• Untitledsdfsf-1

    तालुका विक्री केंद्रांची बांधकामे कालमर्यादेत पूर्ण करावीत – ग्रामविकासमंत्री मुंडे

    मुंबई : राज्यातील स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेंतर्गत मंजूर असलेल्या तालुका विक्री केंद्रांची बांधकामे कालमर्यादेत पूर्ण करावीत. पूर्ण झालेली केंद्रे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादित वस्तू विक्रीसाठी देण्यात यावीत, असे निर्देश ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.

    मंत्री मुंडे यांच्या दालनात कायमस्वरुपी तालुका विक्री केंद्रासंदर्भात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे जीवनमान उंचवावे व त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी स्वयंसहाय्यता गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासनाने स्वर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेंतर्गत कायमस्वरुपी तालुका विक्री केंद्र बांधण्यासाठी एकूण 180 केंद्रांना मंजूरी देऊन 45 कोटी रुपये वितरीत केले आहेत. 180 केंद्रांपैकी 80 तालुका केंद्रांची कामे प्रगतीपथावर असून, ती कालमर्यादेत पूर्ण करावीत.

    तालुका विक्री केंद्राच्या बांधकामामध्ये ठराविक बाबींचा समावेश करुन 25 लक्ष रुपयांच्या मर्यादेत टाईप प्लान मुख्यवास्तुशास्त्रज्ञ महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून बनवून घेण्यात आलेले आहेत. टाईप प्लाननुसार तालुका विक्री केंद्राचे बांधकाम करण्याचे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मंजूर असलेल्या केंद्रांसंबंधात संबंधितांनी अपूर्ण कामे त्यासाठी लागणारा निधी, असलेल्या अडचणी यासंदर्भात येत्या 15 दिवसात सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.