• MNAIMAGE3790pankaja munde1

  अस्मिता योजनेचे अमेरिकेच्या शिष्टमंडळाकडून कौतुक

  शिष्टमंडळाने घेतली मंत्री पंकजा मुंडे यांची भेट

  मुंबई : शालेय मुलींच्या आरोग्य रक्षणासाठी पाच रुपयात सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने राज्य शासन सुरु करत असलेल्या अस्मिता योजनेचे अमेरिकेच्या शिष्टमंडळाने कौतुक केले. वर्ल्ड लर्निंग संस्थेमार्फत आयोजित कार्यक्रमांतर्गत अमेरिकेच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात ग्रामविकास आणि महिला -बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली.

  शासनामार्फत महिला आणि बालकांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती श्रीमती मुंडे यांनी शिष्टमंडळाला दिली. सॅनिटरी पॅडची उपलब्धता सुलभरित्या होण्यासाठी महाराष्ट्र शासन सुरु करत असलेली अस्मिता योजना कौतुकास्पद असल्याची प्रतिक्रिया शिष्टमंडळातील सदस्यांनी दिली. शिष्टमंडळात अमेरिकेच्या प्रशासन, विज्ञान, आरोग्य, पोषण, विकास, उर्जा आदी विविध क्षेत्रातील सदस्यांचा समावेश होता. श्रीमती कॅरी कारपेंटर, ॲलेशिया रॉटलिफ, एलिझाबेथ हाविस्टो, टिमॉथी लॉव्हेल, तारिक अहमद, रॅन्डॉल मेयेर, केवीन सर्व्हिक, ॲडम हॅरेल, सिजर ऑगस्टो व्हेन्स, श्रीमती लॉरा रोज व्हाईट आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. भारतीय शासन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी हे शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमवेत विविध विषयांवर चर्चा केली.

  स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्य शासन यांच्यामध्ये अधिकार विभागणीवरुन कधी विवाद होतो का, असा प्रश्न शिष्टमंडळातील सदस्यांनी विचारला. त्यावर श्रीमती मुंडे म्हणाल्या की, शासनाचे धोरण विकेंद्रीकरणाला प्रोत्साहन देणारे आहे. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांना भरपूर अधिकार देण्यात आले असून त्यांचे सक्षमीकरण करण्यावर शासनाचा नेहमीच भर राहिला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावातील शेवटच्या घटकापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था पोहोचतात. राज्याच्या विकासात त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे, असे त्यांनी सांगितले.

  यावेळी कुपोषणमुक्तीसाठी राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना, राज्यात सुरु असलेली बचतगट चळवळ, बाल तथा महिलांची तस्करी रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध उपाययोजना, ग्रामीण भागांसाठी रस्त्यांची योजना, जलसंधारणाची राज्यात सुरु असलेली चळवळ अशा विविध विषयांच्या अनुषंगाने चर्चा झाली.