• post-image002

  “आई आहेस तर… आईत्व जप सखी…!” – आ.पंकजा मुंडे – पालवे

  लेक वाचवा – राष्ट्र वाचवा हे बिद्र वाक्य घेवून आ. पंकजा मुंडे – पालवे यांनी परळीमध्ये मोठे जनजागृती अभियान राबविले. औरंगाबादला त्यांनी 4 ऑक्टोबर रोजी जनजागृती अभियानाची रॅली काढण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी त्यांनी दोन दिवस औरंगाबादमधील अनेक संस्थांना भेटी देवून या अभियानांत सहभागी होण्याचे आवाहन केले.या अभियानाच्या निमित्ताने त्यांच्याशी केलेली बातचीत…

  लेक वाचवा अभियानाची आवश्यकता का भासली?
  गेल्या काही  वर्षापासून स्त्री-भ्रूण हत्येचे प्रमाण लक्षणीय संख्येने वाढले आहे. एकीकडे “नारी ही दुर्गा है, नारी लक्ष्मी’ सीता, सवित्री है म्हणायचे अन्‌  दूसरीकडे स्त्री जातीचे भ्रूण गर्भातच लिंगनिदान करुन मारायचे, हा अत्यंत गंभीर प्रकार खूप वाढला आहे. हा प्रकार एवढा सहज झाला आहे की, तो जन्मसिद्ध अधिकारच समजला जाऊ लागला! अर्भकाची हत्या हा  गुन्हा आहे ही कायद्याची भितीच नष्ट झाली! एरवी हुंडाबळी, ऑनर किलींगच्या वार्ता आपण रोज वर्तमानपत्रातून वाचतो, परंतु स्त्री- भू्रण हत्या हा प्रकार आई – वडीलांच्या, डॉक्टरांच्या सोयीने  होत असल्यामुळे त्याची वाच्यताही होत नव्हती. आईची इच्छा काय आहे याची चौकशी न करता किंवा प्रसंगी दबाव टाकून हे प्रकार होत असतात. एका स्त्री वर दबाव टाकणारी सासू नावाची दूसरीही स्त्रीच असते. अनैतिक संबंधातून  होणारी भ्रूण हत्या आणि मुलगी नको म्हणून होणाऱ्या हत्या यामध्ये सामाजिक दृष्टीने मोठा फरक आहे. मुलगी नको म्हणून होणाऱ्या हत्येमुळे स्त्रीयांचीच संख्या कमी होत आहे. त्यांचे अनेक दुष्परिणाम समाजाला भोगावे लागणार आहेत.  त्यामुळे  या ज्वलंत प्रश्नांवर राजकारणाच्या बाहेर जाऊन विचार करणे आवश्यक आहे. या जाणीवेतून या प्रश्नावर सामाजिक भान निर्माण करण्यासाठी या विषयावर जनजागृती करायची ठरविली.

  महाराष्ट्रात स्त्री पुरूष संख्येने प्रमाण कसे आहे?
  आपण केवळ ठळक माहितीवर जरी लक्ष केंद्रीत केले तरी या आकडेवरी वरुन गांभीर्य लक्षात येवू शकते. राज्यात सर्वाधिक स्त्रियांची संख्या कमी असणारा जिल्हा म्हणून दुदैवाने बीड जिल्ह्याचे नाव पुढे येते तर स्त्री – पुरूषांचे प्रमाण गडचिरोली या आदिवासी समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यात सर्वाधिक चांगले आहे. बीड जिल्ह्याची ही डोक्याला झींनझिन्या आणणारी वस्तुस्थिती समाज किती दिवस थंड डोक्यांनी सोसणार आहे हा प्रश्न मला पडत होता. स्त्रियांना कमी लेखने, घरात ठेवणे हे प्रश्न स्त्री – भ्रूण हत्येच्या प्रश्नांसमोर अतिशय शुल्लक वाटतात. त्यामुळे आज जागृत होऊन “मुलगी नको’ या भावनेला विरोध व्हायला हवा. एक हजार पुरूषांमागे सरासरी 992 स्त्रियांची संख्या असावी लागते तिथे ही संख्या 914 वर येवून ठेपली आहे. यापेक्षा सर्वात भयंकर म्हणजे बीड मध्ये ही संख्या 801 वर आली आहे. जिल्ह्याचे सामाजिक चित्र चांगले नाही, असे वाटले म्हणून  त्यामुळे ही जागृती तिथुनच सुरु केली आहे.

  बीड जिल्ह्याची ही स्थिती होण्याची कोणती कारणे आहेत?
  यासाठी माझ्या वैयक्तिक मतानुसार असे वाटते की, याला जिल्ह्याची सामजिक स्थिती कारणीभूत आहे. हुंडा हवा आहे आणि तोही इतरांपेक्षा जास्त, याचा मोठेपणा मिरवता आला पाहिजे. या भावनेतून हूंड्याचे प्रमाण वाढले. हे सर्वसामान्य पालकांच्या आवाक्या बाहेर गेले आहे, त्यातूनच मुलगी नको म्हणजे हुंडा देण्याचे काही काम राहणार नाही अशी भावना तयार झाली. मुलीच्या सरंक्षणाचा प्रश्न पुढे येतो. त्यातूनही सुटका करुन घेण्यासाठी तिचे अस्तित्वच नाकारले जाते. आधुनिक तंत्रज्ञानामुळे लिंग निदान चाचण्या सोप्या झाल्या. त्यामुळेही स्त्री भ्रूण हत्येत वाढ  झाली आहे.

  यावर उपाय कोणता आहे?
  जनजागृती हाच त्यावरचा उपाय आहे. या जोडीला कठोर कायदा असावा यासाठी कायद्यात सुधारणाही सूचविण्यात आल्या आहेत. कायद्याच्या दहशतीमुळेही स्त्री – भू्रण हत्या रोखण्यात यश मिळवू शकते. गर्भलिंग निदान कायदा समितीची मी सदस्या आहे. हा कायदा अधिक कठोर करण्याच्या दृष्टीने आम्ही विचार करित आहोत. एकीकडे स्त्रीला दुर्गा, सावित्री, लक्ष्मी म्हणायचे आणि दुसरीकडे तिचा जन्मच  नाकारायचा. समाजाने हा दुटप्पीपणा, ढोंगीपणा सोडला पाहिजे. स्त्री जातीची गर्भातच हत्या  करणाऱ्या व्यक्तींना समाजाने विचारले पाहिजे की, बाबा  रे तुझी आईच जन्मली नसती,  तर तुझा जन्म झाला असता का? त्यामुळे आता स्त्रियांनी स्त्रियांच्या सुरहक्षितेसाठी पुढे आले पाहिजे.

  या मोहिमेचा राजकारणाशी काही संबंध आहे काय?
  लेक वाचवा – राष्ट्र वाचवा हे संदेश देणारे असे जनजागृती अभियान संपूर्णत: सामाजिक असून राजकारणाशी त्याचा संबंध लावण्यात येऊ नये. एक स्त्री म्हणून माझीही काही जबाबदारी आहे, या एका भावनेतून हे जनजागृती अभियान आम्ही सुरु केलेले आहे. वैद्यनाथ सर्वांगिन विकास संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाची व्याप्ती मराठवाडाभर ठेवली जाणार आहे.

  “माझी कन्या भाग्यश्री’ ही कोणती योजना आहे?
  मराठवाडा विभाग 28 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2011 या दरम्यान जन्माला आलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या कन्या रत्नाच्या नावाने वैद्यनाथ सर्वांंगिण विकास संस्थेच्या वतीने दीड हजार रूपये ठेवीच्या  रूपाने ठेवण्यात येणार आहेत. या रक्कमेच्या व्याजावर त्या मुलीचे लग्न व्हावे, ज्यामुळे जन्मणाऱ्या मुलीच्या लग्नाची चिंता पालकांना राहणार नाही. थोडक्यात स्त्री-भ्रूण हत्येपासून परावृत्त व्हावे हाच त्यामागे हेतू आहे. यासाठी  दुसऱ्या कन्या रत्नानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करणे गरजेचे राहिल. मराठवाड्यातून जेवढ्या संख्येने नावे येतील त्या सर्वांच्या नावावर ठेवी जमा करण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. लेक वाचवा – राष्ट्र वाचवा ही भावना महिलांनीच महिलांसाठी स्वीकारली पाहिजे. आपल्या मुलीच्या नावाने जमा होणारी ही रक्कम त्यांच्या सुरक्षेच्या भावनेला प्रोत्साहन देणारी ठरावी हा त्यामागे उद्देश आहे. तेव्हा या मोहिमेमध्ये आणि जनजागृती अभियानमध्ये सर्व महिलांनी सामाजिकतेचे भान ठेवून सहभागी व्हावे एवढीच अपेक्षा.