• WhatsApp Image 2017-05-29 at 12.05.44 PM(1)

  अस्मिता आणि सुमतीबाई सुकळी उद्योगिनी योजना उत्तर प्रदेश सरकार राबविणार

  मुंबई : राज्यात राबविण्यात येणाऱ्या सवलतीच्या दरात सॅनेटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या अस्मिता योजना आणि शून्य टक्के व्याजदराने महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येणारी सुमतीबाई सुकळीकर महिला सक्षमीकरण अशा योजना उत्तर प्रदेश सरकार राबविणार असल्याचे उत्तर प्रदेशच्या महिला व बालविकास मंत्री रिटा बहूगुणा यांनी सांगितले.

  सह्याद्री राज्य अतिथीगृहात आयोजित मंत्री पंकजा मुंडे यांच्या भेटीदरम्यान त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांची उपस्थिती होती.

  मंत्री श्रीमती मुंडे यांनी या भेटी दरम्यान, महाराष्ट्र राज्यात महिला व बालविकास मंत्री पदाचा पदभार स्वीकारल्या पासून राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यामध्ये माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत बी.पी.एल. व ए.पी.व्ही.एल कुटुंबात जन्मणाऱ्या मुलीच्या नावे 21 हजार एवढी रक्कम गुंतवली जाते. 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1 लाख रुपये रक्कम मुलीला दिली जाते तसेच मुलीच्या आजी आजोबा यांच्यासह गावाचाही गौरव करण्यात येत आहे. या योजनेत मुलीचे शिक्षण, आरोग्य यासाठी आर्थिक लाभामुळे मुलींचा जन्मदर वाढण्‍यास मदत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

  बलात्कार, बालकांवरील अत्याचार आणि ॲसिड हल्ला यामध्ये बळी पडलेल्या महिला व बालकांना अर्थसहाय्य व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी. राज्यात मनोधैर्य योजना सुरु करण्यात आली असून या योजनेतील अर्थसहाय्य वाढविण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती त्यांनी दिली. याचबरोबर आदर्श अंगणवाडी, पोषण धोरण,सी.एस.आर.धोरण, कौशल्य विकास योजने अंतर्गत महिलांना प्रशिक्षण देऊन उद्योग सुरु करण्यास प्रोत्साहन देण्यात येते, अशा विविध योजनांची माहिती मंत्री पंकजा मुंडे यांनी त्यांना दिली.

  उत्तर प्रदेश सरकारचे निमंत्रण मंत्री मुंडे यांनी स्वीकारले
  उत्तर प्रदेशमध्ये महिलांविषयी मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे मंत्री रिटा बहुगुणा यांनी सांगून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबद्दल मंत्री मुंडे यांना निमंत्रीत केले. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याबद्दल मंत्री मुंडे यांनी सहमती दर्शविली. मंत्री मुंडे म्हणाल्या की, देशातील सर्व महिला मंत्र्यांना या कार्यक्रमात बोलविण्याची सूचना मांडल्यानंतर मंत्री बहुगूणा यांनी ती तत्काळ मान्य करून सर्व महिला मंत्र्यांना आमंत्रित करणार असल्याचे सांगितले.