Fight Against Female Foeticide

Navigation

Fight Against Female Foeticide

‘‘स्त्री-भ्रूण हत्या हा विषय गंभीर आहेच, समाजाच्या संतुलनाला आव्हान देणाराही आहे. त्याच्या विरोधात ठोस पावलं उचलण्यासाठीच मी ‘लेक वाचवा, राष्ट्र वाचवा’ अभियान आणि ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरू केली आहे. मला माहीत आहे, पल्ला खूप लांबचा आहे, तरी एक एक सातोली(अपुऱ्या दिवसाचं बाळ)जगवण्याचे आमचे प्रयत्न नक्कीच यशस्वी ठरतील.’’ सांगताहेत, परळीच्या आमदार पंकजा मुंडे -पालव.ज्यादिवशी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मांडलं गेलं, त्याच दिवशी जोपर्यंत स्त्रीला रक्षण नाही, तोपर्यंत आरक्षणाचा कितीसा उपयोग होईल, असा विचार मांडूनच मी आरक्षणाचं स्वागत केलं होतं. न्यूज चॅनल्सवर होणाऱ्या चर्चामधून इतर मान्यवर स्त्रियांबरोबर मी हाही मुद्दा स्पष्टपणे मांडला की, आरक्षण ही आवश्यक व स्त्रीला सबल करणारी बाब आहे. पण आपण हेही विसरता कामा नये की, स्त्रियांवरील अन्याय व स्त्री-भ्रूण हत्येसारख्या घटना आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात वाढतच चालल्या आहेत. त्याविरोधात ठोस पावलं उचलायलाच हवीत.

२०११ची जनगणना समोर आल्यानंतर स्त्री-पुरुष गुणोत्तर असमान असल्याची गोष्ट प्रखरपणे समोर आली असली तरी, समाजात स्त्री-भ्रूण हत्येसारख्या घटना पूर्वीपासून होत आहेत हे आपल्या सर्वाना ज्ञात असलेले कटू सत्य आहे.

माझी फारच दृढ धारणा होती, आजही आहे की स्त्री सर्वात आधी कोणती भावना बाळगत असेल तर मातृत्वाची. मला या भावनेचा उगम वयाच्या साडे तीन वर्षांंची असताना जाणवला. जेव्हा मला बहीण झाली. तिच्याविषयी मी खूपच प्रोटेक्टिव्ह होते. तिची खूप काळजी घ्यायचे. मातृत्व जाणवण्यासाठी कळा देऊनच मूल होण्याची गरज नसते. स्त्री ही कन्या, बहीण, पत्नी, सून, माता, सासू असा प्रवास करते. तिला आधी मातृत्व जाणवतं आणि नंतर ती माता होते. पुरुष मात्र पिता झाल्यावरच पितृत्वाचा अनुभव घेतो.

मी जेव्हा जेव्हा खेडय़ात जाते, तेव्हा गावाबाहेरचं दृश्य असतं, चार मुलं काठय़ा-खुपाटय़ा घेऊन टवाळपणा करत असतात आणि सहा-सात वर्षांच्या मुली मात्र रस्त्याच्या कडेने स्वत:च्या वजनाएवढी घागर घेऊन घरी पाणी नेत असतात. डोक्यावर सरपण जमा करून नाजूक अनवाणी पावलं उचलत असतात. मी त्यांना ‘मळक्या बाहुल्या’ म्हणते. इतक्या देखण्या, पण जणू कपाटात पडून धूळ खाणाऱ्या सुंदर बाहुलीसारख्या.

अशीच एक बाहुली मला सापडली ट्रेनमध्ये, बर्थच्या खाली. त्याच दिवशी हजला जाणाऱ्या माझ्या मतदारसंघातील नागरिकांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम होता. स्टेशनवर थांबलेल्या एका गाडीत भ्रूण सापडल्याचा फोन मला आला. पाहिलं तर ती एक सातोली (अपुऱ्या दिवसांचं बाळ) गोरीपान मुलगी होती. कशीबशी जिवंत होती. एवढासा जीव, कोणत्या निर्दयी माणसाने तिला फेकलं कोण जाणे? पण आम्ही तिला वाचवली. मी तिच्या संगोपनाची जबाबदारी घेतली. तिचं नाव ‘भाग्यश्री’ ठेवलं. नियमांनुसार तीन महिने तिला दत्तक देता येत नाही. पण तिला दत्तक घेणारे लोक पुढे सरसावले. अनेकांनी आपल्या वंशाचा दिवा नाही तर पणती म्हणून त्या अनाथ मुलीला कुटुंब देण्याचे ठरवले आणि परळी जीवन देणारी ठरली.

केवळ कायदे करून लोकांचा दृष्टिकोन बदलणार नाही. या विषयात लोकांना मनापासून बदलले पाहिजे आणि त्यासाठी जनजागृती हाच एकमेव मार्ग आहे. म्हणून स्त्री ‘लेक वाचवा राष्ट्र वाचवा’ अभियान करण्याचे ठरवले. ०-८ वयोगटातील मुलींचे घटलेले प्रमाण पुढच्या जनगणनेत वाढले नाही तर निदान घटणार नाही यासाठी हे अभियान आहे. माझ्या घरात जन्म घेणारी कन्या ही लक्ष्मी आहे. माझ्या घरात यश दाखवणारी यशश्री आहे. भाग्योदय करणारी भाग्यश्री आहे, म्हणून ‘माझी कन्या भाग्यश्री’ ही योजना. यात पहिली कन्या असूनही २०११ मध्ये ही दुसरी कन्या झाल्यास त्यावर शस्त्रक्रिया केल्यास दुसऱ्या कन्येच्या नावाने बँकेत मुदत ठेव ठेवणार आहोत. सध्या ही रक्कम फार नाही. मुलींवर होणारा खर्च व तिची जबाबदारी फार मोठी आहे, पण केवळ टीका अथवा चिंता करण्यापेक्षा काही तरी सकारात्मक करावे, यासाठी मी केलेली ही सुरुवात आहे.

आणखी एक गंभीर गोष्ट म्हणजे आजही मुलगी लग्न होऊन सासरी गेली की, आईवडील निश्वास सोडतात, पण सासरी गेली तर तिचा वनवास संपेल याची काय खात्री? सुशिक्षित लोक असतील (सुशिक्षित म्हणाले मी, सुसंस्कृत नाही) तर शोषण वेगळं. मुलीला सर्व सुखसोयी द्या, लग्नाचा थाट करा, मुलीला, जावयाला सगळं द्या. काहो आपण लग्नाचा खर्च वाटून का घेत नाही? का मुलीच्याच पालकांना इतका खर्च करावा लागतो. दुसरी गंभीर व महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्त्रीला, मुलीच्या सुरक्षिततेची काळजी. जोपर्यंत मुलगी मोठी होऊन सुरक्षितपणे सासरी जात नाही, तोपर्यंत आई-वडिलांच्या जिवात जीव राहत नाही. समाजाच्या या परिस्थितीला कोण जबाबदार? सरकार? प्रशासन? डॉक्टर्स? न्यायव्यवस्था? मी? की तुम्ही? की या अघोरी प्रथा? याचेच उत्तर शोधण्यासाठी, मुलींच्या भ्रूणहत्या कमी व्हाव्यात यासाठी जनजागरण सुरू केले. ‘लेक वाचवा, राष्ट्र वाचवा’ हे अभियान सर्वप्रथम माझ्या मतदारसंघात सुरू केले. याची सुरुवात ऑगस्टा क्रांतिदिनी झाली. स्त्री-भ्रूण हत्या या विषयावर ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध स्पर्धाचे आयोजन केले. १२-२२ वयोगटातील तरुणाईला यात सहभागी करून घेणे हे आमचे लक्ष्य होते. कारण तेच उद्याचे नागरिक, उद्याचा महाराष्ट्र घडविणार आहेत. त्यांच्या मनातील विचार, त्यांचे आदर्श, त्यांचं आचरण महाराष्ट्राची दिशा ठरविणार आहेत. त्यांनी हुंडा घेतला नाही. मुलींनी स्त्रीचा गर्भ नाकारला नाही तर सर्व वयोगटातील बालिका गावा-गावातील अंगणात खेळतील. मग ती मळकी बाहुली का असेना आणि परळीचे नाव मारणाऱ्यात नव्हे तारणाऱ्याला येईल, हाच निर्धार यानिमित्ताने केला. हे अभियान खूप यशस्वी झाले. शाळा-शाळा, महाविद्यालयांतून मुलं आणि तरुण खूप मोठय़ा संख्येने सहभागी झाले. १६ ऑगस्टला आम्ही एक भव्य पदयात्रा काढली. परळीसारख्या छोटय़ा गावात भ्रूणहत्याविरोधी मेळाव्यात २०-२५ हजार लोक उपस्थित राहिले. यामध्ये विद्यार्थ्यांची आणि स्त्रियांची संख्या जास्त होती, ही माझ्यासाठी समाधानकारक गोष्ट होती.

यानंतर नवरात्रातील अष्टमीच्या दिवशी औरंगाबाद येथे मोठी पदयात्रा काढली. याच्या पूर्वतयारीसाठी आम्हाला एक वेगळी कल्पना सुचली. नवरात्रात देवीच्या मंदिरात स्त्रियांची संख्या खूप असते हे लक्षात घेऊन औरंगाबादमधील वेगवेगळ्या सात देवींच्या मंदिरांत संध्याकाळची आरती वकील, पत्रकार, आयुक्त अशा यशस्वी महिलांच्या हस्ते केली आणि तिथल्या स्त्रियांमध्ये जनजागृती केली. नवरात्राच्या सात दिवसांत इथेही स्पर्धा घेतल्या. शाळा-महाविद्यालयांत गेलो. भ्रूणहत्याविरोधी चित्रकला स्पर्धेत २२ हजार चित्रे आली. यावरून या आंदोलनाची व्यापकता लक्षात येते. अष्टमीच्या पदयात्रेत प्रचंड मोठय़ा संख्येने स्त्रिया सहभागी झाल्या. महिला, विद्यार्थी आणि पुरुषही खूप मोठय़ा प्रमाणात या पदयात्रेत सहभागी झाले होते.

या विषयावर सातत्याने काही करण्याचा माझा प्रयत्न आहे. स्त्री-भ्रूणहत्या हा केवळ गंभीर विषय नाही तर समाजाच्या संतुलनाला आव्हान देणारा आहे. पण केवळ चिंता आणि भाषणे करण्यापेक्षा काही ठोस करावे, अशी सकारात्मक भूमिका घेऊन मी यामध्ये उतरले आहे. पल्ला खूप लांबचा आहे. पण सुरुवात केली आहे आणि खात्री आहे माझ्या भगिनी, तरुण हे आव्हान स्वीकारतील आणि स्त्री-भ्रूणहत्या थांबतील.

माझी कन्या भाग्यश्री

Photo gallery

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *