील तणाव निवळण्यास सुरूवात झाल्याचे चित्र दिसत आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना भगवानगडावर दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले. पंकजा यांनी गडावर यावे व माहेरचे दोन घास खाऊन जावे असे सांगत भोजनाचेही त्यांनी निमंत्रण दिले. तसेच पंकजा मुंडे यांना भगवान गडाच्या पायथ्याची सभा घेण्याची जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली याचेही महंतानी स्वागत केले.

 • 14591595_1109369072481986_8045048443807809579_n

  अहंकाराचा, कारस्थानाचा बुरुज तुमच्यासाठी उतरले – पंकजा मुंडे

  भगवानगड, दि. 11 – भगवानगडाच्या पायथ्याशी आयोजित दसरा मेळाव्यात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मी अहंकाराचा, कारस्थानाचा बुरुज तुमच्यासाठी उतरले, असे म्हणत धनंजय मुंडे आणि नामदेवशास्त्री यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.
  भगवानगडावर गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केलेला दसरा मेळावा यंदा वादात सापडला होता. विजयादशमीला भगवानगडावर राजकीय भाषण होवू देणार नाही, अशी महंत नामदेवशास्त्री सानप यांची भूमिका होती. त्या पार्श्वभूमीवर एक महिन्यापासून महंत आणि पंकजा मुंडे यांच्यात वाद सुरू होता. गडाऐवजी पायथ्याशी मेळाव्याला परवानगी देण्यात आली होती. पंकजा मुंडे यांनी मात्र ठाम राहत भगवान गडावर जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर गडाच्या पायथ्याशी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. पालकमंत्री राम शिंदे, मंत्री महादेव जानकर, मंत्री सदाभाऊ खोत, खा. प्रितम मुंडे यांच्यासह नगर व बीड जिल्ह्यातील आमदार उपस्थित होते.
  पंकजा मुंडे यांच्या भाषणातील काही ठळक मुद्दे – 
  – मी माझ्या भावांसाठी खूप लढत आहे. भगवान बाबांच्या आशिर्वादाने सदाभाऊ खोत, महादेव जानकर, राम शिंदे या माझ्या सर्व भावांना मी लाल दिवा दिला आहे.
  – भगवानगडाचं आणि माझं नातं बाप- लेकराचं आहे.
  – शिवाजी महाराजांच्या राज्यात भगवान बाबांच्यासारखे संत होऊन गेले.
  – भगवान बाबानी वैभवाची परंपरा दिली आहे.
  – मी आयुष्यात कधीही कोणतीही चूक केली नाही,आणि करणारही नाही.
  – मी माझ्या लेकारांसाठी भगवान गडावर आले .
  – भगवान गडला बाप मानलं त्याच्या विरोधात बोलणार नाही.
  – मी आधी भगवान बाबांची भक्त, त्यानंतर मंत्री.
  – माझ्या वडिलांच्या अस्थी भगवान गडावर आणल्या तेव्हा या गडाची मुलगी झाले.
  – मी अहंकाराचा, कारस्थानाचा बुरुज तुमच्यासाठी उतरले, पंकजा मुंडेंची धनंजय मुंडे, नामदेवशास्त्री यांच्यावर अप्रत्यक्ष टीका
  – इंजिनीअरिंगला प्रवेश मिळालेल्या ऊस तोडणी कामगाराच्या मुलाला २१ हजार रुपये शिष्यवृत्ती मुंडे प्रतिष्ठानकडून देणार.
  – हुंडा आणि स्त्री भ्रूण हत्येचा राक्षस संपवू टाका.
  – ऊस तोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्यांऐवजी पुस्तके द्यायचं माझं स्वप्न आहे.
  – मला अहंकार नाही, पण स्वाभिमान आहे.
  – गोपीनाथ मुंडे यांनी मला गडाचा धार्मिक वारसा दिला, गडाने मला कन्या मानले आहे.
  – माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न सुरु आहे. भ्रष्टाचाराचे आरोप आणि राजीनामे मागण्या-यांवर टीका
  – वर्षानुवर्षे सत्ता भोगणा-यांनी मराठी तरुणांसाठी काय केलं नाही, नुकसान केलं.
  – स्व:ताच्या फायद्यासाठी लोक राजकरण करत आहेत.
  – पुढच्या मेळाव्याला मला महंतच मुलगी म्हणून गडावर बोलवितील.
  – लेक म्हणून गडाबाबत अपशब्द काढणार आहे.

  बारामतीचे वाटोळे करणार- महादेव जानकरमहादेव जानकर म्हणाले, परळीचा चमचा आणि बारामतीची सुपारी आहे. मात्र पंकजा वाघीण आहे, हे लक्षात ठेवा. संतांनी कोणाचे चमचे व्हायचे नसते. विरोधीपक्षनेतेपदाचा चमचा घेवून तो पुढे आला आहे. आम्ही असे चमचे घेवून पुढे आलेलो नाहीत. भाजप मुंडे यांच्या पाठीशी राहिल की नाही ते सांगता येत नाही, मात्र माझा पक्ष सदैव पाठीशी आहे. त्यामुळेच बारामतीची वाट लावल्याशिवाय राहणार नाही, हे एका ब्रह्मचाऱ्याचे विधान खोटे ठरणार नाही.

 • 14390797_1092576130827947_7087417473840691078_n

  श्रमजीवी संघटनेचे नेते विवेक पंडित आणि पंकजा मुंडे यांच्यात चर्चा

  प्रत्यक्ष कुपोषण निर्मूलनासाठी ठोस उपाययोजना होत नाही तोपर्यंत मंत्र्यांचे दौरे होऊ देणार नाही अशी भूमिका श्रमजीवी संघटनेने घेतली होती. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी विवेक पंडित यांच्याशी स्वत: संपर्क करुन चर्चेचे निमंत्रण दिले. विवेक पंडितांनी हिरवा कंदील दिल्याने संघटनेच्या तीन हजार लोकांसमोर पंकजा मुंडे थेट चर्चेला आल्या.या चर्चेत श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित आणि शिष्टमंडळाने २५ प्रमुख मागण्या मुंडे यांच्यासमोर मांडल्या. मुंडे यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेऊन पाऊले उचलली जातील असे आश्‍वासन दिले.

  श्रमजीवीच्या शिष्टमंडळात विवेक पंडित यांच्यासोबत बाळाराम भोईर, विजय जाधव, दत्तू कोळेकर अशोक सापटे, सुरेश रेंजड, प्रमोद पवार, जया पारधी, संतोष धिंडा, पांडू मालक, इत्यादी कार्यकर्ते होते. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पोलीस अधिक्षिका शारदा राऊत, खासदार चिंतामण वणगा, आमदार पास्कल धनारे, आमदार मनीषा चौधरी, जि.प. अध्यक्ष सुरेखा थेतले, इत्यादी उपस्थित होते.

 • slider_new_03

  कुपोषणमुक्तीसाठी जच्चा बच्चा कार्यक्रम राबविणार- पंकजा मुंडे

  राज्यातील कुपोषण व बालमुत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यातील सात आदिवासी जिल्ह्यामध्ये बालके व मातांसाठी जच्चा -बच्चा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

  आज जव्हार मोखाडा या भागातील कुपोषणग्रस्त भागास मुंडे यांनी भेट दिली. यावेळी त्या बोलत होत्या , या दौऱ्या दरम्यान त्यांनी नुकतेच मोखाडा तालुक्यातील कळमवाडी येथील बालमृत्यु झालेल्या सागर वाघ व ईश्वर सवरा यांच्या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. या भेटी दरम्यान मंत्री मुंडे यांनी या दोन्ही कुटुंबियांच्या अडीअडचणी, व्यथा जाणून घेतल्या. बालमृत्यु झालेल्या दोन्ही बालकांच्या इतर भावंडाविषयी, त्यांच्या आरोग्याविषयी त्यांच्या कुटुंबियांकडे विचारणा केली. त्यांच्या आहाराकडे, औषधोपचाराकडे पर्यायाने आरोग्याकडे विशेष लक्ष पुरविण्याविषयी त्यांना सांगितले.

  यावेळी बोलतांना मुंडे म्हणाल्या, कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे.महिला व बालकल्याण ,आदिवासी व आरोग्य या विभागांमध्ये समन्वय साधुन हे प्रमाण कमी करण्यासाठी ठेास उपाययोजना करण्यात येतील कुपोषणाची समस्या दुर करण्यासाठी त्याची कारणे शोधुन ती समुळ नष्ट करण्यासाठी आवश्यक ते प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. येथील अज्ञान अस्वच्छता ,उदासीन दृष्टीकोन हे घटक कारणीभुतअसल्याचे जाणवले आहे. या दृष्टीने सामाजिक प्रबोधन हेाणे गरजेचे आहे. भविष्यामध्ये सामाजिक प्रबोधनाच्या माध्यमातून या लोकांमध्ये जागृती करण्यात येईल.

  जच्चा बच्चा कार्यक्रमाच्या माध्यमातुन शासन व प्रशासन एकत्रित येऊन या प्रश्नाची सोडवणुकीस प्राधान्य देणार असून दोन महिन्यातुन एकदा या सात आदिवासी जिल्ह्यांचा निवासी दौरा करुन समस्या सोडविण्यास चालना देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

  या भागातील एकंदरीत जीवनशैली, भौगोलिक स्थिती इत्यादी घटकही कुपोषणासारख्या स्थितीस कारणीभूत आहेत. त्यामुळे इथल्या नागरिकांचे प्रबोधन होऊन त्यांना अज्ञानातून बाहेर काढणे हि खरे तर आजची गरज असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. कुपोषणासारखे अत्यंत दुर्दैवी परिस्थिती भविष्यात उद्भवू नये यासाठी शासनाकडून युध्द पातळीवर प्रयत्न होत असल्याचे त्या म्हणाल्या. यासाठी मातांना आहार पुरविणारी डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याकडेही शासन विशेष लक्ष पुरविणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.

  या भागातील लोकांचे प्रबोधन केल्यामुळे ब-यापैकी प्रश्न सुटण्यास मदत होईल. जाणीवपूर्वक त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे. बालमृत्यु सारख्या दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी शासन प्रभावी उपाययोजना आखणार असून या नवनिर्मित पालघर जिल्ह्यातील रिक्तपदे भरणे, अंगणवाड्या, ग्रामीण रुग्णालय, अंगणवाडी सेवीका यांच्या समस्या सोडविणे यासाठी कालबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

  या दौऱ्या दरम्यान श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित यांनी मोखाडा विश्रामगृह येथे श्रीमती मुंडे यांना जव्हार-मोखाडा भागातील कुपोषणा विषयक निवेदन दिले.

  दौऱ्यात खा. ॲड. चिंतामण वनगा, आ. मनिषा चौधरी व पास्कल धनारे, जि. प. अध्यक्षा सुरेखा थेतले, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक शारदा राऊत तसेच शासकीय वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 • 14358926_1087162354702658_6230228298890319702_n

  कुपोषणमुक्तीसाठी होत असलेल्या प्रयत्नांचा राजभवनवर आढावा

  मुंबई : पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा या भागातील बालकांना कुपोषणाच्या समस्येतून सोडविण्यासाठी आरोग्य, महिला व बालकल्याण आणि आदिवासी या तिन्ही विभागांच्या समन्वयातून युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, असे निर्देश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी दिले.

  पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा तालुक्यात मोठ्या संख्येने कुपोषणग्रस्त बालके आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर त्यासंदर्भात आढावा घेण्यासाठी राजभवन येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

  राज्यपाल म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईलगतच्या जिल्ह्यांमध्ये कुपोषणाची गंभीर समस्या असणे चिंताजनक आहे. कुपोषणावर दीर्घकालीन उपाययोजनांबरोबरच तातडीच्या उपाययोजना हाती घ्याव्यात. तसेच येत्या महिनाभरात या भागातील कुपोषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवावे. कुपोषणमुक्तीसाठी सर्व विभागांनी समन्वयातून काम करावे.

  आदिवासी भागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य अधिकारी यांची २० सप्टेंबर रोजी बैठक घेऊन कृती आराखडा तयार करण्यात यावा. आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील रिक्त पदांवर नेमणूक झालेल्या डॉक्टरांनी हजर होण्यासाठी प्रभावी उपाय योजावेत. तसेच गैरहजर डॉक्टरांविरूद्ध गंभीर स्वरूपाची कारवाई करावी, असेही ते म्हणाले.

  कुपोषणग्रस्त भागातील नागरिकांच्या पाठिशी शासन भक्कमपणे उभे आहे, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होण्यासाठी सर्वच विभागांनी संवेदनशीलपणे काम करावे, असे सांगून राज्यपाल म्हणाले की, पुढील तीन महिन्यात या भागातील कुपोषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळेल असा कृती आराखडा तयार करा. आरोग्य शिबीर आयोजित करून बालकांची तपासणी मोहीम हाती घ्यावी.

  श्रीमती मुंडे म्हणाल्या की, २१ सप्टेंबर रोजी या भागाचा दौरा करणार असून अन्य विभागांच्या समन्वयातून कुपोषणाच्या समस्येवर मात करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यासाठी आरोग्य, आदिवासी आणि महिला व बालविकास विभागाच्या सचिवांची आणि आदिवासी भागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी व आरोग्य अधिकारी यांची बैठक घेण्यात येईल. पालघर, मोखाड्यावर विशेष लक्ष केंद्रीत करून संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची या भागात नेमणूक करून त्यांच्यावर समन्वयाची जबाबदारी देण्यात येईल.

  डॉ. सावंत म्हणाले की, मी मंगळवारी या भागाचा दौरा केला आहे. कुपोषण निर्मुलनासाठी विविध विभागाच्या ज्या योजना आहेत त्या एकाच विभागामार्फत राबविण्यात याव्यात. या सर्व योजना एकाच छताखाली आणल्यास समन्वय राखणे सुलभ होईल. आदिवासी कुपोषणग्रस्त भागात तपासणी जाण्यासाठी खासगी रुग्णालयांशी चर्चा केली आहे. जव्हार, मोखाडा तालुक्यांसाठी प्रायोगिक तत्वावर कुपोषण निर्मुलनासाठी मेळघाट पॅटर्न राबविण्यात यावा, असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

  यावेळी ग्रामीण बालविकास समिती (व्हीसीडीसी) कार्यान्वित करताना येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. आदिवासी भागातील अंगणवाड्यांना मिळणारा निधी थेट त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याबाबतही यावेळी समग्र चर्चा झाली. कुपोषण निर्मुलनाच्या मोहिमेत जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबतही विचारविनिमय करण्यात आला.

  बैठकीला महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव संजयकुमार, आदिवासी विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव (अतिरीक्त कार्यभार) विजय सतबीरसिंग, राज्यपालांचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, महिला व बालकल्याण आयुक्त विनीता सिंघल, राष्ट्रीय आरोग्य अभियान प्रकल्प संचालक प्रदीप व्यास आदी उपस्थित होते.

Page 4 of 31« First...23456...102030...Last »