• 14264813_1080726035346290_5959724356767393146_n

  अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन थेट बँक खात्यात जमा करण्यास शासनाची मंजुरी

  महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली माहिती

  मुंबई : राज्यातील अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका, मदतनीस यांचे मानधन आयुक्तालयस्तरावरुन उपकोषागार कार्यालय, कोकणभवन येथून गोषवारा पद्धतीने एकत्रित आहरित करुन (PFMS-Public Financial Management System) या प्रणालीद्वारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यास शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

  श्रीमती मुंडे म्हणाल्या की, अंगणवाडी कर्मचारी यांचे मानधन वेळेत मिळण्यासाठी व मानधन वाटप कामकाजात पारदर्शकता राहण्यासाठी पीएफएमएस प्रणालीद्वारे मानधन प्रदान करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनानेही अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका, मदतनीस यांचे मानधन याच प्रणालीद्वारे करण्याबाबत सूचित केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

  आयुक्तालयस्तरावर राज्यातील सर्व प्रकल्पातील अंगणवाडीसेविका, मिनी अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांची एकत्रित हजेरी व त्याद्वारे देयक तयार करण्यासाठी आवश्यक असलेली माहिती संकलित करण्यासाठी आयुक्तालयाने येस बँकेच्या मदतीने संगणक प्रणाली (Software) विकसित केले आहे. या विकसित केलेल्या प्रणालीसही मान्यता देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

  आयुक्तालयाने विकसित केलेल्या संगणक प्रणालीमध्ये राज्यातील सर्व सेविका, मदतनीस यांनी नावे, बँक खाते क्रमांक, आधार कार्ड क्रमांक, आहरण व संवितरण अधिकारी यांची माहिती अपलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून पीएफएमएस प्रणालीद्वारे मानधनाची रक्कम सेविकांच्या खात्यात थेट जमा करण्याची पद्धत पूर्ण राज्यात लवकरात लवकर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

   

 • 14088528_1071303972955163_8591447900066866088_n

  स्त्री शक्तीच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

  सोलापूर : राज्याच्या विकासात स्त्रीयांचे योगदान मोलाचे आहे. त्यांना बळ देण्यासाठी शासन सक्षम आहे. स्त्री शक्तीच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

  सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागामार्फत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत उत्कुष्ट कार्य केलेल्या अंगणवाडी सेविका पारितोषिक वितरणप्रसंगी त्या बोलत होत्या.

  यावेळी व्यासपीठावर जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपट बनसोडे, जि.प.अध्यक्षा जयमाला गायकवाड, आमदार बबनदादा शिंदे, जि.प.उपाध्यक्ष शहाजी देशमुख, सभापती ॲड,सुकेशिनी देखमुख, कल्पना निकंबे-क्षीरसागर, मकरंद निंबाळकर, अप्पाराव कोरे, शिवानंद बिराजदार आदी मान्यवर उपस्थित होते.

  श्रीमती मुंडे म्हणाल्या, अंगणवाडी सेविकांना वाढीव मानधन मिळावे यासाठी शासनाने सुमारे 228 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. भविष्यात मुलींना कौशल्य शिक्षण देण्यात येणार असून त्यासाठी 10 हजार रुपयांची तरतूद केली जाईल. स्त्रियांनी स्त्री जन्माचे स्वागत करावे, त्याचबरोबर स्वच्छता अभियान प्रभावीपणाने राबवावे, असे आवाहन करुन आरोग्य विभागात जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

  निर्मिती लॉन्सच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सन 2015-16 व 2016-17 या वर्षात उत्कृष्ट कार्य केलेल्या 244 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी शहाजी पवार, वसंतराव देशमुख, जि.प.बालकल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक सावंत यांच्यासह जिल्ह्यातील अंगणसेविका उपस्थित होत्या.

 • 14088592_1070749013010659_595999880397125816_n

  आमचा गावा आमचा विकास कार्यक्रम राज्यात प्रभावीपणे राबविणार – पंकजा मुंडे

  पंढरपूर : गावांचा विकास व्हावा, गावे स्वयंपूर्ण बनावित यासाठी 14 व्या वित्त आयोगातून ‘आमचा गावा आमचा विकास’ हा कार्यक्रम राज्यात प्रभावीपणे राबविला जाईल, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

  माळशिरस पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते संपन्न झाला, त्या प्रसंगी आयोजित समारंभात त्या बोलत होत्या. समारंभास सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, आमदार रामहरी रुपनवर, आमदार प्रशांत परिचारक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, पोलीस अधिक्षक विरेश प्रभू उपस्थित होते.

  ग्रामविकासमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, 14 व्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायातीसाठी आहे. यातून गावातील विकास कामे केली जाणार आहेत. या निधीमुळे गावांचा विकास होण्यास मदत होणार आहे. गाव, खेडी स्वयंपूर्ण झाली तर राज्याचा विकास जलदगतीने होईल, असेही ग्रामविकास मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या.

  सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यास राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असल्याचे सांगून ग्रामविकास मंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, विकास कामे जलदगतीने करण्यावर शासनाने भर दिला आहे. तसेच महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याबरोबरच मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी माझी कन्या भाग्यश्री योजना सुरु करण्यात आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचा स्वनिधी वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असून यासाठी काही कामे बीओटी तत्त्वावर करुन घेतली जाणार आहेत.

  निरा-देवधर धरणाच्या कालव्यांची कामे अपूर्ण असल्याने माळशिरस तालुक्यातील काही भाग अविकसित राहिला आहे. कालव्यांच्या अपूर्ण कामासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी यावेळी बोलतांना सांगितले.

  पालकमंत्री श्री.देशमुख म्हणाले, निरा-देवधर धरणातील पाणी या भागासाठी मिळावे यासाठी नजिकच्या काळात जलसंपदा मंत्री यांच्यासमवेत बैठक घेतली जाईल. माळशिरस तालुका व जिल्ह्यात ग्रामविकासाच्या कामांना अधिक निधी मिळावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी बोलतांना केली. यावेळी आमदार प्रशांत परिचारक, आमदार रामहरी रुपनवर, सभापती श्रीमती बेंदगुडे यांनी मनोगत व्यक्त केले.

  समारंभास पंचायत समितीच्या सभापती रुपाली बेंदगुडे, उपसभापती शुभांगी देशमुख, अतीरिक्त पोलीस अधीक्षक मनिषा दुबुले,अतीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पोपटराव बनसोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई यांच्या अनेक मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

 • MNAIMAGE29561pankaja munde

  ग्रामीण भागातील नागरिकांना योजनांचा लाभ मिळवून द्यावा – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

  मुंबई : ग्रामविकास विभागाच्या विविध योजना गतिमान करून त्याचा ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश आज ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

  श्रीमती मुंडे यांच्या मंत्रालयीन दालनात आढावा घेण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यासह ग्रामविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, स्मार्ट ग्राम योजना, आमचा गाव – आमचा विकास, प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजना आदी विविध योजनांचा आढावा घेऊन विभागाचे कामकाज गतिमान करण्याचे निर्देश दिले.

  प्रत्येक गावात आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करा : पंकजा मुंडे

  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज मंत्रालयातून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून ग्रामविकास विभागाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विभागीय स्तरावरील अधिकाऱ्यांशीही संवाद साधला.

  राज्यातील प्रत्येक गावांत ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. आमचा गाव-आमचा विकास या अभियानांतर्गत गावागावांमध्ये घेण्यात आलेल्या कार्यशाळांविषयीची माहिती त्यांनी यावेळी घेतली. या अभियानांतर्गत राज्यातील सर्व गावांचे विकास आराखडे तयार करण्यात येत आहेत. याबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीचीही त्यांनी माहिती घेतली. ग्रामविकास विभागाच्या विविध योजना गतिमान करून त्याचा ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ मिळवून द्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 • MNAIMAGE74694Pankaja munde

  अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने करावे- पंकजा मुंडे

  मंत्रालयात पालकमंत्री, खासदारांच्या उपस्थितीत बैठक

  मुंबई : अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने होण्याच्या दृष्टीने उर्वरित भूसंपादन लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. रेल्वे मार्गाचे काम गतिमान होण्याच्या दृष्टीने अडीअडचणी दूर करुन बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. या रेल्वेमार्गाचे काम कोणत्याही परिस्थितीत आधी निश्चित केल्याप्रमाणे मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होण्याच्या दृष्टीने गतिमान कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

  श्रीमती मुंडे व बीडच्या खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात यासंदर्भात उच्चस्तरीय आढावा बैठक झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी रेल्वे विभागाचे मुख्य अभियंता बी. के. टिरके, उपमुख्य अभियंता ए. के. तिवारी, रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी विद्याधर धांडोरे, रेल्वेचे कार्यकारी अभियंता सचिन मुंगसे, बीडचे अप्पर जिल्हाधिकारी अनिल पवार, उपजिल्हाधिकारी कल्याण बोडखे, चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी गणेश निऱ्हाळी, बीडचे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख डॉ. विजय वीर आदी उपस्थित होते.

  भूसंपादनाचे काम जलदगतीने करा
  पालकमंत्री श्रीमती मुंडे व खासदार डॉ. मुंडे यांनी कामाच्या सद्यस्थितीसंदर्भात सविस्तर आढावा घेतला. कामात येणाऱ्या अडीअडचणी समजून घेतल्या. पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाचा प्रकल्प म्हणून अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम प्राधान्यक्रमावर घेतले आहे. केंद्र व राज्य शासनाने या प्रकल्पासाठी प्रथमच भरीव निधी उपलब्ध करुन दिला आहे. हे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने उर्वरीत भूसंपादनाचे काम जलदगतीने होणे गरजेचे आहे. यासाठी रेल्वे आणि जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करुन उर्वरित जमीन तातडीने संपादीत करुन ती रेल्वेला उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

  काही गावामध्ये भूसंपादनाच्या मोबदल्याविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाने संबंधित प्रत्येक तालुक्यात नोडल ऑफिसरची नेमणूक करुन या अडचणी तत्काळ दूर कराव्यात. जिल्हास्तरावरही या कामी समन्वय अधिकाऱ्याची नेमणूक करुन भूसंपादन, त्याच्या सुनावण्या, शेतकऱ्यांना मोबदला आदी प्रश्न मार्गी लावावेत, असेही त्यांनी सांगितले.

  वाळू उपलब्धतेसाठी कार्यवाही करा
  रेल्वेच्या कामासाठी वाळूची अडचण येत असल्याचा प्रश्न याप्रसंगी उपस्थित झाला. रेल्वेचे काम हे लोकहिताचे आहे. त्यामुळे या बाबतीत पर्यावरणविषयक बाबींची पूर्तता करुन रेल्वेला तातडीने वाळू उपलब्ध होईल यादृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. काही ठिकाणी विजेचे टॉवर / खांब यांचा अडथळा होत असल्याचा प्रश्नही याप्रसंगी उपलब्ध झाला. यावर ऊर्जा विभागाच्या संबंधीत कार्यकारी अभियंत्यांशी दूरध्वनीवरुन बोलणे करुन हा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
  बीडच्या रेल्वेसाठी प्रथमच भरीव निधी- डॉ.मुंडे
  खासदार डॉ. मुंडे म्हणाल्या की, केंद्र शासनाने या प्रकल्पासाठी खूप मोठा निधी प्रथमच उपलब्ध करुन दिला आहे. मंजूर निधीपैकी बहुतांश निधी जिल्हा प्रशासन आणि रेल्वे विभागाला वर्ग करण्यात आला आहे. राज्य शासनानेही त्यांच्या हिश्यातील बहुतांश निधी उपलब्ध करुन दिला आहे. यापुढील काळातही या प्रकल्पासाठी कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही केंद्र शासनाने दिली आहे. आपणही यासाठी केंद्र शासनाकडे भक्कम पाठपुरावा करु. त्यामुळे या कामाला रेल्वे विभाग, बीड आणि अहमदनगर जिल्हा प्रशासनाने प्राधान्याचे स्थान देऊन अधिकाधिक गतीमान करावे व बीड जिल्ह्यातील नागरिकांचे रेल्वेचे स्वप्न लवकरात लवकर साकार होईल, यादृष्टीने कार्यवाही करण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.

   

 • 13925220_1061608803924680_8162661584987330261_n

  परस्पर सहकार्याने काम केल्यास जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल- पंकजा मुंडे

  स्वातंत्र्य दिनाचा समारंभ उत्साहात संपन्न

  बीड : जिल्ह्याच्या विकासात प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेने परस्पर सहकार्याने काम केल्यास जिल्ह्याचा अधिक वेगाने विकास‍ निश्चितच शक्य असल्याची ग्वाही देत पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यातील तमाम जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

  भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री श्रीमती मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डी.व्ही.निला यांची प्रमुख उपस्थिती होती.

  जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द असल्याचा पुनरोच्चार करताना श्रीमती मुंडे म्हणाल्या, टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी राज्यात जलयुक्त शिवार अभियानात 100 टक्के जलयुक्त शिवारची कामे पूर्ण केली आहेत आणि यावर्षी 256 गावे निवडण्यात आली आहेत. निवड करण्यात आलेल्या गावात 5 हजार 976 कामे प्रस्तावित असून या कामांसाठी 55 कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. या कामांमुळे सातत्याने टंचाईचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यातील जनतेला निश्चित दिलासा मिळणार आहे.

  टंचाई परिस्थितीत स्व. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्ह्यात महाआरोग्य शिबीर राबवून आरोग्यसेवेचा नवीन पॅटर्न निर्माण केला आहे. या शिबीरामध्ये अंदाजे 2 लाख रुग्णांनी लाभ घेतला आहे तसेच विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून रुग्ण बरे झाले असल्याचे सांगून त्यांनी बीड जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांना आय.एस.ओ. नामांकन प्राप्त असून 117 अंगणवाडी केंद्र हे डिजीटल करण्यात आलेली असल्याचे सांगितले.

  इंदिरा आवास योजनेचे स्वरुप बदलून पंतप्रधान आवास योजना असे करण्यात आले आहे. इंदिरा आवास योजनेअंतर्गत प्रती घरकुलासाठी आता प्रति घरकुलांना 1 लाख 20 हजार रुपये याव्यतिरिक्त शौचालयासाठी आणि रोजगार हमी योजनेअंतर्गत वेळी निधी देण्यात येणार असून श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन मिशन अंतर्गत गावे विकसित करण्यासाठी जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा क्लस्टर निवडण्यात आले आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाच्या कामासाठी यंदाच्या पुरवणी अर्थसंकल्पात 503 कोटी 92 लाख रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हा रेल्वेमार्ग अधिक गतीने पूर्णत्वाकडे जाणार आहे. या कामांमुळे जिल्ह्याचा विकास होण्यास मोठा हातभार लागणार असल्याचा विश्वासही श्रीमती मुंडे यांनी व्यक्त केला.

  14 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना थेट मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. आयोगाच्या निर्देशानुसार आमचं गाव आमचा विकास उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यात येणार असून या योजनेच्या माध्यमातून ग्रामविकासाला निश्चितच चालना मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

  श्रीमती मुंडे यांच्या हस्ते ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेतील लाभार्थ्यांचा प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा-राज्यस्तरीय गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांचाही पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. महिला व बाल विकास विभागाच्यावतीने कन्या माझी भाग्यश्री आणि आरोग्य विभागाच्यावतीने अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या चित्ररथांचा शुभारंभही श्रीमती मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला.

  सूत्रसंचालन ॲड. संगीता धसे व नितिन जाधव यांनी केले.

 • जलयुक्तच्या कामांमुळे पाणीपातळी वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांची उन्नती होण्यास मदत- पंकजा मुंडे

  बीड : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून गावाशिवारातील पाणीपातळी निश्चितच वाढणार आहे आणि पर्यायाने परिसरातील शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यास मदत होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

  शिरुर तालुक्यातील पाडळी येथे जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नाला खोलीकरण व त्यावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यातील जलसंचयाच्या पूजनप्रसंगी श्रीमती मुंडे बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, पाडळीचे सरपंच संतोष कंठाळे, सर्जेराव तांदळे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

  श्रीमती मुंडे म्हणाल्या, टंचाई निवारणासाठी तसेच शाश्वत सिंचन उपलब्ध होण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान हा महत्वाकांक्षी उपक्रम सुरु केला आहे. या अभियानाअंतर्गत बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आणि दर्जेदार कामे झाली आहेत. नुकत्याच झालेल्या पावसामुळे जलयुक्तच्या कामांमध्ये चांगला जलसंचय निर्माण झाला आहे. या जलसंचयामुळे परिसरातील पाणी पातळी वाढण्याबरोबर विहीरी, बोअर यांनाही नवजीवन प्राप्त झाले आहे. जलयुक्तच्या या कामांच्या यशस्वीतेमुळे शेतकऱ्यांची उन्नती होण्यासही निश्चितच मदत होईल. शिरुर तालु्क्यात जलयुक्त शिवारच्या कामांबरोबर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधून रस्त्यांची कामे मोठया प्रमाणात हाती घेण्यात येणार असून या कामांमुळे शिरुर तालुक्यातील गावांचा विकास होण्यास मदत होईल. तसेच तालुक्यातील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल.

  या बंधाऱ्यामुळे पाडळी गावपरिसरातील सात विहीरी आणि आसपासच्या शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. श्रीमती मुंडे यांनी पाडळी गावातील दलित वस्तीमधील समाज मंदीराला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

  पालकमंत्री पंकजा मुंडे यांची शांतीवन संस्थेस भेट
  श्रीमती मुंडे यांनी शिरुर तालुक्यातील आर्वी येथील भवानी विद्यार्थी कल्याण प्रतिष्ठानच्या शांतीवन संस्थेस भेट देऊन पाहणी केली. त्या म्हणाल्या, आत्महत्याग्रस्त, वंचित आणि निराधार शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शासन विविध योजना राबवित आहे. परंतु शांतीवन संस्थेने सामाजिक भावनेमधून अशा विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण, वसतीगृह उपलब्ध करुन देऊन त्यांचे दु:ख कमी करण्याचा केलेला प्रयत्न हा निश्चितच अभिनंदनीय आहे. संस्थेने या मुलांचे बालपण न हरवू देता त्यांना चांगले शिक्षण देऊन एक संस्कारित पिढी घडविण्यासाठी हातभार लावावा.

  श्रीमती मुंडे यांनी शांतीवन संस्थेस स्व. गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानकडून या वर्षीपासून दरवर्षी 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिनी 1 लाख 51 हजार रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले. संतोष मानूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी श्री. राम, श्री.ननावरे, शांतीवन संस्थेचे उपाध्यक्ष सुरेश जोशी, आर्वीच्या सरपंच श्रीमती जयश्री जोगदंड आदींची प्रमुख उपस्थिती होती.

  यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निराधार विद्यार्थ्यांचा प्रातिनिधीक स्वरुपात गौरव करण्यात आला. प्रारंभी शांतीवन संस्थेतील विद्यार्थ्यांच्या लेझीम पथकाने श्रीमती मुंडे यांचे स्वागत केले. शांतीवनचे दीपक नागरगोजे यांनी संस्थेच्या कामाविषयी माहिती देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

   

 • ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेने आपली गावे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करावा – पंकजा मुंडे

  बीड : आपले आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी स्वयंप्रेरणेने आपली गावे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी केले.

  खासदार प्रीतम मुंडे यांनी सांसद आदर्शग्राम योजनेसाठी निवडलेल्या परळी तालुक्यातील पोहनेर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीचे लोकार्पण व पोहनेर ते सिरसाळा आणि दिग्रस ते पोहनेर या रस्त्यांच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी पालकमंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या सांसद आदर्श ग्राम योजनेमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांनी निवडलेल्या पोहनेर गावाने उत्तमोत्तम कार्य केले असून ग्रामस्थांच्या भरीव योगदानातून विविध विकास कामे होत असल्याचे सांगून पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पोहनेर गावच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर नक्कीच नोंद होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.

  गेल्या दीड वर्षाच्या काळात पोहनेर गावामध्ये शासनाच्या वतीने तब्बल 9 कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण होत आली आहेत. पाणीपुरवठा आणि जलसंधारणाच्या कामासाठी जिल्ह्याला सर्वात जास्त प्रमाणात निधी आणता आला याचा मला अभिमान असून अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात निधी आणण्याची पहिलीच वेळ असल्याचे पालकमंत्री मुंडे यांनी स्पष्ट केले.

  पोहनेर गावातील शाळेसाठी 2 कोटी, रस्त्यांसाठी 4 कोटी आणि पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी 18 लाख 50 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे सांगून श्रीमती मुंडे यांनी पुढील काळात पोहनेर गावाचा सर्वांगीन विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही दिली.

  शौचालय बांधकामासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन पोहनेर वासियांनी 100 टक्के शौचालय बांधून 2 ऑक्टोबरपर्यंत गाव हागणदरीमुक्त करावे, अशी सूचना करून पालकमंत्री मुंडे यांनी पोहनेर गावात ग्रामस्थांच्या सहभागातून विविध यशस्वी प्रकल्प राबविले जात असल्याबद्दल कौतूक केले. तसेच काटकसर करून कमी खर्चात उत्तम पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत बांधल्याबद्दल बांधकाम व्यावसायिकाचेही अभिनंदन केले.

  या समारंभात मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांनी मनोगत व्यक्त केले. पोहनेर गावातील विकासकामांची माहिती देऊन त्यांनी नाते जबाबदारीचे या उपक्रमाला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल सांगितले. आमचा गाव आमचा विकास या उपक्रमाबद्दल सांगून एक लक्ष शौचालय बांधण्याचा बीड जिल्हा परिषदेने संकल्प केला असल्याचे ननावरे यांनी स्पष्ट केले.

  यावेळी उद्घाटन करण्यात आलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत बांधकामासाठी 20 लक्ष रुपये निधी उपलब्ध असताना कंत्राटदाराने काटकसर करून केवळ 17 लाख 50 हजार रूपयांमध्ये बांधकाम पूर्ण केले आहे. याशिवाय पोहनेर ते सिरसाळा या रस्त्याच्या कामासाठी 2 कोटी 46 लाख 55 हजार रूपये आणि दिग्रस ते पोहनेर रस्त्याच्या कामासाठी 47 लाखा 12 हजार रूपये खर्च येणार आहे. ही कामे नाबार्ड टप्पा 20 अंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्ण करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमास परिसरातील सरपंच, सदस्य, पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 • 13669217_1051394898279404_675653583483267791_n

  ग्रामीण बचत गटांच्या वस्तुंचे मुंबईतील प्रदर्शन कौतुकास्पद – मुख्यमंत्री

  • बार्शीतील आरएसएम समाजसेवा संस्थेच्या प्रदर्शनाचे उद्घाटन
  मुंबई : सोलापूर जिल्ह्यातील बार्शीसारख्या ग्रामीण भागातील बचत गटांच्या वस्तुंचे मुंबईमध्ये प्रदर्शन भरविणे हा कौतुकास्पद उपक्रम आहे. ग्रामीण भागातील बचतगटांना मुंबईची बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी आरएसएम समाजसेवा संस्थेने राबविलेल्या या उपक्रमातून बचतगट चळवळीला निश्चितच प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केले.येथील सचिवालय जिमखाना येथे बचत गटांद्वारे उत्पादित वस्तुंच्या या प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास आणि महिला – बालविकास मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, परिवहन राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, आरएसएम समाजसेवा संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांच्यासह बचत गटांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  बार्शी (जि. सोलापूर) येथील आरएसएम समाजसेवा संस्थेमार्फत या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन आणि विक्री आज आणि उद्या (दि. २ ऑगस्ट) पर्यंत सुरु राहणार आहे.

  मुख्यमंत्री म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील अनेक चांगल्या व वेगवेगळ्या चवीच्या खाद्यवस्तू या प्रदर्शनात उपलब्ध असून सोलापूरच्या पदार्थांची चवच वेगळी आहे. बचटगट चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. बचट गटांना सर्वतोपरी मदतीसाठी राज्य शासन नेहमीच त्यांच्या पाठीशी राहील, असे ते म्हणाले.

  बचत गटांमार्फत ग्रामीण विकासाला चालना – पंकजा मुंडे
  बचत गट उत्पादनांची पाहणी करताना प्रतिक्रिया देताना ग्रामविकास, महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, आरएसएम समाजसेवा संस्थेमार्फत आयोजित हा उपक्रम चांगला आहे. स्थानिक, ग्रामीण पातळीवरील रोजगाराला यातून मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. बचतगटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देऊन ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास आणि महिला-बालविकास विभागामार्फत व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत. बचतगटांमार्फत ग्रामीण महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यात येईल, असे त्या म्हणाल्या.यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘मदरटच’ या लोगोचेही अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्र्यांसह यावेळी उपस्थित मंत्र्यांनी बचतगटांच्या स्टॉलला भेट देऊन उत्पादनांची माहिती घेतली.

   

 • 1435

  पंचायत समिती म्हणजे ग्रामविकासासाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार – ग्रामविकासमंत्री श्रीमती पंकजा मुंडे

  खालापूर पंचायत समिती नुतन इमारत लोकार्पण सोहळा संपन्न

  अलिबाग : पंचायत समिती म्हणजे ग्रामविकासासाठी असलेले महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे ही इमारत सुसज्जच पाहिजे, त्याशिवाय सर्व सामान्यांसाठी सेवा व समाधान देणारी असावी, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी खालापूर येथे केले.

  खालापूर येथील पंचायत समितीच्या नुतन प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार सर्वश्री सुरेश लाड, प्रशांत ठाकूर, मनोहर भोईर, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती उमा मुंढे, खालापूर पंचायत समितीच्या सभापती श्रीमती मालतीताई खांडेकर, उपसभापती श्यामसुंदर साळवी, सदस्य निवृत्ती पिंगळे, गजानन मांडे, दत्तात्रेय पुरी, लता पवार, वत्सला मोरे, दिप्ती म्हात्रे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, कर्जत प्रांताधिकारी दत्ता भडकवाड, खालापूर तहसिलदार राजेंद्र चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.

  श्रीमती मुंडे म्हणाल्या, राज्यातील प्रत्येक पंचायत समितीची इमारत ही सुसज्ज व तत्पर सेवा देणारी असली पाहिजे. कारण राज्यातील गोरगरीबांसाठी ही इमारत महत्त्वपूर्ण असे कार्य करणारी आहे. कामासाठी येथे येणाऱ्या प्रत्येकाचे काम होऊन त्यास समाधान मिळाले पाहिजे. त्यासाठीच आपले शासन कार्य करीत आहे. पंचायत समितीची ही नतुन वास्तू अत्यंत देखणी असून या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे भाग्य मिळाल्याबद्दल त्यांनी संयोजकांचे आभार मानले. ग्राम विकासात शासन महत्त्वपूर्ण असे कार्य करीत असून लोकाभिमुख उपक्रम, योजना या विभागामार्फत सुरु आहेत. यात प्रामुख्याने विकासासाठी उपयुक्त असलेली आमचे गाव-आमचा विकास ही योजना आहे. ग्राम विकासास चालना दिली तर खरा विकास होईल. त्यासाठी याकडे लक्ष केंद्रीत करावे लागेल. ग्रामीण भाग स्वंयपूर्ण होणे आवश्यक आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

  अंगणवाडी सेविकांच्या थकित मानधनाचा प्रश्न आता लवकरच सुटेल, असा विश्वास देऊन राज्यातील अंगणवाड्या स्मार्ट अंगणवाड्या होऊन स्वत:च्या इमारतीमध्ये जातील. सोलर विजेची यंत्रणा तसेच जगातील ज्ञान त्यांना सहज मिळावे यासाठी टी.व्ही. आदि व्यवस्था अंगणवाडीत असेल, असेही त्या म्हणाल्या.

  या कार्यक्रमात येण्यापूर्वी मंत्री महोदयांनी महडच्या वरद विनायकाचे दर्शन घेतले. त्याचा दाखला देत त्या म्हणाल्या, राज्यातील प्रत्येक विभाग हा कोकणासारखा निसर्गाने संपन्न व सुरेख कर अशी प्रार्थना मी वरद विनायकाकडे केली आहे. कोकणातील हिरवळ व खळखळणारे पाणी पाहून मनास आनंद वाटतो. कोकणवासीयांच्या माझ्या विभागाकडील काही मागण्या असतील तर त्या सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

  खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, पंचायत समिती हे तालुक्याचे प्रमुख कार्यालय असते. त्यामुळे खालापूर येथे उभारलेली ही पंचायत समितीची इमारत तालुक्यातील प्रत्येकासाठी महत्वपूर्ण आहे. येथे येणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे काम तात्काळ व्हावे, तक्रारीस वाव असू नये असे अधिकारी व कर्मचारी यांनी वागावे, तरच हे कार्यालय सर्वसामान्य जनतेला आपलेसे वाटेल. तसेच त्यांनी इमारतीच्या पूर्णतेबद्दल सर्वांना धन्यवाद दिले.

  आमदार सुरेश लाड यांनी या कार्यालयाकडून आता जास्तीत जास्त लोकाभिमुख कार्य व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तर आमदार मनोहर भोईर यांनी या नुतन वास्तूचा खालापूरकरांना निश्चित आनंद वाटतो असे सांगून, या इमारतीद्वारे प्रत्येकाला न्याय मिळेल अशी भावना ठेवा, असे आवाहन केले.

  कार्यक्रमाच्या प्रारंभी नुतन इमारतीचे उद्घाटन करुन मंत्री महोदयांनी व उपस्थितांनी दीप प्रज्वलन केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

  या कार्यक्रमास खालापूर परिसरातील नागरीक, जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच नगरपरिषदेचे आजी माजी सदस्य, अधिकारी, कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Page 5 of 31« First...34567...102030...Last »